सांस्कृतिक मंत्रालय
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने आयोजित ‘25 वा भारत रंग महोत्सव’ या जगातल्या सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवाचे येत्या 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन
प्रसिद्ध अभिनेते आणि एनएसडीचे माजी विद्यार्थी पंकज त्रिपाठी हे यंदाच्या महोत्सवाचे 'रंग दूत’ म्हणजेच सदिच्छादूत
1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत आयोजित या महोत्सवात देशभरातल्या 15 शहरांमध्ये 150 कार्यक्रमांतून भारतीय आणि जागतिक नाट्य परंपरांचे समृद्ध विविध पैलू होणार सादर
Posted On:
30 JAN 2024 6:29PM by PIB Mumbai
मुंबई , 30 जानेवारी 2024
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) अर्थात राष्ट्रीय नाट्य शाळेने मुंबईत, 25वा भारत रंग महोत्सव (बीआरएम 2024) आयोजित केला आहे.1 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपी ) इथे, एका शानदार उद्घाटन समारंभात जगातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव असलेल्या या भारत रंग महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि एनएसडीचे अध्यक्ष परेश रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
एनसीपीए येथे आयोजित या उद्घाटन समारंभात आणि रेड-कार्पेट कार्यक्रमात एनएसडीचे अध्यक्ष पद्मश्री परेश रावल, आणि इतर प्रमुख नाट्य कलाकार आणि अभिनेते सहभागी होणार आहेत . प्रसिद्ध अभिनेते आणि एनएसडीचे माजी विद्यार्थी पंकज त्रिपाठी हे ‘यंदाच्या महोत्सवाचे सदिच्छादूत म्हणजे रंग दूत’ असतील. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार, गायक आणि एनएसडीचे माजी विद्यार्थी स्वानंद किरकिरे यांनी ‘रंग गान’ हे यंदाच्या महोत्सवासाठीचे विशेष गीत तयार केले आहे. यंदाचा महोत्सव ‘वसुधैव कुटुंबकम, वंदे भारंगम’: सामाजिक समरसतेसाठी काम करणाऱ्या जगभरातील कलाकार आणि नाट्यकर्मी यांच्या एकतेचा सोहळा आणि त्यांच्या कार्याला सलाम', या संकल्पनेवर आधारित आहे. या महोत्सवा दरम्यान एनएसडीने 'रंग हाट' किंवा जागतिक नाट्य बाजाराचे देखील आयोजन केले आहे.
हा महोत्सव 1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत होणार आहे. या नाट्य महोत्सवादरम्यान, 21 दिवसांमध्ये देशातल्या 15 शहरांमध्ये 150 हून अधिक सादरीकरणे आणि असंख्य कार्यशाळा, चर्चा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणारे मास्टर क्लासेस आयोजित करण्यात आले आहेत. हा महोत्सव भारतीय आणि जागतिक नाट्य परंपरांचे समृद्ध विविध पैलू अधोरेखित करेल. याव्यतिरिक्त, हे वर्ष भारत रंग महोत्सवाच्या स्थापनेच्या 25 व्या वर्धापन दिनाचे वर्ष आहे.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी, एनएसडी सोसायटीचे अध्यक्ष परेश रावल यांनी आज यासंदर्भात माहिती दिली. या पत्रकार परिषदेला भारत रंग महोत्सवाचे सदिच्छादूत (रंग दूत) पंकज त्रिपाठी,मुक्ती फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष स्मिता ठाकरे, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि एनएसडीचे इतर प्रमुख सदस्य या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
"आपण भारत रंग महोत्सवाच्या 25 व्या वर्षात पदार्पण करत असताना, हा महोत्सव विशेष महत्वाचा ठरतो. कलात्मक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक विविधता सादर करण्याची वचनबद्धता यातून दिसते, असे एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या पाव शतकात, या महोत्सवाने जागतिक नाट्य परंपरांचे अनेक समृद्ध पैलू अधोरेखित करत, मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. हा महोत्सव नाट्यक्षेत्रातील केवळ विलक्षण सर्जनशीलताच दाखवत नाही तर सहकार्याच्या सौंदर्यावरही भर देतो, असे त्यांनी सांगितले. या वर्षीचा महोत्सव केवळ मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्रिपाठी यांनी व्यक्त केला.
सरकारनं जास्तीत जास्त सांस्कृतिक केंद्र उभी राहतील, आणि त्यांची जोपासनाही केली जाईल, ह्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा एनएसडी सोसायटीचे अध्यक्ष, परेश रावल यांनी व्यक्त केली. ‘रंग दूत’ या नात्यानं, हा महोत्सव नेहमीच्या प्रेक्षकांच्या पलीकडे, सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू, असं अभिनेता पंकज त्रिपाठी यावेळी म्हणाले.
मुंबईतील नाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी मुक्ती सांस्कृतिक केंद्राने भारत रंग महोत्सवासाठी भागीदारी केली आहे. मुक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष स्मिता ठाकरे यांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सहकार्य केले असून मुक्ती सांस्कृतिक केंद्र या महोत्सवा अंतर्गत 4 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करणार आहे. 1 ते 3 फेब्रुवारी या काळात हा महोत्सव दादर मधील शिवाजी मंदिर नाट्यगृह इथे तर 4 ते 6 फेब्रुवारी या दरम्यान अंधेरी पश्चिम येथील मुक्ती कल्चरल हब इथे नाटके सादर होणार आहेत. 6 फेब्रुवारी रोजी मुक्ती सांस्कृतिक केंद्र इथे सांगता होणार आहे. या सहा दिवसांत, विविध शैली आणि भाषांमधील सर्वोत्कृष्ट ठरलेली एकूण सहा नाटके दाखवली जातील. एनएसडीच्याच एका नाट्य समूहाची निर्मिती असलेल्या, “ताजमहल का टेंडर’ या नाटकाने, या महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर, रंगपीठ थिएटर, मुंबईचे 'गजब तिची अदा ', एनएसडी रेपर्टरी कंपनी, नवी दिल्ली द्वारे ‘बाबूजी’, पंचकोसी, दिल्ली चे ‘द झू स्टोरी’, थिएटर फ्लेमिंगो, गोवा चे ‘तोडी मिल फॅन्टसी’ आणि दर्पण, लखनौ ची ‘स्वाह’ अशा विविध नाट्यकृती यावेळी सादर होणार आहेत.
मुंबईसह हा महोसत्व, पुणे, भुज, विजयवाडा, जोधपूर, दिब्रुगढ, भुवनेश्वर, पाटणा, रामनगर आणि श्रीनगरमध्ये एकाचवेळी होणार आहे.
एका नाविन्यपूर्ण वाटचालीत, एनएसडीने यावर्षी रंग हाट हा वार्षिक उपक्रम देखील आयोजित केला आहे. आशियातील जागतिक नाट्य बाजाराची स्थापना करणे आणि नाट्य क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.
हा महोत्सव रंगमंचाच्या पलीकडे जाऊन समृद्ध अनुभवांचे भांडार खुले करेल. समांतर प्रदर्शने, दिग्दर्शक-प्रेक्षक संवाद, चर्चा आणि परिसंवाद नाट्य क्षेत्राच्या विविध पैलूंचा शोध घेतील तसंच प्रोत्साहित करणारे संवाद आणि सूक्ष्म दृष्टिकोन या महोत्सवात अनुभवता येणार आहे.
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000676)
Visitor Counter : 166