सहकार मंत्रालय

पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेतील (वॅमनिकॉम) “संगम” नामक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

Posted On: 01 MAR 2024 10:00PM by PIB Mumbai

पुणे, 1 मार्च 2024

 

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील पुणे येथील अर्थात वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेतील “संगम” नामक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थींच्या वसतिगृहाचे  आज 01 मार्च 2024 रोजी उद्घाटन झाले. केंद्र सरकारच्या सहकार तसेच ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे  राज्यमंत्री बी. एल. शर्मा यांनी आज दुपारी दोन वाजता आयोजित कार्यक्रमात हे उद्घाटन केले.

सन्माननीय अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील आफ्रिकी-आशियाई ग्रामीण विकास संघटनेचे (एएआरडीओ) सचिव डॉ.मनोज नरदेवसिंग तर विशेष अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-उपकुलगुरू डॉ.पराग कालकर तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे महानिरीक्षक संजय शिंदे या उद्घाटनपर कार्यक्रमात उपस्थित होते.

या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर गणेश वंदन आणि नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित अतिथींना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाची सफर घडवण्यात आली.

वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर ज्युबिली हॉलमध्ये पुढील कार्यक्रम पार पडला. वॅमनिकॉम आणि सीआयसीटीएबी अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार्य तसेच कृषी बँकिंग क्षेत्रातील प्रशिक्षण विषयक केंद्राच्या संचालक डॉ.हेमा यादव यांनी स्वागतपर भाषण केले.

स्वागतपर भाषणात त्या म्हणाल्या की या संस्थेने देशभरातील सहकारी संस्थांतील 15,000 सहभागींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी 50%प्रशिक्षणार्थी दुग्ध सहकारी संस्था, मस्त्य उत्पादन संस्था तसेच सहकारी बँकांतील महिला होत्या. ही संस्था महिलांना सातत्याने आर्थिक समावेशन, व्यवसाय योजना विकास, प्रशासन आणि नेतृत्व या विषयांतील प्रशिक्षण देत आली आहे असे त्यांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत वॅमनिकॉमने इन्क्युबेशन केंद्र विकसित केले असून त्या अंतर्गत 20 स्टार्ट अप उद्योगांनी नोंदणी केली आहे. सीआयसीटीएबीच्या अखत्यारीत सार्क देशांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतात अशी माहिती त्यांनी दिली. वॅमनिकॉम आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संबंध दीर्घकाळापासूनचे आहेत असे विद्यापीठाचे प्र-उपकुलगुरू डॉ.पराग कालकर यांनी सांगितले. नजीकच्या भविष्यात वॅमनिकॉमच्या सहयोगासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहकार व्यवस्थापन या विषयावर एमबीए अभ्यासक्रम सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली.

उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय राज्यमंत्री बी.एल.वर्मा यांनी सांगितले की देशातील शेतकरी वर्ग आणि सहकार क्षेत्र यांची नेमकी गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये वेगळ्या सहकार मंत्रालयाची स्थापना केली. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासात्मक उपक्रम राबवण्यात येत आहेत, यामध्ये पीएसीजसाठी आदर्श उपनियम, पीएसीजचे संगणकीकरण, सामायिक सुविधा केंद्र (सीएससी), पेट्रोल पंप, गॅस एजन्सी जन औषधी केंद्र यांची सुरुवात, इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. यातून येत्या काळात पीएसीज आणखी टिकाऊ स्वरूप घेतील. गेल्या काही वर्षांत तब्बल 60,294 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात यशस्वी झालेल्या वॅमनिकॉम संस्थेचा प्रशिक्षण कार्यक्रम राबव्ण्यातील भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

आतापर्यंत सीआयसीटीएबीने सार्क देशांतील प्रशिक्षणार्थींसाठी211 प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. वॅमनिकॉमने विकसित केलेल्या पायाभूत सुविधांची प्रशंसा करून ते म्हणाले की व्यवस्थापनविषयक शिक्षण तसेच सहकार क्षेत्रातील प्रशिक्षण यासाठी देशातील सर्वात अत्याधुनिक सोयी या संस्थेत आहेत. 50 निवासी खोल्यांची क्षमता, वाचनालय, वर्ग तसेच स्वतंत्र जेवण व्यवस्था असलेल्या “संगम” या  आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थींच्या वसतिगृहाचे बांधकाम करून या संस्थेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सहकार क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरणारे भारतातील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय वसतिगृह आहे. 

संस्थेत सहाय्यक प्राध्यापक पदी कार्यरत तसेच संस्थेचे रजिस्ट्रार असलेले आर.के.मेनन यांनी आभारप्रदर्शन केले.

 

* * *

PIB Pune | S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2010811) Visitor Counter : 50


Read this release in: English