पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
शहरी शाश्वत विकास आणि ऊर्जा शाश्वत विकास यांचा मिलाफ घडवण्याचा सरकारचा प्रयत्न - केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी
Posted On:
20 JAN 2024 9:13PM by PIB Mumbai
पुणे, 20 जानेवारी 2024
शाश्वत विकास हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून शहरी शाश्वत विकास तसेच ऊर्जा शाश्वत विकास यांचा मिलाफ घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, यामध्ये भारत नक्की यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्यक्त केला.
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था येथे आयोजित पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात पुरी बोलत होते. उद्योजक अमित परांजपे यांनी यावेळी श्री. पुरी यांची मुलाखत घेतली. याप्रसंगी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, महोत्सवाचे संयोजक इंद्रनील चितळे, सिद्धार्थ देसाई या वेळी उपस्थित होते.
हरदीपसिंह पुरी पुढे म्हणाले की विकास आणि ऊर्जा शाश्वती यांच्या मिलाफाने भारताने चंद्रयान मोहीन किफायतशीर पद्धतीने यशस्वी केली. आगामी काळात ऊर्जेच्या बाबतीत काळात जग प्रचंड बदलणार आहे. आज इलेक्ट्रिक व्हेईकलची संख्या वेगाने वाढत आहे. शाश्वत विकास साधण्यासाठीच भारत सरकारने देशभरात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सध्या जगभरातील काही देशांमध्ये अस्थिरतेची परिस्थिती आहे. अशा स्थितीत भारताला शाश्वत विकास साध्य करायचा असल्यास आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. इंधनाच्या गरजा लक्षात घेता भारताला जैविक इंधन आणि ग्रीन हायड्रोजन अशा इंधनाच्या नव्या पर्यायांना विकसित करावे लागणार आहे असे पुरी म्हणले.
पूर्वी जैवइंधनाला कमी लेखण्यात आले. अन्नसुरक्षेचे काय होणार असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, आज टाकाऊ शेतमालापासून जैवइंधन त़यार होऊ लागले आहे ही मोठी उपलब्धी आहे. त़्यामुळे प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. रिफायनरीतील टाकऊ वायू, बांबूपासूनही इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. विमानाच्या इंधनात जैवइंधनाच्या मिश्रणाचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे, असे पुरी यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून जैवइंधनाप्रमाणेच सौरऊर्जाही महत्त्वाची आहे. सौरऊर्जा निर्मितीवरही सरकार भर देत आहे.भारत आज उत्तम कामगिरी करतो आहे. भारतात क्षमता असल्यानेच परदेशातून गुंतवणूक येत आहे, असे पुरी यांनी सांगितले.
***
H.Akude/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1998242)
Visitor Counter : 233