संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी -राष्ट्र सेवेची 75 वर्षे
Posted On:
16 JAN 2024 6:15PM by PIB Mumbai
पुणे , 16 जानेवारी 2024
राष्ट्रीय संरक्षण अकादमीने आपल्या देशाच्या सशस्त्र दलांच्या संरचनेवर सखोल आणि अमिट प्रभाव टाकला आहे. काळाच्या कसोटीवर उतरत राष्ट्र उभारणीचा तो एक महत्त्वाचा भाग बनला आहे. 1949 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या समृद्ध इतिहासाने स्वतंत्र भारताबरोबर यशस्वी प्रवास केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, ही प्रतिष्ठित संस्था केवळ सशस्त्र दलांसाठीच नव्हे तर भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांच्या निर्मितीसाठीही एक खंबीर आधारस्तंभ म्हणून उभी राहिली आहे. या संस्थेच्या 75 गौरवशाली वर्षांच्या उत्सवाची सुरुवात 19 जानेवारी 2023 रोजी बोधचिन्हाच्या अनावरणाने झाली. तीनही दलांच्या रंगांसह त्रि-दलांचे प्रतीक आहे आणि 'संयुक्त लष्करी नेतृत्व निर्माण करणे' ही याची संकल्पना आहे. वर्षभर चाललेला हा उत्सव अनेक प्रसिद्ध मेळावे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. 14 जानेवारी 2024 ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत 75 व्या गौरवशाली वर्ष सोहळ्याची सांगता झाली. अकादमीच्या समृद्ध वारशाला यात मानवंदना देण्यात आली. एन. डी. ए. मधील 'संयुक्त लष्करी नेतृत्व निर्माण करणे' या समकालीन संकल्पनेवर प्रख्यात लष्करी आणि नागरी मान्यवरांनी आयोजित केलेले नेतृत्व चर्चासत्र हे या विशिष्ट कार्यात आघाडीवर राहिले.
हट ऑफ रिमेम्बरन्स येथे 16 जानेवारी रोजी पुष्पचक्र अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. चीफ ऑफ स्टाफ जनरल अनिल चौहान तसेच नौदल आणि हवाई दल प्रमुखांसह माजी लष्करी अधिकारी उपस्थित होते. बलिदानाच्या ऐतिहासिक प्रतिक चिन्हावर त्यांनी आदरांजली अर्पण केली. भव्य अंतिम सोहळ्यात क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी यांच्यात संवाद साधण्याची संधी देखील मिळाली.
एन. डी. ए. च्या शौर्याला, कर्तव्याला आणि सन्मानाला मानवंदना म्हणून एन. डी. ए. च्या विद्यार्थ्यांचा प्रवास आणि प्रशिक्षण दाखवणारा एक लघुपट देखील प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय संरक्षण अकादमी ही केवळ एक संस्था नाही, तर आपल्या देशाच्या चिरस्थायी भावनेचा जिवंत पुरावा आहे, हे 75 व्या गौरवशाली वर्ष सोहळ्याने दाखवून दिले. याचा वारसा, भारताशी जोडलेल्या, उत्कृष्टता आणि व्यावसायिकतेचा दीपस्तंभ म्हणून उभा राहत येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्ग प्रशस्त करत आहे.
M.Iyengar/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1996711)
Visitor Counter : 114