ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकणाऱ्या मीरा रोड वरील एका दागिन्यांच्या दुकानावर बीआयएसचा छापा
Posted On:
21 FEB 2024 9:03PM by PIB Mumbai
मुंबई , 21 फेब्रुवारी 2024
सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलात्मक वस्तू विक्री कायदा 2020 अंतर्गत निर्देशित हॉलमार्किंग आदेशाच्या उल्लंघनाबाबत प्राप्त झालेल्या माहितीवर त्वरित कारवाई करत, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) च्या मुंबई शाखा कार्यालय-II मधील अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी (20 फेब्रुवारी 2024) मीरा रोड येथील एका दागिन्यांच्या दुकानावर छापा टाकला.

भारतीय मानक ब्युरोच्या हॉलमार्कशिवाय सोन्याच्या दागिन्यांचे तसेच सोन्याच्या कलात्मक वस्तूंचे उत्पादन, साठवण आणि विक्री केली जात असल्याचे आणि सोन्याच्या दागिन्यांवर तसेच सोन्याच्या कलात्मक वस्तूंवर जुन्या पद्धतीनुसार चार खुणांचे मार्किंग केले जात असल्याचे मे. मिलन ज्वेलर्स, शांती नगर, मीरा रोड (पूर्व) या दुकानावरील छाप्यादरम्यान आढळून आले. भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 च्या कलम 17(1) (a) चे उल्लंघन करत भारतीय मानक ब्युरोचा हॉलमार्क नसून जुन्या पद्धतीनुसार चार खुणांचे मार्किंग असलेले सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलात्मक वस्तूंचा मोठा साठा या छाप्यात जप्त करण्यात आला.

भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 च्या कलम 17(1)(a) चे उल्लंघन करणाऱ्यासाठी भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास अथवा किमान 2,00,000 रुपये दंड अथवा दोन्ही या शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्याच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय II चे प्रमुख तसेच 'एफ’ श्रेणीतील शास्त्रज्ञ संजय विज यांनी दिली.
भारतीय मानक ब्युरो सर्व ग्राहकांना, भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणन अनिवार्य असलेल्या उत्पादनांची यादी शोधण्यासाठी BIS CARE ॲप (मोबाइल Android आणि iOS दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्यास नेहमीच प्रोत्साहित करतो. याशिवाय सोन्याच्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील ISI मार्कचा खरेपणा तपासण्यासाठी http://www.bis.gov.in या भारतीय मानक ब्युरोच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन ग्राहकांना केले जाते.
भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणन अनिवार्य असलेली उत्पादने हॉलमार्क शिवाय विकली जात असल्याचे किंवा कोणत्याही उत्पादनावर ISI मार्कचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी MUBO-II, पश्चिम विभागीय कार्यालय, भारतीय मानक ब्युरो, 5 वा मजला, CETTM कॉम्प्लेक्स, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई - 400076 या कार्यालयाच्या प्रमुखांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन भारतीय मानक ब्युरोने केले आहे. अशा तक्रारी hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारे देखील नोंदवल्या जाऊ शकतात. या माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2007859)
Visitor Counter : 100