अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालय - मुंबई विभागीय युनिटने न्हावा शेवा बंदरातून 10.08 कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा कंटेनर पकडला

Posted On: 14 JAN 2024 5:19PM by PIB Mumbai

 

तस्करीविरोधातल्या महत्त्वपूर्ण कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने  10.08 कोटी रुपये किंमतीच्या  परदेशात तयार करण्यात आलेल्या सिगारेट घेऊन जाणारा कंटेनर रोखत तो  जप्त केला. चिनी धाग्याचे विणलेले गालिचे असल्याचे खोटे सांगत  हा माल न्हावा शेवा बंदरात अत्यंत सावधपणे राबविलेल्या कारवाईदरम्यान उघडकीस आला.

 

मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने, संयुक्त अरब अमिराती बंदरातून आयात करण्यात आलेल्या मालाचे दोन  कंटेनर रोखले. पहिल्या कंटेनरची सविस्तर तपासणी केल्यावर, असे उघड झाले की कथित चिनी कापडाचे विणलेले गालिचे हे खरे तर परदेशी-ब्रँडच्या विशेषत: एस्से चेंज  सिगारेट (कोरियामध्ये निर्मिती झालेले) चा संपूर्ण माल झाकण्यासाठी होते, दुसरा कंटेनर, सुरुवातीला जुन्या आणि वापरलेल्या गालीच्यांचे 325 रोल (गुंडाळे) वाहून नेत आहे असे सांगितल्यामुळे देखील संशय अधिक दुणावला. अगदी बारकाईने तपासणी केल्यावर असे आढळून आले की सीमाशुल्क अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी तस्कर माल झाकण्यासाठी या कापडाचा  वापर करत आहेत. या  कापडाच्या गुंडाळ्यामध्ये सिगारेटच्या एकूण 67,20,000 कांड्या लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आल्यानेसीमाशुल्क कायदा, 1962 च्या कलमानुसार, जुन्या आणि वापरलेल्या गालीचांसह सर्व मुद्देमाल तात्काळ जप्त करण्यात आला.

यावेळी जप्त करण्यात आलेल्या सिगारेटची अंदाजे किंमत 10.08 कोटी रुपये इतकी आहे. या संदर्भातला पुढील तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाची ही  कारवाई, तस्कर विरोधी धोरण आणि अशा अवैध  कारवायांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्याची त्यांची कटिबद्धता दर्शवते.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1996065) Visitor Counter : 163


Read this release in: English