वस्त्रोद्योग मंत्रालय

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी एनटीसी लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनाचे धनादेश केले सुपूर्द

Posted On: 15 MAR 2024 4:20PM by PIB Mumbai

मुंबई, 15 मार्च 2024

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न तसेच सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ लिमिटेडच्या (एनटीसी) कामगारांना 50% थकीत वेतनाचे धनादेश सुपूर्द केले.  पश्चिम आणि दक्षिण विभागातील मान्यताप्राप्त कामगार संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.  20 गिरण्यांमध्ये कार्यरत सुमारे 7000 एनटीसी लिमिटेडच्या कामगारांना याचा फायदा होणार आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संयुक्त सचिव आणि एनटीसी लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता एल.वर्मा यावेळी उपस्थित होत्या.

कोविड-19 दरम्यान टाळेबंदी लागू झाल्यापासून आणि त्यानंतर एनटीसीला आलेल्या आर्थिक अडचणींमुळे एनटीसी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन थांबवण्यात आले होते.

कोविड महामारीचा कंपनीवर इतका मोठा परिणाम होणे आणि आर्थिक चणचण भासून कठीण परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी आहे असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यावेळी म्हणाले. कर्मचाऱ्यांना महामारीचा फटका बसला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक अडचणी असूनही टीडीआरची (विकास अधिकारांचे हस्तांतरण) महत्त्वपूर्ण रक्कम विकली जाऊ शकते, त्यामुळे पगाराची थकबाकी देणे शक्य झाले आहे. एनटीसी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर 2021 पर्यंतचे थकीत वेतन आज दिले जाईल. "आम्हाला खात्री आहे की पुढील 30 - 40 दिवसांत, आम्ही आणखी 8 महिन्यांची थकबाकी, म्हणजेच ऑगस्ट 2022 पर्यंतची भरू शकू", संपूर्ण वेतनाची थकबाकी लवकरात लवकर दिली जाईल असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणा संदर्भात केन्द्र सरकार, महाराष्ट्र सरकारसह सर्व संबंधित तज्ञांची मते जाणून घेण्यात आली आहेत. एनटीसी लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी अत्यंत संवेदनशीलतेने या प्रश्नाचा अभ्यास केला आणि व्यावहारिकदृष्ट्या सर्वोत्तम मूल्य कसे मिळवता येईल हे समजून घेण्यासाठी, बाजारातील परिस्थितीच्या तुलनेत सर्वोत्तम काय प्राप्त होऊ शकते याचा विचार केला.  ऑनलाइन लिलावाद्वारे आणि प्रत्येक भागधारकांचा सहभाग सुनिश्चित करून संपूर्ण प्रणालीमध्ये सर्वाधिक पारदर्शकता कशी आणता येईल याचाही अभ्यास करण्यात आला, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

यावेळी वडाळा मतदार संघाचे आमदार कालिदास कोळंबकर, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य सचिन अहिर हे देखील उपस्थित होते.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014945) Visitor Counter : 43


Read this release in: English