अर्थ मंत्रालय
बनावट जीएसटी पावत्या तयार करून सरकारची 25.73 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या, पालघर आयुक्तालयाने एका व्यक्तीला केली अटक
Posted On:
07 MAR 2024 9:18PM by PIB Mumbai
मुंबई, 7 मार्च 2024
मुंबई क्षेत्रातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या पालघर आयुक्तालयाच्या तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी एका बनावट पावत्या तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने 25.73 कोटी रुपये रकमेवर बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळवला होता आणि तो मंजूरही करून घेतला होता. या प्रकरणी किरण कंथारिया यांना 06.03.2024 रोजी अटक करण्यात आली आहे.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हॅकनअप ट्रेडिंग (OPC) प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध तपास सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान ही कंपनी अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले. उपरोक्त कंपनीचे संचालक नीलेश बी. शहा यांनी किरण कंथारिया आणि मनीष शहा यांच्या सूचनेनुसार हॅकनअप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर अनेक बनावट कंपन्या तयार करण्यात आपला हात असल्याची कबुली दिली होती. या बनावट कंपन्या बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळवणे आणि तो मंजूर करुन घेणे यात सहभागी होत्या.
किरण कंथारियाचा शोध घेण्यात आला आणि दिनांक 06.03.2024 रोजी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. किरण कंथारिया याने आपण बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळवणे आणि तो मंजूर करुन घेण्याच्या उद्देशाने बनावट पावत्या तयार करण्यात गुंतलेल्या अनेक बनावट कंपन्या स्थापन करण्यात सहभागी आहोत, अशी कबुली या जबाबात दिली. मनीष शहा यांच्या निर्देशानुसार तो वर उल्लेखित फसव्या कंपन्या तयार करत असे, असे कंथारिया याने पुढे सांगितले.
पुढे, असेही आढळून आले की किरण कंथारिया यांने तयार केलेल्या बनावट कंपन्यांनी वस्तू आणि किंवा सेवांचा पुरवठा न करता बनावट पावत्यांच्या बळावर 11.02 कोटी रुपये रकमेवर बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मंजूर करुन घेतला तर 14.70 कोटी रुपये रकमेवर बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला.
तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे किरण कंथारिया याला 06.03.2024 रोजी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 69 च्या तरतुदींनुसार केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली.
* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2012455)
Visitor Counter : 50