सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ‘सामाजिक न्यायासाठी पीएम ईव्ही 2 सौर प्रकल्प’ कार्यक्रमांतर्गत ई-रिक्षाचे प्रात्यक्षिक सत्र


सामाजिक न्यायासाठी पीएम ईव्ही 2 सौर प्रकल्पाचा भाग म्हणून भारतभरातील 50,000 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार: रामदास आठवले

Posted On: 08 MAR 2024 6:45PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत गुरुवारी (7 मार्च, 2024) मुंबईत ईव्ही 2 सौर प्रकल्प उपक्रमांतर्गत विविध कंपन्यांनी विकसित केलेल्या ई-रिक्षाचे प्रात्यक्षिक सत्र संपन्न झाले. हा कार्यक्रम केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (एएसडीसी) सहयोगातून आयोजित केला होता. सामाजिकदृष्ट्या वंचित व्यक्तींना पीएम सूर्यघर आणि इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) वाहनांच्या किमतीच्या 30% मध्ये उपलब्ध करून राज्य योजनांद्वारे सुमारे 70% निधी पाठबळ प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 च्या एक दिवस आधी आयोजित कार्यक्रमात, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्यायासाठी पीएम ईव्ही 2 सौर प्रकल्पाचा भाग म्हणून भारतभरातील जवळपास 50,000 महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी एएसडीसी सोबत भागीदारी करार केला.

यावेळी बोलताना  आठवले म्हणाले कि सरकार सर्वांना वीज आणि रोजगार देण्यावर भर देत आहे. त्याच वेळी, सरकारला प्रदूषण कमी करायचे आहे आणि सौर उर्जेवर आधारित सुविधांचा वापर वाढवायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार नारी-शक्तीसक्षम करण्याच्या दिशेने हे एक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक न्यायासाठी पीएम ईव्ही 2 सौर प्रकल्पाचा भाग म्हणून भारतभरातील जवळपास 50,000 महिलांना प्रशिक्षण देणे हे भागीदारीचे उद्दिष्ट आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्र्यांनी (सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण) सांगितले. केंद्रीय मंत्री म्हणाले की, समाजातील वंचित घटकातील महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. "आम्ही सौर 2 ईव्ही च्या दिशेने प्रगती करताना, अशा भविष्याची कल्पना करतो जिथे नवोन्मेष आणि संधी या वंचितांच्या उन्नतीसाठी परस्पर पूरक असतील. हा उपक्रम सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यापुढील समुदायांना सशक्त बनवण्याची आमची अतूट बांधिलकी प्रतिबिंबित करतो," असे मत त्यांनी मांडले.

हा उपक्रम सुलभ करण्यासाठी, व्यक्तींना प्रथम कौशल्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये व्यक्तिमत्व विकास आणि रस्ता सुरक्षा जागरूकता यासारख्या आवश्यक बाबींचा समावेश असू शकतो. या दृष्टिकोनामुळे महाराष्ट्र राज्यात सुमारे 10,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी नमूद केले. "अशी ई-वाहने सामाजिकदृष्ट्या वंचित महिलांना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या योजनांद्वारे वितरित केली जातील, त्यांना गतिशीलता आणि आर्थिक संधींसह सक्षम बनवतील", असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2012901) Visitor Counter : 85


Read this release in: English