भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

मतदान जनजागृतीसाठी रत्नागिरी  जिल्हा प्रशासनाच्यावतीने दामले विद्यालयात विद्यार्थ्यांची कलाकृती


मतदान करण्याचे विद्यार्थ्यांकडून पालकांना आवाहन

Posted On: 02 APR 2024 4:43PM by PIB Mumbai

रत्नागिरी, 2 एप्रिल 2024

रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.15 दामले विद्यालय आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली. पालकांना मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

            येत्या लोकसभा मतदानात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले, की मानवी साखळीतून, कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे. पालकांनी मतदान करावे, यासाठी  विद्यार्थ्यांच्यामार्फत त्यांना आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले असून, हे संकल्प पत्र पालकांनी भरुन द्यावे.

मतदार जनजागृती अंतर्गत सायकल रॅली, मॅरेथॉन याबरोबरच बोट रॅलीचे आयोजनही करण्यात येत आहे.

 

उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा

    विद्यार्थ्यांना आज वाटप करण्यात आलेल्या संकल्पपत्रामध्ये खालीलप्रमाणे मजकूर आहे.  मी शपथ घेतो, मी भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करेन. मततदान करुन आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकारी नसून, ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे.

     मी अशीही शपथ घेतो, देशहिताकरिता जनतेच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करु शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करेन. मी अशीही शपथ घेतो, मी धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याही प्रलोभास बळी न पडता मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडेन.

   आजच्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन, मुख्याध्यापिका निलम जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

फलक माध्यमातून मतदान जनजागृत्ती

     जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेषत: उपविभागीय अधिकारी, तहसील कार्याल, नगरपरिषद, जिल्हा परिषद यंत्रणा यांच्या माध्यमातून विविध विधानसभा मतदार संघात फ्लेक्स, सेल्फी पॉईंट यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. 'मत आपले द्यायचे, कर्तव्य आपले बजावायचे',  'मतदान अधिकार पण, कर्तव्य पण',  'मतदान मतदात्याची शान', 'मतदानाचे कर्तव्य बजावून महाराष्ट्राला एक उत्तम राज्य बनवू या', असे संदेश देणारे फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत.

***

PIB Mum/DGIPR Ratnagiri

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2016927) Visitor Counter : 357