गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लाचखोरीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात सीबीआयने दोन रेल्वे झोनमधील दोन वरिष्ठ विभाग अभियंते आणि एका सहाय्यक विभागीय विद्युत अभियंत्यासह चार जणांना घेतले ताब्यात

Posted On: 17 FEB 2024 8:03PM by PIB Mumbai

मुंबई, 17 फेब्रुवारी 2024

 

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाचखोरीच्या दोन वेगळ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक केली. यापैकी एका प्रकरणात वरिष्ठ विभाग अभियंता (इलेक्ट्रिकल) (एसएसई) आणि दक्षिण मध्य रेल्वे, तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे कार्यरत सहाय्यक विभागीय विद्युत अभियंता (एडीईई) यांना, तर दुसऱ्या प्रकरणात एका मध्यस्थासह वरिष्ठ विभाग अभियंता (एसएसई) यांना अटक करण्यात आली. 

प्रलंबित देयकाचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून वरिष्ठ विभाग अभियंता (एसएसई) (इलेक्ट्रिकल), दक्षिण मध्य रेल्वे, तिरुपती यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार एका खाजगी कंपनीचे संचालक असून त्यांची, तिरुपती येथील रेल्वेच्या शेडच्या वॉशिंग आणि सिक लाइन्समध्ये HOG डब्यांच्या देखभालीसाठी 750 व्होल्ट वीज पुरवठा करण्यासाठीची सुमारे 2.56 कोटी रुपयांची रेल्वेची निविदा मंजूर करण्यात आली होती. तक्रारदाराची सुमारे 1.99 लाख रुपये रकमेची दोन देयके मंजूर झाल्याचे नमूद केले आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या तिरुपती येथील वरिष्ठ विभाग अभियंता (एसएसई) (इलेक्ट्रिकल) आणि इतरांनी तक्रारदाराकडे बेकायदेशीर पैशांची मागणी करून त्रास दिला, असा आरोपही करण्यात आला आहे.  ही मागणी पूर्ण होत नसल्याने आपल्या छळवणुकीत वाढ होत असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि अंतिम देयक देण्यासाठी तक्रारदाराच्या कंपनीने मुदतवाढ मागितली होती.

याशिवाय, तक्रारदाराने आरोपी वरिष्ठ विभाग अभियंत्याची भेट घेतली तेव्हा या अभियंत्याने तक्रारदाराला चंद्रगिरी रेल्वे स्थानकावर खंदक खोदण्याचे काम आणि क्षैतिज ड्रिलिंग बोअर कार्यान्वित करण्यास सांगितले, असा आरोपही करण्यात आला. हे काम तक्रारदाराच्या कराराशी संबंधित नव्हते. तक्रारदाराने वरिष्ठ विभाग अभियंत्यांच्या कार्यालयाला भेट देऊन प्रलंबित देयकाची प्रक्रिया करण्याची विनंती केली असता हे काम करण्यासाठी त्या अभियंत्याने 2.75 लाख रुपयांची लाच मागीतल्याचा आरोपही करण्यात आला. या संदर्भात झालेल्या वाटाघाटीनंतर आरोपी अभियंत्याने त्या देयकाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी 40,000 रुपये भरण्यास सांगितले होते.

त्यावर सीबीआयने सापळा रचून वरिष्ठ विभाग अभियंत्याला 40,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.  या प्रकरणाच्या पुढील कारवाई दरम्यान, सहाय्यक विभागीय विद्युत अभियंता (ADEE) दक्षिण मध्य रेल्वे, तिरुपती, यांचा सहभागही लक्षात आला आणि त्यालाही 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज 17.02.2024 रोजी सीबीआय प्रकरणे हाताळणाऱ्या कुर्नूल येथील विशेष न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले आणि आरोपींना 01.03.2024 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दुसऱ्या प्रकरणात, सीबीआयने वरिष्ठ विभाग अभियंता (एसईई), सानपाडा, मध्य रेल्वे, मुंबई यांच्याविरुद्ध देयक पास करण्यासाठी आणि सीआरएन जारी करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. आरोपीने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम म्हणून 3% कमिशनची मागणी केली होती आणि ही रक्कम पेटीएम द्वारे मध्यस्थाकडे सुपुर्द करण्यास सांगितले होते. तक्रारदार हा दिल्लीत एक फर्म चालवत असून मध्य रेल्वेला साहित्याचा पुरवठा करत असल्याचे सांगण्यात आले. ऑगस्ट 2023 मध्ये तक्रारदाराच्या फर्मला 3000 किलो हलक्या वजनाच्या बॉडी फिलरच्या पुरवठ्यासाठी मध्य रेल्वेच्या संपदा स्टोअर डेपोकडून साहित्याचा पुरवठा करण्याचा आदेश प्राप्त झाला होता आणि या फर्मने ऑक्टोबर 2023 मध्ये साहित्याचा पुरवठा केला होता. या पुरवठ्याचे देयक वरिष्ठ विभाग अभियंता, मध्य रेल्वे, मुंबई यांच्याकडे प्रलंबित राहिले.

सीबीआयने सापळा रचून, आरोपी वरिष्ठ विभाग अभियंत्याच्या वतीने पेटीएम द्वारे लाच स्वीकारणाऱ्या मध्यस्थाला पकडले. त्यासोबतच आरोपी अभियंत्यालाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही प्रकरणातील आरोपींच्या घराची झडती घेण्यात येत आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.

 

* * *

PIB Mumbai | M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2006823) Visitor Counter : 52


Read this release in: English