मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
आयसीएआर-सीआयएफटी च्या मुंबई संशोधन केंद्राने मासेमारी तंत्रज्ञान आणि मत्स्य प्रक्रिया क्षेत्राचे भविष्य यावरील चर्चेसाठी आयोजित केली भागधारकांची विशेष बैठक
Posted On:
24 JAN 2024 9:13PM by PIB Mumbai
मुंबई, 24 जानेवारी 2024
आयसीएआर- केंद्रीय मत्स्य व्यवसाय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयसीएआर-सीआयएफटी) मुंबई येथील संशोधन केंद्राने 19 जानेवारी 2024 रोजी भागधारकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यामध्ये मासेमारी तंत्रज्ञान आणि मत्स्य प्रक्रिया क्षेत्राचे भविष्य यावर विशेष भर देण्यात आला.
नवी मुंबईतील वाशी येथील केंद्राच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील 21 प्रमुख भागधारकांचा सहभाग होता. शास्त्रज्ञ डॉ.श्रवण के शर्मा यांनी बैठकीत स्वागतपर केले.
एमआरसी आयसीएआर- केंद्रीय मत्स्य व्यवसाय तंत्रज्ञान संस्थे मधील प्रमुख वैज्ञानिक आणि प्रभारी शास्त्रज्ञ डॉ. आशा के.के. यांच्या नेतृत्वाखालील बैठकीचे उद्दिष्ट, मासेमारी आणि मत्स्य प्रक्रिया क्षेत्रातील सध्याची आव्हाने आणि संधी याला अनुसरून, संशोधनाचे प्रयत्न करणे, हे होते. मासेमारी तंत्रज्ञान, मत्स्य प्रक्रिया, माशांची गुणवत्ता आणि सामाजिक-आर्थिक पैलू, दृष्टीकोन आणि अनुभवांची देवाण घेवाण करण्यासाठी एका सहयोगी वातावरणाला चालना देणे, या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सहभागींची विविध गटांमध्ये विभागणी करण्यात आली.
बैठकीदरम्यान मांडण्यात आलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये, खोल जलाशयांमधील मासेमारीसाठी उपकरणे विकसित करणे, माशांचे स्थलांतर रोखण्यामधील अडथळ्यांचा शोध घेणे आणि मासेमारी जहाजांच्या रचनेतील नवोन्मेष याचा समावेश होता. भागधारकांनी मासेमारी जहाजांवर माशांचे शेल्फ लाइफ (टिकाऊ पणा) वाढवण्यासाठी पूर्व-प्रक्रिया उपकरणांचे महत्त्व, PFZ (संभाव्य मासेमारी क्षेत्र) डेटाचे प्रमाणीकरण आणि ट्रॉल आणि डॉल्नेटमध्ये बायकॅच लोडची समस्या, या मुद्द्यांवरही चर्चा केली.
मत्स्य प्रक्रिया विभागावरील चर्चेत, मासेमारीच्या विविध पद्धतींवर आधारित माशांच्या गुणवत्तेची तुलना करणे, पूर्वप्रक्रिया करण्यासाठी निर्जंतुकीकरण केलेल्या समुद्राच्या पाण्याचा वापर, आणि मत्स्य प्रक्रिया प्रकल्पातील कामगारांसाठी प्रभावी प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करणे, या मुद्द्यांचा समावेश होता. याशिवाय, भागधारकांनी जेलीफिश बायकॅचपासून उपउत्पादन प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाचा विकास आणि आयसीएआर-सीआयएफटी ने विकसित केलेल्या फ्रेशनेस किटमधील बदल, या मुद्द्यांवर भर दिला.
सामाजिक-आर्थिक विषयावरील चर्चेत, मासेमारी तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करणे, महाराष्ट्रात माशांचा खप वाढवणे, मत्स्य प्रक्रिया उद्योगातील कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर करणे आणि समुद्री खाद्य उद्योगांमध्ये पिण्यायोग्य पाण्याच्या तंत्रज्ञानाला पर्याय विकसित करणे, या मुद्द्यांचा समावेश होता.
डॉ.आशा के.के. यांनी, बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर त्वरित कार्यवाही करण्याच्या आणि भागधारकांशी मोकळा संवाद ठेवण्याच्या वचनबद्धतेसह बैठकीचा समारोप केला. या बैठकीत मच्छिमार समुदाय आणि संशोधन संस्थांचे महाराष्ट्रासह इतर प्रदेशात शाश्वत आणि कार्यक्षम मासेमारी पद्धतींसाठीचे सामूहिक आणि समर्पित प्रयत्न यावर प्रकाश टाकण्यात आला.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999380)