माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत संकल्प यात्रेचा हेतू, सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत तसेच एकूण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि दायित्व आणणे हा आहे : अनुराग सिंह ठाकूर


आत्मनिर्भर भारताचा मार्ग विकसित भारताकडे जात असून, युवकांनी ‘माय भारत पोर्टल’ वर येऊन विकसित भारतासाठी योगदान द्यावे: अनुराग सिंह ठाकूर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मुंबईत माहीम इथे विकसित भारत संकल्प व्हॅनला दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 10 JAN 2024 9:12PM by PIB Mumbai

मुंबई , 10 जानेवारी 2024

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मुंबईत माहीम इथे विकसित भारत संकल्प व्हॅनला हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. यावेळी बोलतांना, देशात गेल्या काही वर्षात झालेल्या विकासाबद्दल , ते म्हणाले- गेल्या दहा वर्षात देशात जे झाले, ते या आधी कधीही झाले नव्हते.

गरीबांसाठी चार कोटी पक्की घरे बांधण्यात आली.  यापैकी 80 टक्के घरे महिलांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. पूर्वी ग्रामीण भागात स्वच्छ शौचालये, स्वच्छ पाणी आणि स्वयंपाकाचा गॅस महिलांसाठी उपलब्ध नव्हता.  पण आता महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे. आता महिलांच्या डोक्यावर छप्पर आहे. बारा कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत आणि तेरा कोटी घरांमध्ये नळाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक गावात आता वीज आहे, दहा कोटी महिलांना आता उज्वला गॅस मोफत मिळाला आहे, साठ कोटी लोकांना आयुष्मान भारत अंतर्गत पाच लाख रुपयांचे मोफत उपचार मिळाले आहेत आणि ऐंशी कोटी भारतीयांना तीस महिन्यांपासून मोफत अन्नधान्य मिळते आहे. पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षांसाठीही मोफत शिधा देण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या काही वर्षांतील कारभारातील बदलांचा संदर्भ देत ठाकूर म्हणाले, 10 वर्षांत 140 कोटी लोकसंख्या असलेला देश आमूलाग्र बदलू शकत नाही. तथापि पंतप्रधान प्रामाणिकपणे काम करत असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक बदल घडवून आणता येतील. सध्याच्या सरकारने 4 कोटी बनावट शिधापत्रिका आणि 4 कोटी 20 लाख बनावट एलपीजी कनेक्शन शोधून ती अपात्र ठरवली आहेत. वाचवलेला पैसा गरिबांच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरला गेला. सरकारने व्यवसाय करणे सुलभ केले आहे. आगामी काळात अधिक अनुपालन सुलभ केले जातील. 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. यामुळे नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा, चांगले जीवन, चांगली अर्थव्यवस्था लाभेल आणि गरिबांचे कल्याण होईल.

गेल्या काही वर्षांत खेलो इंडियामुळे क्रीडा क्षेत्रात खूप विकास झाला आहे. भारत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विक्रमी पदके जिंकत आहे. आज 23 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे आणि 59 भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रशिक्षण केंद्रे आहेत. येत्या दोन महिन्यांत 1000 खेलो इंडिया केंद्रे उघडली जातील जिथे माजी खेळाडूंना ही केंद्रे चालवण्यासाठी दरवर्षी पाच लाख रुपये दिले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तरुणांच्या विकासासाठी असलेल्या विविध उपक्रमांचा संदर्भ देत, ठाकूर म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. सरकार द्वारे आता वैद्यकशास्त्रासारखे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये सुरू केले जात आहेत. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचे निकालही प्रादेशिक भाषेत दिले जात आहेत. मेरा युवा भारत अॅपद्वारे, कोणतीही व्यक्ती विकसित भारतासाठी योगदान देण्यामध्ये सहभागी होऊ शकते. या माध्यमातून तरुणांना अनुभवात्मक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. यंदाचा राष्ट्रीय युवा दिवस महाराष्ट्रातील नाशिक आणि देशभरात साजरा केला जाणार आहे.

शेवटी, सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेविषयी माहिती देताना ठाकूर म्हणाले, सरकारी योजनांचा लाभ लोकांच्या दारापर्यंत पोहोचवणे, हे विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट आहे. ही यात्रा देशभरातील दोन लाखांहून अधिक पंचायतींमध्ये पोहोचत आहे. आजपर्यंत 11 कोटी लोकांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेतला आहे. मुंबईतील विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ एक लाखाहून अधिक नागरिकांनी घेतला आहे. योजनांमध्ये आणि व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणे, हे विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड, माहीमच्या नगरसेविका शीतल पाटील यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

S.Kane/Radhika/Vasanti/Rajashree/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1995010) Visitor Counter : 165


Read this release in: English