वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लॉजिस्टिक क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासंदर्भात डीपीआयआयटीतर्फे परिसंवादाचे आयोजन

Posted On: 23 MAR 2024 6:17PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे काल उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) लॉजिस्टिक क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग कसा वाढवता येईल या विषयावरचा परिसंवाद आयोजित केला होता.

विकसित भारत व्हिजन 2047 चा एक महत्त्वाचा घटक असलेल्या लॉजिस्टिक क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डीपीआयआयटीचे अतिरिक्त सचिव राजीव सिंग ठाकूर यांनी बीजभाषण केले. लॉजिस्टिक उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच त्यातील नावीन्यतेसाठी पुरूष आणि स्त्रियांच्या समान आणि परस्परपूरक सहभागाचे महत्त्व त्यांनी विशद केले. कृतीशील दृष्टीकोन आणि सहयोगी प्रयत्नांवर भर देणाऱ्या त्यांच्या भाषणामुळे दिवसभराच्या इतर चर्चेसाठी वातावरणनिर्मिती झाली.

उद्योग संघटना, सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योग (एमएसएमई), मोठे व्यवसाय, कौशल्य विकास संस्था, शैक्षणिक संस्था, द्विपक्षीय आणि बहुआयामी संस्थांच्या 50 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या चर्चेत सहभाग नोंदवला. त्यांनी लॉजिस्टिक्स क्षेत्रात महिलांच्या सहभागासाठीचे मार्ग  सुचवले.  लॉजिस्टिक्स साखळीतील सर्व पातळ्यांवर महिलांचा सहभाग वाढवण्याला प्रोत्साहन देणारी आधारभूत परिसंस्था तयार करण्यासाठी हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

या क्षेत्रात महिलांच्या प्रवेशात येत असलेल्या अडथळ्यांबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली, त्यात पायाभूत अडथळ्यांपासून महिला सुरक्षा, प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकास यासाठी धोरणात्मक सुधारणा या विषयांवर चर्चा झाली. लॉजिस्टिक क्षेत्रातील महिलांची कार्यक्षमता आणि काहीतरी नवीन करण्याची सुप्त ऊर्मी याबद्दलही उपस्थितांनी मते व्यक्त केली. यासंदर्भातील जगभरातील यशोगाथा आणि उत्तम पद्धतींची उदाहरणे यावेळी देण्यात आली. महिलांच्या या क्षेत्रातील वाढत्या सहभागामुळे या क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाची माहितीही समोर आली.

लॉजिस्टिक्स क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सक्षम वातावरण तयार करण्यासाठी काय करता येईल, याविषयी सर्व संबंधित भागधारकांकडून भविष्यात सविस्तर अभिप्राय घेण्यात येणार आहे.

***

M.Pange/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2016219) Visitor Counter : 84


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil