माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय संचार ब्युरो, गोवा तर्फे हमारा संविधान हमारा सम्मान मोहिमेचे उद्घाटन
गोव्यातील बचत गटाच्या सदस्यांसाठी महिला आणि कायदेशीर हक्क या विषयावर सत्राचे आयोजन
Posted On:
28 FEB 2024 4:30PM by PIB Mumbai
गोवा, 28 फेब्रुवारी 2024
केंद्रीय संचार ब्युरो, गोवा यांनी हमारा संविधान हमारा सम्मान अंतर्गत आयोजित केलेल्या चार दिवसीय संपर्क कार्यक्रमाचे उद्घाटन आज गोवा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव विजया आंब्रे यांच्या हस्ते झाले. दक्षिण गोवाच्या जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या प्रकल्प संचालक दीपाली नाईक याही यावेळी उपस्थित होत्या.
भारताला प्रजासत्ताक म्हणून 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विधी सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी ही मोहीम आहे.
लोकांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाने बजावलेली महत्त्वपूर्ण कामगिरी विजया आंब्रे यांनी अधोरेखित केली. “आपल्या लोकशाहीचा कणा असलेले भारतीय संविधान आशेचा प्रकाशस्तंभ आहे, विजय आणि संकटाच्या काळात राज्यघटना आपल्याला मार्गदर्शन करते. राज्यघटनेच्या संस्थापकांनी अशा राष्ट्राची कल्पना केली जिथे प्रत्येक व्यक्तीला तिची स्वप्ने आणि आकांक्षा मुक्तपणे पूर्ण करण्यास सक्षम केले जाईल, हाच संस्थापकांची बुद्धी, दूरदृष्टी आणि सामूहिक भावनेचा दाखला आहे.”, असे त्यांनी सांगितले.
बचत गटाच्या सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या कायदेशीर हक्कांवरील सत्र कसे महत्त्वाचे ठरेल हे दीपाली नाईक यांनी सांगितले. कायदेशीर तज्ञांशी जास्तीत जास्त प्रमाणात संवाद साधून मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहन दिले.
उद्घाटनानंतर दक्षिण गोवाच्या मुख्य कायदेशीर मदत सुरक्षा सल्लागार ॲड. अनिशा सिमोस यांनी मार्गदर्शन केले. या सत्रात महिलांना सक्षम करणाऱ्या भारतीय कायद्यांमधील महत्त्वाच्या तरतुदींवर भर देण्यात आला. या कायद्यांची उत्पत्ती भारतीय राज्यघटनेतील विविध तरतुदींशी संबंधित आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी उपस्थित महिलांना त्यांच्या सर्व कायदेशीर गरजांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी मुक्तपणे संपर्क साधण्याचे आवाहन केले.
घटनेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी माहितीपूर्ण भित्तीचित्रे आणि मसुदा समितीच्या सदस्यांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. संविधानाच्या मूळ प्रतीची प्रतिकृती आणि 360 डिग्री सेल्फी बूथ हे देखील अभ्यागतांसाठी आकर्षण ठरत आहे .
* * *
PIB Panaji | S.Kane/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2009811)
Visitor Counter : 78