संरक्षण मंत्रालय
वीर गाथा 3.0 च्या ‘अव्वल -100’ विजेत्यांचा नवी दिल्लीत संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार
याप्रसंगी राजनाथ सिंह यांनी विजेत्यांपैकी एकाला भाषण करायला सांगितले
Posted On:
25 JAN 2024 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 25 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत प्रोजेक्ट वीर गाथा 3.0 च्या 'अव्वल -100' विजेत्यांचा सत्कार केला. 10,000 रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र या 100 विजेत्यांना देण्यात आले. याप्रसंगी एका संस्मरणीय क्षणी संरक्षण मंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात प्रथमच राजनाथ सिंह यांनी यातील एक विजेती आणि कटक, ओडिशामधील डीएव्ही पब्लिक स्कूलच्या इयत्ता 11 वी मधील विद्यार्थिनी बर्नाली साहू हिला उपस्थितांना संबोधित करण्यासाठी मंचावर बोलावले , हा या कार्यक्रमासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिव्हाळ्याचा क्षण होता.
बर्नाली साहू हिच्या संबोधनाद्वारे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले की, भारताला 2047 पर्यंत 'विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यात देशातील युवक महत्त्वाची भूमिका बजावतील. “देशाच्या भविष्याला आकार देण्यात तरुणाई ही सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. ते विकसित राष्ट्राची जबाबदारी पार पाडतील,” असे साहू बर्नाली म्हणाली.
बर्नालीच्या माध्यमातून आपले विचार मांडताना राजनाथ सिंह म्हणाले: “ वीर गाथा हा प्रकल्प देशाच्या शूरवीरांची युवकांना ओळख करून देण्याचा आणि त्यांच्या शौर्याच्या गाथा युवकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न होता. ‘राष्ट्र प्रथम ’ ची मूल्ये मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाच्या एकत्रित प्रयत्नातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. “
त्यांनी एनसीईआरटीच्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि राष्ट्रासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणार्या शूरवीरांवरील एक प्रकरण अलीकडेच समाविष्ट केल्याचा उल्लेख केला. “आमच्या सैनिकांनी दाखवलेल्या असीम शौर्याबद्दल मुलांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. या मुलांनी शौर्य आणि धैर्य आत्मसात करावे अशी आमची इच्छा आहे,” असे ते म्हणाले. ‘मी जे ऐकतो ते विसरतो. मला जे दिसते ते आठवते आणि मी जे करतो, ते मला समजते’, हा शिकण्याचा एक अचूक मार्ग असल्याचा संरक्षण मंत्र्यांनी उल्लेख केला.
“एक काळ असा होता जेव्हा एक राष्ट्र म्हणून आपल्याकडे मर्यादित संसाधने होती आणि आपण आपल्या तरुणांकडे योग्य लक्ष देऊ शकत नव्हतो. हे दृश्य आता बदलले आहे. आज उंच उडण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आकांक्षांचे मोकळे आकाश उपलब्ध आहे. उद्याचे राष्ट्र निर्माण करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे.” असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
व्यासपीठावर स्थानापन्न होण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संरक्षण मंत्र्यांनी 'आध्यात्मिक शक्ती' बद्दल आपले विचार सामायिक केले. त्यांनी जीवनात विजय मिळवण्यासाठी किंवा कोणताही इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य या तीन पैलूंचे वर्णन केले. केवळ अध्यात्मिक व्यक्तीलाच आनंद मिळतो, असे सांगत केवळ मोठ्या मनाची माणसेच अध्यात्मिक दिशेने जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘वीर गाथा’ हा अनोखा कार्यक्रम असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. हा उपक्रम तरुण पिढीला शूरवीरांनी केलेल्या बलिदानातून प्रेरणा देतो, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात परमवीर चक्र पुरस्कारप्राप्त सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंग यादव (निवृत्त) यांनी कारगिल युद्धातील त्यांची वास्तविक जीवन कथा सांगितली. या युद्धात त्यांनी सर्व अडचणींवर मात करत भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सर्वोत्कृष्ट बलिदान देऊन आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी मुलांना केले.
* * *
NM/Sushma/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999658)