अणुऊर्जा विभाग
फ्रान्सच्या अणुऊर्जा सुरक्षा प्राधिकरणाच्या (एएसएन)प्रमुखांची त्यांच्या पथकासह अणुऊर्जा प्राधिकरण मंडळाला (एईआरबी) भेट
Posted On:
05 MAR 2024 8:39PM by PIB Mumbai
मुंबई, 5 मार्च 2024
अणुऊर्जा प्राधिकरण मंडळाने (एईआरबी)05 ते 07 मार्च 2024 या कालावधीत मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात फ्रान्सच्या एएसएन अर्थात अणुऊर्जा सुरक्षा प्राधिकरणाच्या शिष्टमंडळासाठी तीन दिवसीय बैठकीचे आयोजन केले आहे.
एएसएनचे प्रमुख बर्नार्ड डोरोस्झसीझुक यांच्या अध्यक्षतेखालील या फ्रेंच शिष्टमंडळामध्ये एएसएनचे दोन सन्माननीय आयुक्त आणि चार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही बैठक म्हणजे एईआरबी आणि एएसएन यांच्यातील द्विपक्षीय बंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. “एएसएनची ही भेट म्हणजे या दोन नियामक संस्थांमधील संबंध अधिक मजबूत करण्याप्रती तसेच अणुऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा नियमांच्या बाबतीत सहयोगी संबंध वाढवण्याप्रती असलेल्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे,” एईआरबीचे अध्यक्ष दिनेश कुमार म्हणाले.
जुन्या होत चाललेल्या अणुऊर्जा प्रकल्पांचे दीर्घकाळ परिचालन करण्यापासून ते लहान आकाराच्या मॉड्यूलर अणुभट्ट्यांसह नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानांचे नियमन अशा सर्व विषयांतील माहितीचे सामायीकीकरण करण्यासाठी तांत्रिक सहकार्याची क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या बैठकीत एईआरबीच्या नियामक उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी एईआरबीतर्फे नियामक संशोधनावर आधारित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय द्विपक्षीय बैठकीच्या कालावधीत एएसएनच्या शिष्टमंडळाच्या तारापूर अणुऊर्जा केंद्र भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.
एईआरबीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यविषयक उपक्रमांचा भाग म्हणून जुलै 1999 पासून ही संस्था एएसएनशी जोडली गेली आहे.
एईआरबीच्या अधिकाऱ्यांसमवेत एएसएनचे शिष्टमंडळ
* * *
PIB Mumbai | JPS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2011754)
Visitor Counter : 51