विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

एम्स नागपूर इथे 13 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान महाट्रोपॅकॉन-2024 चे आयोजन


परजीवी संसर्गाचे निदान करण्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार

Posted On: 10 JAN 2024 3:56PM by PIB Mumbai

नागपूर, 10 जानेवारी 2024

एम्स नागपूरच्या सूक्ष्मजीव विभाग, इंडियन अकॅडमी ऑफ ट्रॉपिकल पॅरासिटोलॉजी (भारतीय उष्णकटिबंधीय परजीवीशास्त्र अकादमी) आणि विदर्भ असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट्स (व्हीएएमएम) यांच्या सहकार्याने, भारतीय उष्णकटिबंधीय परजीवीशास्त्र अकादमी च्या महाराष्ट्र शाखेची पहिली परिषद येत्या 13 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. या संदर्भात आज एम्सच्या परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठक यांनी ही माहिती दिली. परिषदेचे उद्घाटन, 13 जानेवारीला सकाळी 11 वाजता, एम्सच्या सभागृहात, प्रमुख पाहुणे, आयएटीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक, प्रा. डॉ. एस. सी. पारिजा यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी, आयएटीपीच्या सचिव डॉ. उज्ज्वला घोषाल, अकादमीच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा अनुराधा डे, सचिव, डॉ. गोपाल अग्रवाल, आयोजक सचिव डॉ. मीना मिश्रा आणि व्हीएएमएमचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सुरपम हे मान्यवरही उपस्थित राहतील.

'क्लिनिकल पॅरासिटोलॉजीः थिंकिंग बियॉन्ड मायक्रोस्कोपी "या संकल्पनेवर या महाट्रोपॅकॉन-2024 चे आयोजन करण्यात आले असून त्यात मलेरिया, फाइलेरिया, अमीबियासिस, हायडॅटिड सिस्टिक आजार, न्यूरोसिस्टिसर्कोसिस, हुकवर्म संक्रमण या सारख्या विविध आजारांचा समावेश असलेल्या उष्णकटिबंधीय परजीवीशास्त्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे परिषदेच्या आयोजक सचिव आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मीना मिश्रा यांनी सांगितले.  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रतिष्ठित अध्यापक, परजीवी संसर्गाचे निदान करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, मुक्त अमीबियासिस, मलेरिया परजीवी, दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग, परजीवी रोगांबाबत ‘एक आरोग्य’ दृष्टीकोन इत्यादी विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांना मार्गदर्शन करतील.

परिषदेचा सांगता समारंभ, 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता होईल. प्रमुख पाहुणे, डॉ. एस. सी. पारिजा यांच्यासह, विशेष सन्माननीय अतिथी म्हणून, न्यायवैद्यक आणि टॉक्सिकोलॉजी विभाग, एम्स, नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक आणि प्राध्यापक आणि प्रमुख, डॉ. मनीष श्रीगिरीवार, यवतमाळच्या व्हीएनजीएमसीचे माजी अधिष्ठाता डॉ. अशोक पाठक उपस्थित राहतील.

भारतीय उष्णकटिबंधीय परजीवीशास्त्र अकादमी (आयएटीपी) चा महाराष्ट्र शाखेतील विविध पदांची जबाबदारी नव्या नेतृत्वावर सोपवण्यात आली असून, अकादमीच्या अध्यक्ष म्हणून डॉ. अनुराधा डे, उपाध्यक्ष म्हणून डॉ. यज्ञेश ठाकर आणि डॉ. मीना मिश्रा, सचिव म्हणून डॉ. गोपाल अग्रवाल, खजिनदार म्हणून डॉ. छाया ए. कुमार आणि इतर राज्य पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.


S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1994863) Visitor Counter : 103


Read this release in: English