संरक्षण मंत्रालय

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी पुण्यामध्ये आयोजित महाराष्ट्र एमएसएमई संरक्षण प्रदर्शन 2024 ला दिली भेट

Posted On: 24 FEB 2024 7:11PM by PIB Mumbai

पुणे, 24 फेब्रुवारी 2024

 

राष्ट्र उभारणी मधील संरक्षण क्षेत्राच्या मोठ्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र सरकारने 24 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान आंतरराष्ट्रीय प्रदर्शन परिषद केंद्र, मोशी, पुणे येथे आयोजित महाराष्ट्र एमएसएमई (सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग) संरक्षण प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपल्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी भारतीय हवाई दलाला  आमंत्रित केले आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील एमएसएमई, खासगी कंपन्या, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) प्रयोगशाळा आणि सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन केंद्रे (DPSU) मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, यामधून संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने भारताने केलेली प्रगती, आणि सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांद्वारे सशस्त्र दलांच्या गरजा, संशोधन आणि विकास आणि संरक्षण उत्पादन याची पूर्तता करण्याची क्षमता प्रतिबिंबित होत आहे.

एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी 24 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शनाला भेट दिली, आणि भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारतीय वायुदलाच्या स्वावलंबी बनण्याच्या भविष्यातील गरजेची जाणीव निर्माण करण्यासाठी सहभागी उद्योगांशी संवाद साधला. प्रदर्शनात मांडण्यात आलेले  आकाश आणि SAMAR क्षेपणास्त्र प्रणाली, याशिवाय नवीन पिढीचे कमी वजनाचे प्रगत हेलिकॉप्टर एमके-IV आणि कमी वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर, संरक्षण क्षेत्राच्या ‘स्वदेशी’ क्षमतेची प्रचीती देत आहेत. भारतीय हवाई दलाच्या  स्टॉलवर, देशांतर्गत संस्थांनी खासगी उद्योगांच्या भागीदारीने विकसित केलेली उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत.

तरुणांना भारतीय वायुसेनेत सहभागी होण्यासाठी आकर्षित करण्याकरता हवाई दलाने  या ठिकाणी प्रसिद्धी स्टॉल देखील उभारला आहे. वायुसेनेच्या  विविध कामांची आणि हाती घेतलेल्या उपक्रमांची  माहिती देण्यासाठी या ठिकाणी इंडक्शन पब्लिसिटी एंड एक्झिबिशन व्हेईकल (IPEV) ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना या प्रसिद्धी मोहिमेचा लाभ मिळाला, ज्यांना वायुसेनेच्या  विविध पैलूंबद्दल तसेच हवाई दलामध्ये  करिअरसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती घेण्याची उत्सुकता होती. भारतीय हवाई दलाच्या सेवेत अधिकारी म्हणून तसेच अग्निवीरवायू (पुरुष आणि महिला) म्हणून रुजू होण्याचे फायदे काय आहेत, याबद्दलही त्यांना माहिती देण्यात आली.

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008666) Visitor Counter : 120


Read this release in: English