नौवहन मंत्रालय

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी 61व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे केले समारंभपूर्वक उद्घाटन


30 मार्च ते 5 एप्रिल हा आठवडा मर्चंट नेव्ही सप्ताह म्हणून साजरा केला जाणार असून, “शाश्वत नौवहनः संधी आणि आव्हाने” ही या वर्षाची संकल्पना आहे.

Posted On: 31 MAR 2024 1:19PM by PIB Mumbai


 

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनात शनिवारी( 30 मार्च, 2024) 61व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे समारंभपूर्वक उद्घाटन केले. नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन 61व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचा प्रारंभ झाल्याचे दर्शवण्यासाठी मर्चंट नेव्हीचा लघुध्वज राज्यपालांच्या पोशाखावर समारंभपूर्वक टाचून लावला. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (SCI) चे सीएमडी कॅप्टन बी. के. त्यागी आणि विविध संघटना आणि सागरी क्षेत्रातील कामगार संघटनांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. 

एस. एस. लॉयल्टीहे मेसर्स सिंदिया स्टीम नेव्हीगेशन कंपनी लिमिटेड, मुंबईचे वाफेवर चालणारे पहिले भारतीय जहाज 5 एप्रिल 1919 रोजी मुंबई ते लंडन या आपल्या पहिल्या सफरीवर रवाना झाले होते. भारतीय सागरी इतिहासात हा दिवस एक संस्मरणीय क्षण ठरला होता आणि म्हणूनच दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून साजरा केला जातो. 30 मार्च ते 5 एप्रिल हा आठवडा मर्चंट नेव्ही सप्ताह म्हणून साजरा केला जाणार असून, “शाश्वत नौवहनः संधी आणि आव्हानेही या वर्षाची संकल्पना आहे.

मर्चंट नेव्ही सप्ताहाचा हा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सागरी उद्योगातील सर्व हितधारकांना आणि नाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या आर्थिक विकासामध्ये मर्चंट नेव्हीने दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली आणि प्राचीन काळापासून भारताने शेजारी देशांसोबत सागरी व्यापाराच्या क्षेत्रात अतिशय उत्तम संबंध ठेवले आहेत, असे सांगितले. कोविड-19 महामारीनंतर जगभरातील अस्वस्थ राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि या सोहळ्यासाठी स्वीकारलेली संकल्पना या कठीण कालखंडात आवश्यक असलेले मार्गदर्शन नक्कीच करू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सागरी क्षेत्राने भारताला जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्यास मदत केली आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय सागरी दिवस सोहळा(NMDC) केंद्रीय समितीचे अध्यक्ष असलेले नौवहन महासंचालकांनी अशी माहिती दिली की भारताचा परदेशांसोबत होणाऱ्या व्यापारापैकी आकारमानाने सुमारे 95% आणि मूल्याच्या दृष्टीने सुमारे 75% व्यापार सागरी वाहतुकीद्वारे होतो आणि यापैकी सुमारे 92% माल परदेशी मालकीच्या जहाजांद्वारे वाहून नेला जातो. भारताच्या व्यापारी सागरी ताफ्यामध्ये 1523 जहाजे आहेत आणि 13.6 दशलक्ष जीटी इतके त्यांचे टनेज आहे. भारतामध्ये 5 लाख नोंदणीकृत नाविक असून त्यापैकी 2,85,000 जणांना दरवर्षी नोकरीत सामावून घेतले जाते. त्यापैकी 85% परदेशी आणि  15 % भारतीय जहाजांवर रुजू होतात. नौवहनाच्या व्यवसायात महिलांच्या प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय सागरी प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या लिंगसमानतेसाठी महासंचालनालय देखील  पावले टाकत आहे, असे त्यांनी सांगितले. आज भारतीय महिला नाविकांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या 11,532 वर पोहोचली आहे, ज्यामुळे गेल्या दशकात 578% इतक्या उल्लेखनीय वाढीची नोंद झाली आहे.

प्रकाशने, बैठका, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रदर्शने, स्पर्धा इ. च्या माध्यमातून ज्ञान आणि महितीची देवाणघेवाण करून नौवहन उद्योगाच्या सर्व प्रकारच्या पैलूंमधील भूमिकेचे दर्शन घडवण्यासाठी या सप्ताहातील कार्यक्रमांची आखणी केली. निवडक मान्यवरांना भारतीय नौवहन क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल 'सागर सन्मान पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाईल आणि सागरी क्षेत्रातील उत्कृष्ट आणि प्रशंसनीय योगदानाबद्दल सागरी संस्थांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात येईल.

***

R.Aghor/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2016747) Visitor Counter : 106


Read this release in: English