माहिती आणि प्रसारण मंत्रालय
विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमांतर्गत उत्तराखंड आणि ओदिशामधल्या पत्रकारांच्या महाराष्ट्राच्या प्रसारमाध्यम दौऱ्याची सांगता
Posted On:
13 JAN 2024 5:01PM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मुंबईमधील पत्र सूचना कार्यालयाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेने प्रसारमाध्यम दौऱ्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील विकसित भारत संकल्प यात्रेची प्रगती पाहण्यासाठी, राज्यातील विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आणि येथील वास्तव्यादरम्यान महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि आदरातिथ्याचा अनुभव घेण्यासाठी देखील, उत्तराखंड आणि ओदिशामधील प्रत्येकी सात पत्रकार, 8 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते.
आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात हे पत्रकार पुणे शहरात दाखल झाले. पुण्यामध्ये त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटला भेट दिली आणि तिथले चित्रपट अभ्यासक्रम आणि चित्रपट निर्मितीशी संबंधित अभिनय,दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, लेखन, संपादन आणि संगीत यांसारख्या विषयांची सविस्तर माहिती घेतली.
पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकच्या (वारसास्थळांची पदयात्रा) माध्यमातून या पत्रकारांना पुण्याच्या समृद्ध इतिहासाचे आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या पत्रकारांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शासन मॉडेलची, पुरस्कार विजेत्या सारथी ऍपची ओळख करून दिली आणि त्यांना महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची देखील प्रत्यक्ष माहिती दिली.
या टप्प्यात सर्वात शेवटी या पत्रकारांच्या शिष्टमंडळाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पुण्यामधील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेला भेट दिली आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यात आणि अगदी अलीकडे कोविड महामारी प्रतिबंधासाठीच्या प्रयत्नांमध्ये त्यांच्या भूमिकेची माहिती घेतली.
त्यानंतर उत्तराखंड आणि ओदिशाच्या पत्रकारांचे हे शिष्टमंडळ लोणावळ्याला रवाना झाले. लोणावळ्यात त्यांनी भारतीय नौदलाच्या सदर्न नेव्हल कमांडच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या आणि आपली जहाजे, गोदी आणि देखभाल केंद्रांवर तैनात करण्यात येणाऱ्या युद्धसज्ज तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अतिशय प्रतिष्ठेच्या आयएनएस शिवाजी या तंत्रज्ञान संस्थेला भेट दिली. या भेटीदरम्यान, या पत्रकारांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांना, कॅडेट्स आणि खलाशांना या संस्थेमध्ये देण्यात येणारे तांत्रिक ज्ञान आणि प्रात्यक्षिक कौशल्यांची माहिती घेतली.
लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरण आणि परिसरात या पत्रकारांना लोणावळ्यातील शंभर वर्षे जुन्या कैवल्यधाम योग संस्थेत योग आणि ध्यानात मग्न होण्याची संधी मिळाली. कैवल्यधाम योग संस्थेच्या जगभरात अनेक ठिकाणी शाखा आहेत.
प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ओडिशा आणि उत्तराखंडमधील हे पत्रकार मुंबईत दाखल झाले. त्यांनी मुंबईतील त्यांच्या मुक्कामाची सुरुवात जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीला भेट देऊन केली. यावेळी त्यांनी दक्षिण आशियातील कंटेनरद्वारे मालवाहतूक करणाऱ्या प्रमुख बंदराची कार्गो हाताळणी आणि कामकाज पाहिले, तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेत अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांचे महत्त्व देखील जाणून घेतले.
ओडिशा आणि उत्तराखंडमधील पत्रकारांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईतील राजभवनात भेट घेतली. हा त्यांना गौरवान्वीत करणारा क्षण होता. या भेटीमुळे पत्रकारांना प्रसार माध्यमांचा सध्याचा ट्रेंड तसेच भारतातील विविध राज्यांमधील विकास उपक्रम यासारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर माननीय राज्यपालांचे मार्गदर्शन मिळू शकले. पत्रकारांनी राज्यपालांना आपल्या आत्तापर्यंतच्या प्रसारमाध्यम दौऱ्यामध्ये आलेले विविध अनुभव आणि त्यातून मिळालेले बोध कथन केले. यावेळी पत्रकारांना राजभवन येथील प्रसिद्ध बंकर संग्रहालयाला भेट देण्याचीही संधी मिळाली.
मुंबईत दिवसाखेर पत्रकारांसाठी इंडिया टुरिझमने मुंबई दर्शन सहलीचे आयोजन केले होते. या सहलीत सर्व पत्रकारांनी चित्तथरारक कथांद्वारे, मुंबईचा इतिहास, परंपरा, संस्कृती आणि उत्क्रांतीबद्दल जाणून घेतले.
मुंबईत भेटीत या पत्रकारांनी पत्र सूचना कार्यालयाच्या महाराष्ट्रातील प्रादेशिक कार्यालय - पीआयबी मुंबई ला भेट देऊन अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्याशी संवाद साधला. स्मिता वत्स शर्मा यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांना संस्थेच्या या प्रादेशिक कार्यालयाचे कार्य, या कार्यालयाचे प्रादेशिक भाषेत माहिती प्रदान करण्यातले योगदान, कार्यालयाची डिजिटल उपस्थिती आणि कार्यालयाचे विकासात्मक संवाद उपक्रम याबद्दल माहिती दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या आपातकालीन कार्य केंद्राच्या (इओसी) कामकाजाची कल्पना दिली. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व समस्यांसाठी एकल-बिंदू स्रोत म्हणून इओसी वर्षभर चोवीस तास कार्य करते. या भेटीमुळे पत्रकारांना बीएमसी मुख्यालयाची इमारत पाहता आली साक्षीदार देखील झाले. मुंबईच्या मध्यभागी असलेली ही 128 वर्षे जुनी भव्य आणि नेत्रदीपक वारसा असलेली वास्तू खरोखरच एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे.
त्यानंतर पत्रकार फिल्मसिटीकडे निघाले आणि त्यांना रीलमागील वास्तव पाहण्याची संधी मिळाली.
माध्यम दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांनी भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे प्रदर्शन करणार्या भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिली.
यात त्यांना विविध कलाकृती, कियोस्कचा समावेश असलेले डिजिटल घटक, संवादात्मक डिजिटल स्क्रीन, माहितीवर आधारित स्क्रीन इंटरफेस चा अनुभव घेता आला.
महाराष्ट्राच्या राजधानीतील विकसित भारत संकल्प यात्रेची प्रगती पाहण्याची संधीही मुंबईने पत्रकारांना उपलब्ध करून दिली. मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात विकसित भारत संकल्प यात्रा व्हॅनचे कामकाज प्रसारमाध्यमांनी पाहिले. एका गजबजलेल्या चौकाजवळ उभ्या असलेल्या, व्हॅन मधले स्टॉल नागरिकांना विविध सरकारी कल्याणकारी योजनांची माहितीच देत नाहीत तर योजनांमध्ये नावनोंदणी आणि आरोग्य तपासणी व्यतिरिक्त विविध योजनांसाठी आवश्यक केवायसी अद्ययावत करण्याची सुविधा देखील देते हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिले.
नागरिकांच्या दारात प्रशासन पोहोचवणारा हा अनोखा उपक्रम गरीब आणि वंचित लोकांच्या उन्नतीसाठी कशा प्रकारे मदत करत आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी पत्रकारांनी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात एकूण 19 विकास भारत संकल्प यात्रा शहरी गाड्या कार्यरत आहेत; ज्या आत्तापर्यंत जवळपास 23 जिल्ह्यांत पोहोचल्या आहेत.आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध शहरांत एकूण 1350 ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेसाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उपक्रमांद्वारे जनजागृती करत विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात वेग घेत आहे.
माहिती, शिक्षण आणि संप्रेषण (IEC) अशा सुविधायुक्त गाड्या, देशभरातील विविध ठिकाणावर निघाल्या असून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी खुंटी, झारखंड येथून या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला होता. 25 जानेवारी 2024 पर्यंत, देशभरातील 2.60 लाख ग्रामपंचायती आणि 4000 हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचण्याचे या यात्रेचे उद्दिष्ट आहे.
सहा दिवस चालणारा माध्यम दौरा विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंतर्गत होत असलेला हा एक उपक्रम असून भारतातील विविध प्रदेशातील पत्रकारांना केंद्र सरकारच्या योजना आणि महाराष्ट्रात या उपक्रमांच्या प्रगतीबद्दल केवळ माहितीच नव्हे तर पत्रसूचना कार्यालयाच्या विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या विभागीय कार्यालयांबद्दल जाणून घेणे यामुळे सहजसाध्य झाले आहे.या दौऱ्यामुळे त्यांना देशाच्या इतर भागांतील त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दीर्घकाळ टिकणारे बंध निर्माण करता येत आहेत. आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासात भरभरून योगदान देणार्या आठवणी, अनुभव आणि शैक्षणिक खजिना घेऊन या दौऱ्यातले सहभागी महाराष्ट्रातून आपापल्या गावी रवाना झाले.
***
N.Chitale/S.Patil/S.Mukhedkar/G.Deoda/S.Patgaonkar/Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1995897)
Visitor Counter : 123