कृषी मंत्रालय
आयसीएआर - सीसीएआरआय गोव्याच्या ‘जायफळ टॅफी’ आविष्काराला मिळाले पेटंट
शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे मिळणार 5,600 रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न
Posted On:
30 MAR 2024 4:04PM by PIB Mumbai
गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्र (ICAR-CCARI) मधील डॉ. ए.आर. देसाई आणि त्यांच्या नेतृत्वाखालील चमूच्या "जायफळ टॅफी तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यापासून बनवलेले उत्पादन" नावाच्या शोधाला पेटंट क्रमांक 528119 (अर्ज क्रमांक 201621012414, दिनांक 8 एप्रिल 2016) प्रदान करण्यात आला आहे.
जायफळ, भारतातील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक असून त्याची प्रामुख्याने जायफळ बी आणि गर यासाठी लागवड केली जाते. कापणीनंतर बहुतेक वेळा जायफळाचे बीज कोष शिल्लक राहतात. या शिल्लक उप-उत्पादनाची दखल घेत गोव्यातील आयसीएआर - सीसीएआरआय ने जायफळ बीज कोषांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या उद्देशानेएक उपाय विकसित केला आहे - जायफळ बीज कोष टॅफी. या नाविन्यपूर्ण उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण पौष्टिक मूल्य असून ते ताज्या फळाच्या 80-85% भाग बनते आणि कृत्रिम संरक्षकांशिवाय सामान्य तापमानात 12 महिन्यांपर्यंत सोयीस्करपणे साठवले जाऊ शकते. यामुळे हे उत्पादन एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय बनले आहे.
या नव्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे, शेतकऱ्यांना पारंपरिक जायफळ मसाल्याच्या उत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त प्रत्येक झाडामागे 5,600 रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. हे उत्पादन तयार करण्याच्या प्रक्रियेची साधेपणा, त्यासाठी अगदी थोड्या उपकरणांची आवश्यकता आणि व्यावसायिक व्यवहार्यता या वैशिष्ट्यांमुळे कृषी-उद्योजकता, स्वयं-सहायता गट, लघु आणि मध्यम-स्तरीय अन्न उद्योग आणि कृषी-पर्यावरण पर्यटन केंद्रांसह विविध क्षेत्रांमध्ये त्याची व्यापक अंमलबजावणी होऊ शकेल.
या आविष्काराच्या तंत्रज्ञान हस्तांतरातून गोव्यातील नेत्रावली येथील मेसर्स तनशीकर स्पाइस फार्म आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा या संस्थांनी आधीच यशस्वी व्यापारी उत्पादन सुरू केले आहे. हे नव उत्पादन म्हणजे सामाजिक - आर्थिक विकासाच्या दृष्टीने कृषी नवोन्मेषांच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
गोव्यातील आयसीएआर - सीसीएआरआय च्या इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट युनिटने पेटंट अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तसेच कृषी क्षेत्रातील नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संस्थेची बांधिलकी दर्शवली आहे.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016719)
Visitor Counter : 112