आयुष मंत्रालय
केंद्रीय आयुष तसेच केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक आरोग्याशी संबंधित संयुक्त उपक्रमाची केली घोषणा
भारताला एक स्वावलंबी राष्ट्र बनवायचे असेल तर आपल्याला प्रत्येक भारतीयाला रोगमुक्त राखावे लागेल : केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन
देशातल्या मुलांना निरोगी बनवून आम्ही विकसित भारताचे लक्ष्य साध्य करत आहोत: केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांचे प्रतिपादन
Posted On:
21 FEB 2024 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 फेब्रुवारी 2024
भारताला एक स्वावलंबी राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी आपल्याला प्रत्येक भारतीय नागरिकाला रोगमुक्त राखावे लागेल असे मत केंद्रीय आयुष तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी तसेच व्यवस्थापन यासाठीच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पाच्या घोषणेसाठी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. या प्रकल्पाचा लाभ सुमारे 20,000 आदिवासी विद्यार्थ्यांना होणार आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि जबलपूर येथील आयसीएमआर-एनआयआरटीएच यांच्या संयुक्त सहकार्याने केंद्रीय आयुष मंत्रालयाने स्वतःच्या अखत्यारीतील सीसीआरएएस या संशोधन मंडळाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा आरोग्य विषयक उपक्रम हाती घेतला आहे. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा देखील या घोषणेच्या वेळी उपस्थित होते.
आरोग्यविषयक सरकारी उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी भागातील एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांतील (ईएमआरएस) विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने दोन्ही मंत्र्यांनी एकत्रितपणे या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली.
केंद्रीय आयुष मंत्री म्हणाले की आदिवासी समाजाच्या आरोग्यविषयक गरजांचा अभ्यास करण्यासाठी तसेच कुपोषण, लोहाची कमतरता म्हणजेच अॅनिमिया तसेच सिकल सेल आजारांचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये यापूर्वीच मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेल्या आणि या आजारांवर प्रभावी ठरलेल्या आयुर्वेदीक हस्तक्षेपांच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सुविधा विषयक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने दोन्ही मंत्रालयांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरु केला आहे. देशातील 14 राज्यांमधील 55 ईएमआरएसमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वीच्या वर्गांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 10 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना या प्रकल्पाअंतर्गत लाभ मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री म्हणाले, “हा उपक्रम मुलांमध्ये आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या पद्धती विकसित करण्यात मदत करेल, आणि त्यायोगे, रोगांच्या प्रतिबंधावर अधिक भर देऊन या मुलांच्या आरोग्यात सुधारणा करून तसेच त्यांचे संरक्षण करून त्यांच्या एकंदर आरोग्याकडे लक्ष देईल.”
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2007810)
Visitor Counter : 115