संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या सैन्याने कोंढाणा (सिंहगड) किल्ला सर केल्याच्या ऐतिहासिक घटनेचे भारतीय जवानांनी केले स्मरण

Posted On: 19 FEB 2024 6:45PM by PIB Mumbai

पुणे, 19 फेब्रुवारी 2024

 

बेळगाव येथील  मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने मराठा दिनी म्हणजेच, 4 फेब्रुवारी 2024 रोजी एका सायकल मोहिमेला  हिरवा झेंडा दाखवून  प्रारंभ झाला. या मोहिमेत सहभागी झालेले जवान  800 किलोमीटर अंतर कापून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व प्रमुख किल्ल्यांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आधी पुण्‍यातील  सिंहगडावर पोहोचले. या सायकलिंग मोहिमेचे नेतृत्व मराठा एलआय  रेजिमेंटल सेंटरचे मेजर संदीप कुमार यांच्यासह दोन  अधिका-यांनी केले. यामध्‍ये 13 जवान आणि दोन माजी सैनिकांचा  सहभाग झाले होता. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

4 फेब्रुवारी 2024 हा दिवस भारतीय लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटद्वारे मराठा दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदाार  तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला याच दिवशी (4 फेब्रुवारी) ताब्यात  घेतला होता. इतिहासामध्‍ये  कोंढाण्याची लढाई अनेक दृष्‍टीने  अनोखी मानली जाते.  या लढाईविषयी  युद्धाचे प्रमुख धडे सामरिक ते रणनीती स्तरावर अभ्‍यासले जातात आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचे तेज, प्रेरणा आणि शौर्य यावर प्रकाश टाकणारी ही लढाई मानली जाते.

कोंढणा किल्‍ला सर करण्‍याच्या घटनेप्रीत्यर्थ काढण्‍यात आलेल्या  सायकल यात्रा 17 फेब्रुवारी 2024 रोजी सिंहगडावर पोहोचली. यावेळी  सायकल यात्रेतील जवानांनी  ध्वजवंदन केले आणि तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस  श्रद्धांजली अर्पण केली. 'कोंढाण्यातील यशस्वी लढाईच्या स्मरण कार्यक्रमामध्‍ये तानाजी मालुसरे यांचे शौर्य, या लढाईतील योगदान, कर्तृत्व आणि बलिदान  यांचे स्मरण केले.  त्यांच्या कार्याचे स्मरण करणे तसेच  त्यांच्या शौर्याचा   सन्मान करण्यासाठी   अशा मोहिमा  शक्तिशाली मार्ग आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.

या  कार्यक्रमामध्‍ये  सेवानिवृत्त  नौदल अधिकारी  श्रीकांत केसनूर, विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांची सिंहगडाची लढाई आणि  तानाजी मालुसरे यांचा  पराक्रम या विषयावर भाषणे झाली आणि लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू,  (निवृत्त)  यांनी मराठ्यांचा हा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाची सांगता पारंपरिक मराठा पद्धतीच्या भोजनाने झाली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2007185) Visitor Counter : 79


Read this release in: English