संरक्षण मंत्रालय
लष्करप्रमुखांनी विस्तारित बॉम्बे सॅपर्स युद्धस्मारकाचे केले राष्ट्रार्पण तसेच स्मारक टपाल तिकीटही केले जारी
Posted On:
31 JAN 2024 6:15PM by PIB Mumbai
पुणे, 31 जानेवारी 2024
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी खडकी येथील बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप आणि सेंटरच्या शताब्दी निमित्त विस्तारित बॉम्बे सॅपर्स युद्धस्मारक देशाला समर्पित केले तसेच पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

युद्ध स्मारकाच्या शताब्दीनिमित्त, बॉम्बे सॅपर्स युद्ध स्मारकाचा सन्माननीय दर्जा कायम राखणारे एक विशेष टपाल तिकीटही लष्करप्रमुखांच्या हस्ते जारी करण्यात आले. हा कार्यक्रम नियोजित वेळेत पार पाडल्याबद्दल जनरल पांडे यांनी टपाल विभागाचे आभार मानले.

बॉम्बे सॅपर्स युद्ध स्मारक ही सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ उंच उभी असलेली पवित्र इमारत आहे. विस्तारित युद्धस्मारकात प्रत्येक पराक्रमी सैनिकांची नावे असलेल्या भिंतींच्या दोन कमानदार पंक्ती उभ्या करण्यात आल्या आहेत. सोबतच, अभ्यागतांना सैनिकांचे नाव शोधता यावे यासाठी एक डिजिटल किओस्क स्थापन करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शीख लाईट इन्फंट्री आणि मराठा लाईट इन्फंट्री मार्चिंग दलाच्या सैनिकांसह 3000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना, लष्करप्रमुखांनी लष्कराच्या क्षेत्रीय संरचनेसाठी लढाऊ अभियंता समर्थन देण्यात आणि इतर राष्ट्रउभारणी उपक्रम बॉम्बे सॅपर्स दाखवत असलेल्या त्यांच्या उत्कृष्ट व्यावसायिकतेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अभियंता युनिट्सच्या कारनाम्यांचे वर्णन करताना, या युनिटने लडाखच्या खडतर प्रदेशात केलेल्या उत्कृष्ट कामापासून ते उत्तर सिक्कीममधील ओपी तिस्ता नदी प्रदेशातील भूमिकेपर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल लष्कर प्रमुखांनी समाधान व्यक्त केले.

प्रशिक्षण केंद्रात अग्निवीरांच्या पहिल्या दोन तुकड्यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचे लष्करप्रमुखांनी कौतुक केले आणि युनिट्सकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे सांगितले. नवीन प्रशिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञान जसे की सिम्युलेटर आणि व्हिडिओ-आधारित प्रशिक्षणाने 31 आठवड्यांच्या कालावधीत इष्टतम आणि लक्ष केंद्रित प्रशिक्षण सुनिश्चित केले आहे, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. कमांडिंग अधिकाऱ्यांनी युनिट्समध्ये त्यांचे सौहार्द बाळगून एकत्र यावे असे आवाहन लष्कर प्रमुखांनी केले. यासोबतच जे सेवा काळात उत्कृष्ट असतील ते गणवेशातून बाहेर पडल्यावर देखील आदर्श नागरिक म्हणून सिद्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लष्करप्रमुखांनी युद्धस्मारक शताब्दीनिमित्त हाती घेतलेल्या तीन आव्हानात्मक मोहिमांचा भाग बनलेल्या मोहीम पथकांच्या सदस्यांशीही संवाद साधला. कारगिल क्षेत्रातील 7135 मीटर उंच शिखर असलेल्या माऊंट ननची पर्वतारोहण मोहीम 08 ऑक्टोबर 2023 रोजी यशस्वीरीत्या पार करण्यात आली. 112 अभियंता रेजिमेंटचे नायब सुभेदार शंकर उकळीकर यांच्यासमवेत 28 सदस्यांच्या चमूने प्रतिकूल हवामान आणि खडतर भूप्रदेशाचा सामना केला. मात्र 1000 मीटर लांब बर्फाचा कडा ओलांडताना नायब सुभेदार शंकर उकळीकर यांनी आपले प्राण गमावले.

मृत नायब सुभेदार शंकर उकळीकर यांनी त्या कठीण परिस्थितीतही संघ समतोल साधत पुढे जात राहावा यासाठी दाखवलेल्या शौर्यामुळे बॉम्बे सॅपर्स परिवारात ते अमर झाले आहेत.
लष्कर प्रमुखांनी सर्वोत्कृष्ट साहसी बॉम्बे सॅपरसाठी उकळीकर संस्था साहसी पुरस्काराची घोषणा केली आणि पहिलाच पुरस्कार लान्स हवलदार तेजिंदर सिंह यांना जाहीर झाला, ते या पथकाचा भाग होते. किबिथू ते कच्छपर्यंतच्या पूर्व पश्चिम पॅरामोटर मोहिमेमध्ये प्रत्येक पॅरामोटरने 3460 किलोमीटरपेक्षा जास्त उड्डाण केले तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या उत्तर दक्षिण मायक्रोलाइट मोहिमेने कठीण प्रदेश आणि तीव्र हवामानाच्या परिस्थितीत दोन स्थिर पंखे आणि दोन पॉवर हँग ग्लायडरसह 4650 किलोमीटर अंतर पार केले.
लष्करप्रमुखांनी या चमूतील सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यातील प्रत्येकाचे हिंमत, धैर्य आणि शौर्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि तीन मोहीम पथकातील जवानांना आणि बीईजी खडकी येथे तैनात असलेल्या बॉम्बे सॅपरच्या जवानांना त्यांच्या अतुलनिय कामगिरीबद्दल 13 प्रशंसापत्रे प्रदान केली.
बॉम्बे सॅपर्स युद्धस्मारक शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, दिवंगत सुभेदार श्रीरंग सावंत यांचे पुत्र डॉ. सुधीर सावंत यांनी खडकी येथील बॉम्बे सॅपर्स केंद्रामध्ये येथे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडे त्यांच्या वडिलांचे शौर्यचक्र प्रदान केले. 29 जुलै 1986 रोजी पूर बचाव कार्य करताना दाखवलेल्या शौर्याबद्दल दिवंगत सुभेदार सावंत यांना 26 जानेवारी 1988 रोजी शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले होते.

कोटा शहरापासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या कटुन गावात नागरिकांना वाचवण्यात जेसीओचा सहभाग होता. अरु नदीतील पाण्याची पातळी कमी होईपर्यंत बचावकार्य थोडे थांबून करण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र , सुभेदार सावंत यांनी जलदगतीने आणि धोकादायक खडकांमधून बोट स्वतः चालवली आणि नदीतून अनेकवेळा प्रवास करून लोकांना सुरक्षित बाहेर काढले. तिसऱ्या वेळी प्रवास करताना मात्र, बोट एका खडकावर आदळली आणि सर्व प्रवासी नदीत फेकले गेले.
जोरदार प्रवाहामुळे मुख्य प्रवाहाकडे ते खेचले जात असतानाही ते पोहण्यासाठी प्रोत्साहित करून ते लोकांना मार्गदर्शन करत राहिले. हिंमत न हरता त्यांनी लोकांना सुरक्षितत ठिकाणी ढकलणे सुरूच ठेवले आणि असे करत असताना, त्यांचे डोके खडकावर आपटले. अनेकांचे प्राण वाचवत असताना हे शूरवीर नदीच्या खोल प्रवाहातून बाहेर पडू शकले नाही आणि त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले.
त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी सुभेदार श्रीरंग सावंत यांना शौर्य चक्र (मरणोत्तर) प्रदान करण्यात आले. लष्करप्रमुखांनी समूहाच्या वतीने पदक स्वीकारले आणि सुभेदार श्रीरंग सावंत आणि त्यांचे कार्य बॉम्बे सॅपर्सच्या गौरवशाली इतिहासात सदैव जिवंत राहील, अशी ग्वाही सावंत यांना दिली.
* * *
PIB Pune | R.Aghor/Shraddha/Sonal C/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2000936)
Visitor Counter : 103