सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि अन्य भागीदार मिळून आंतरराष्ट्रीय सहसंयोजन आणि सहकार्याचे नवीन प्रारुप ( मॉडेल) सादर


‘प्राचीन शिल्पे: भारत, इजिप्त, असिरिया, ग्रीस, रोम’ उपक्रमाद्वारे, लॉस एन्जेलिस, बर्लिन आणि लंडनमधील वस्तू आणि कलाकृतींचा खजिना 2 डिसेंबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत पहायला मिळणार

Posted On: 09 JAN 2024 12:54PM by PIB Mumbai

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (सीएसएमव्हीएस म्युझिअम), डिसेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024, असे जवळपास एक वर्ष, जगभरातील काही वस्तुसंग्रहालयांमधील काही उत्तमोत्तम कलाकृती आणि वस्तू, पहायला मिळणार आहेत. ‘प्राचीन शिल्पे: भारत, इजिप्त, असिरिया, ग्रीस, रोम’ या उपक्रमाच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध होणार आहे. आपली विशेष आंतरराष्ट्रीय भागीदार असलेली, ‘द गेटी’, ‘द ब्रिटिश म्युझिअम’, ‘द स्टॅटलिश म्युझिन त्झू बेर्लिन’ ही जागतिक संग्रहालये आणि भारतातील काही आघाडीची संग्रहालये यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवत असल्याची माहिती, सीएसएमव्हीएस म्युझिअमने एका निवेदनाद्वारे दिली आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि भारताच्या ‘वसुधैव कुटूंबकम’ (संपूर्ण जग हे एक कुटूंब आहे) या मोहिमेच्या निमित्ताने, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने वाहिलेली ही एक अनोखी आदरांजली सादर करताना विशेष आनंद आणि अभिमान वाटत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी अतिशय उदारपणे  त्यांच्या संग्रहातील काही उत्तम कलाकृतींना मुंबईतील सीएसएमव्हीएस संग्रहालयामध्ये जवळपास एक वर्ष म्हणजे डिसेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही खरोखरच कृतज्ञ आहोत. शिवाय भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या पाठबळाबाबत त्यांचेही आम्ही आभारी आहोत, असेही  छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

या उपक्रमा बद्दल निवेदनात दिलेली माहिती:

भारतात आणि परदेशात अशा पद्धतीने पहिल्यांदाच होत असलेल्या या जागतिक पातळीवरील संग्रहालय सहसंयोजनाच्या निमित्ताने, भारतीय संग्रहालयांचे प्रमुख आणि संग्रहालय नियोजकांनी वस्तू संग्रहालयात मांडण्यासाठी  वस्तू आणि कलाकृती स्वतः  निवडल्या आहेत. भारतीय संग्रहालय नियोजकांनी या वस्तू इथे आणून  भारतीय पुरातन आणि पौराणिक संदर्भांशी प्राचीन ग्रीस आणि रोमच्या सांस्कृतिक इतिहासांना जोडले आहे. मुंबईतील सीएसएमव्हीएस संग्रहालयाच्या प्रमुख नियोजकांनी अन्य संग्रहालयातील सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या संग्रहातील वस्तूंसोबतच खास शिल्पे, प्रदर्शनासाठी निवडली आहेत.

‘प्राचीन शिल्पे: भारत, इजिप्त, असिरिया, ग्रीस, रोम’ या प्रकल्पाच्या माध्यमातून  भारतीय प्रेक्षकांना आणि विशेषतः भारतातील मुले आणि युवा वर्गाला पहिल्यांदाच प्राचीन मध्ययुगीन कलाकुसर आणि भारताच्या स्वतःच्या शिल्पकलेच्या परंपरेचा वारसा पाहण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळेल.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय (सीएसएमव्हीएस म्युझिअम) मुंबईचे महासंचालक श्री. सव्यसाची मुखर्जी म्हणाले, “आम्ही ‘प्राचीन शिल्पे: भारत इजिप्त असिरिया ग्रीस रोम’ या प्रकल्पाकडे एक महत्त्वाचा आणि अनोखा शैक्षणिक प्रकल्प म्हणून पाहतो. या प्रकल्पामुळे खासकरून इतर समाज आणि भूप्रदेशांच्या अनुषंगाने संस्कृतीचा अभ्यास केल्याने, आपल्या भारतीय मुलांना (विशेषतः असा जो मोठ्या प्रमाणात भारतीय तरुण वर्ग आहे ज्यांना कदाचित कधीही  विविध कला आणि संस्कृतींचा अनुभव घेण्यासाठी प्रवास करण्याची, सर्वत्र फिरण्याची संधी मिळत नाही) त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळेल. हा प्रकल्प केवळ स्थानिक पातळीवरच न राहता तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे ध्येय आहे आणि त्यामुळे कदाचित माहिती मिळवण्याच्या आणि शिकण्याच्या नवनवीन मार्गांचा परिचय होऊ शकतो; असे मार्ग जे शाळा आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकतात. म्हणूनच मोठ्या संख्येने तरुणांनी प्रदर्शनास भेट द्यावी आणि या प्रदर्शनातून बाहेर पडताना  केवळ प्राचीन भारतीय इतिहासाबाबतच नवीन दृष्टिकोन आणि समज घेऊन बाहेर पडावे असे नाही, तर जगातील नागरिक म्हणून त्यांचे स्वतःचे एक अभिमानस्पद स्थान आहे  याची त्यांना जाण यावी. या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सार्वजनिक कार्यक्रम (The Public programming), मेट्रो शहरांमध्ये पोहोचण्याचे अभियान (Metro city outreach initiative), विद्यापीठ कार्यक्रम (the Universities programm) आणि संग्रहालयाची विस्तारीत शैक्षणिक सेवा (the Museum’s extended education services) अशा योजना आखल्या आहेत.”

सव्यसाची मुखर्जी पुढे असेही म्हणाले, “भारतातील सुमारे 65 % लोकसंख्या, 25 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. गेली अनेक दशके शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मुले, प्राचीन इजिप्त, मेसापोटेमिया, ग्रीस आणि रोमबद्दल, पुस्तकी अभ्यास करत आहेत. मात्र आतापर्यंत विद्यार्थ्यांना या नागरी संस्कृतींनी निर्माण केलेल्या कोणत्याही महान कलाकृतींचा प्रत्यक्षदर्शी अभ्यास करता आलेला नाही.  आपल्या भारतीय मुलांना आणि प्रेक्षकांना विविध भूप्रदेश, अन्य संस्कृती आणि इतर समाजांच्या अनुषंगाने स्वतःच्या संस्कृतीकडे पाहण्याचे नवीन मार्ग आणि दृष्टी प्रदान करणारा एक अनोखा आणि महत्त्वपूर्ण असा शैक्षणिक उपक्रम म्हणून, आम्ही या प्रदर्शनाकडे पाहत आहोत.”

गेटी वस्तूसंग्रहालय:
संग्रही वस्तूंच्या आदानप्रदानाचा हा दीर्घकालीन प्रकल्प, गेटी या संग्रहालयाच्या दिलखुलास आणि उदारपणे केलेल्या मदतीमुळे  शक्य झाला आहे. या प्रकल्पातील
उपक्रमांचे विषय, प्राचीन संस्कृतींना आकार दिलेल्या परंपरांचा शोध घेणारे असतील. मानवी जीवनातील निसर्गाची भूमिका, दैवी स्वरूप आणि सौंदर्याची संकल्पना, अशा काही परंपरांचा तर आजही समाजावर पगडा आहे. संग्रहालयात भारतीय वस्तूंच्या संग्रहाशेजारी ठेवलेली, ही आदानप्रदानाद्वारे परदेशातून भारतात काही काळासाठी आलेली शिल्पे, प्राचीन जगाचे एकमेकांशी असलेले संबंध दर्शवतील आणि त्याच बरोबर भारताच्या सांस्कृतिक परंपरांचे अनन्यसाधारण प्राचीनत्व देखील दाखवतील.
भारावून टाकणारे दालन, ध्वनीयोजनेद्वारे (ऑडीओ) अनेक भाषांमधून उपलब्ध असलेली माहिती, आणि जगाच्या वेगवेगळया भागातील तज्ज्ञांनी प्रदर्शनाबाबत सांगितलेल्या महितीचे लघुपट, या सर्वांमुळे  प्रदर्शनाचा हा अनुभव आणखी समृद्ध होईल.

'गेटी' च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष  कॅथरिन फ्लेमिंग म्हणाल्या, “ यूरोपिय संग्रह आणि गेटीमधील कलाकृतींसह सीएसएमव्हीएसने आयोजित केलेले हे प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट असे आहे आणि ते या अभ्यासाकडे पाहण्याची आणि समजून घेण्याची एक नवी दृष्टी देईल. शिवाय यामुळे सीएसएमव्हीएस मधील स्वतःच्या वस्तू मोठ्या जागतिक पटलावर सर्वांसमोर येतील. वेगवेगळ्या जागतिक खंडांमधील वस्तूसंग्रहांच्या देवाणघेवाणीला पाठिंबा देणे हे आमचे यामागील उद्दिष्ट आहे.”

गेटीच्या वस्तूसंग्रह आदान प्रदान कार्यक्रमाचे (Sharing Collections Programme) सल्लागार नील मॅकग्रेगोर म्हणाले, “हे छोटेसे प्रदर्शन म्हणजे एक खूप मोठा प्रयोग आहे. इथे पहिल्यांदाच, प्राचीन जग यूरोपिय दृष्टिकोनातून नाही तर भारताच्या दृष्टिकोनातून पहिले आणि समजले जात आहे.”

स्टिफ्टुंग प्रुसिशर कुल्टुरबेसिट्झ संग्रहालयाचे (Stiftung Preußischer Kulturbesitz)  अध्यक्ष प्रा. डॉ. हेरमन पार्झिंगर म्हणाले, “सीएसएमव्हीएस सोबतची आमची ही महत्त्वाची दीर्घकालीन भागीदारी, आमच्या बर्लिन संग्रहालयासाठी भारतासोबतचे आमचे संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक स्वागतार्ह पाऊल आहे. आम्ही पुढील वर्षी 2025 मध्ये पुढील विशेष टप्प्यात,  सीएसएमव्हीएसमध्ये आमच्या संग्रहातील कलाकृती आणि वस्तुंची देवाणघेवाण करण्यासाठी उत्सुक आहोत.”

भारत आणि त्याची प्राचीन जगातील भूमिका:
भारत देशभरात आणि जगभरातही आपल्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना हा प्रकल्प प्राचीन जगाचा समृद्ध इतिहास आणि त्यात भारताचे स्थान अधोरेखित करतो. भारतीय उपखंडात आणि उपखंडाबाहेरही वैविध्यपूर्ण संकल्पना आणि संस्कृती निर्माण करून ती जतन करण्याची भारताची शतकानुशतकांची जुनी क्षमता आणि हजारो वर्षांची सांस्कृतिक देवाणघेवाण, या प्रदर्शनाद्वारे भारतीय युवावर्ग समजून घेऊ शकतील.

‘‘ प्राचीन जगाचे दालन (एन्शिअन्ट वर्ल्ड गॅलरी):
2025 या वर्षाच्या सुरुवातीला सीएसएमव्हीएस संग्रहालयामध्ये  प्राचीन जगाचे दर्शन घडवणाऱ्या एन्शिअन्ट वर्ल्ड गॅलरीचे म्हणजेच दालनाचे उद्घाटन होईल. या दालनात मांडण्यासाठी, जागतिक वस्तू संग्रहालये 100 हून जास्त वस्तू तात्पुरत्या काही काळासाठी देत, पुन्हा आपापल्या संग्रहांचे आदानप्रदान करतील. अशाप्रकारे ही महत्त्वाकांक्षी भागीदारी आपल्या सहकार्याच्या एकप्रकारे परमोच्च बिंदुवर येईल, असे या  सीएसएमव्हीएस संग्रहालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्यतः प्राचीन भारतीय साहित्य आणि प्रकल्प भागीदारांच्या वस्तू आणि चित्रे या माध्यमातून हे नवीन दालन, हडप्पा (सिंधु संस्कृती), मेसोपोटेमिया, इजिप्त आणि चीन या चार नदीकाठी फुललेल्या संस्कृतींवर लक्ष केंद्रीत करेल. पर्शियन, ग्रीक आणि रोमन जगतापर्यंत विस्तारत असतानाच, हे दालन या संस्कृतींच्या वारश्यावर, त्यांच्या परस्परसंबंधांवर आणि आजच्या जगावर त्यांचा प्रभाव अद्यापही कसा आहे, हे स्पष्ट करण्यावर भर देईल. प्राचीन जगाचे दालन देखील चार भागीदार संग्रहालयांचा एकत्रिक उपक्रम असेल आणि त्याला गेटीचे पाठबळ असेल.

प्रकल्पाचे भागीदार:
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित – आझादी का अमृत महोत्सव
(भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची यास मान्यता मिळाली आहे)

प्रकल्पाचे सादरकर्ते:
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई

सहभागीदार:
राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली
द ब्रिटिश म्युझिअम, लंडन
स्टाटलिश म्युझिन त्जू बेर्लीन प्रुसिशर कुल्टुरबेसिट्झ
द जे. पॉल गेटी म्युझिअम
बिहार संग्रहालय, पाटणा
पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय-मध्यप्रदेश

संयुक्त नियोजन:
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
द ब्रिटिश म्युझिअम, लंडन
स्टाटलिश म्युझिन त्जू बेर्लीन प्रुसिशर कुल्टुरबेसिट्झ
द जे. पॉल गेटी म्युझिअम

संलग्न विद्यापीठ शैक्षणिक कार्यक्रम :
द केंब्रिज यूनिवर्सिटी – ग्लोबल ह्युमॅनिटिज प्रोग्राम

मुख्य सहाय्य - गेटी
अतिरिक्त सहाय्य- सिटी थ्रू द सिटी –सीएसएमव्हीएस भागीदारी

अधिक माहितीसाठी आणि मुलाखतीच्या विनंतीसाठी यांना संपर्क साधा:


छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
awg@csmvs.in | +९१-०२२-६९५-८४४-०० (कार्यालय- लँडलाइन) |

गेटी- लॉस एन्जेलिस   

Alexandria Sivak | asivak@getty.edu | +१ ३१०-४४०-६४७३

द ब्रिटिश म्युझिअम, लंडन
स्टाटलिश म्युझिन त्जू बेर्लीन प्रुसिशर कुल्टुरबेसिट्झ, बर्लिन

संग्रहालय-विद्यापीठ भागीदारीसाठी नवीन मॉडेल:
संपूर्ण देशभरातील शाळा आणि विद्यापीठांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवून या उपक्रमाचा योग्य तो परिणाम साधला जाईल, तो वृद्धिंगत केला जाईल आणि दृढ केला जाईल. यामुळे या संदर्भातील विषय, शिक्षक आणि प्राध्यापकांना मूळ कलाकृतींसह शिकवता येतील. या उपक्रमाद्वारे सीएसएमव्हीएस संग्रहालयाच्या फिरत्या प्रवासी बसेस मधून ‘सिटी-सीएसएमव्हीएस संग्रहालय ऑन व्हील्स’ या फिरत्या लहान प्रदर्शनाचा लाभ देखील लोकांना घेता येईल. या प्रकल्पातून  मिळणारे शिक्षण हे ग्रामीण भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये देखील निश्चितच खोलवर रुजेल याची खात्री आहे.

संपूर्ण भारतीय उपखंडातील विद्यापीठांच्या गटांशी झालेल्या चर्चेतून एक महत्त्वाकांक्षी उपक्रम समोर आला आहे आणि तो केंब्रिज विद्यापीठाच्या जागतिक मानवता कार्यक्रमाच्या  (ग्लोबल ह्युमॅनिटीज प्रोग्राम) सहकार्याने विकसित केला जाईल. प्रकल्पांच्या दोन्ही टप्प्यांसाठी घेतलेल्या  मोठ्या कर्जामुळे, ठराविक काळासाठी मुंबईतील संग्रहालयात येणाऱ्या वस्तू आणि कलाकृतींच्या दृष्टिकोनातून, विद्यापीठांना  विशिष्ट अभ्यासक्रम तयार करणे शक्य होईल. दूरच्या विद्यापीठांसाठी दूरस्थपणे प्राथमिक शिक्षण दिले जाऊ शकेल आणि त्यानंतर मुंबई आणि इतर संग्रहालयांची भेट, अशी योजना देखील केली जाईल. भारतीय आणि प्रदेशी तज्ज्ञांची व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली जातील. यामध्ये त्या त्या देशांमधील मूळ नागरिक असलेले प्रमुख विशेषज्ञ सहभाग घेतील. अशाप्रकारे,  नवनवीन दृष्टीकोन समोर आणणारे अनेक प्रकारचे कार्यक्रम या अभियानामार्फत घेण्यात येतील.  

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया विषयी:

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला (सीएसएमव्हीएस म्युझिअम)  दरवर्षी अंदाजे दहा लाखांपेक्षा जास्त लोक भेट देतात. यामध्ये लहान मुले आणि तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. विद्यापीठे, शाळा आणि स्वयंसेवी संस्थांसोबत सातत्याने काम करणारे सीएसएमव्हीएस हे लोकांचा प्राधान्याने विचार करणारे असे एक सार्वजनिक संग्रहालय आहे. शिवाय हे संग्रहालय लोकांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेणारे आहे.  आज हे संग्रहालय आपल्या वार्षिक आर्थिक तरतुदींच्या 60 % पेक्षा जास्त गुंतवणूक, शिक्षण आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करतात.

भारताच्या 65 % पेक्षा जास्त लोकसंख्येचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे. भारतातील बहुतेक युवावर्ग, शाळा, विद्यापीठे, पुस्तके आणि लोकप्रिय समाजमाध्यमे यांच्या माध्यमातून सभोवतालच्या जगाचे प्राथमिक आकलन करतो.  या पार्श्वभूमीवर भारतीय संग्रहालये लोकांना, मूळ कलाकृतींच्या आधारे प्रत्यक्ष अनुभव घेऊन इतिहासाच्या खऱ्या पुराव्यांवर चिंतन आणि विचार करून, स्वतःचे निष्कर्ष काढण्याची संधी देतात, त्यांच्या आकलनात भर घालण्यात महत्त्वपूर्ण अशी पूरक भूमिका बजावू शकतात.

सीएसएमव्हीएसने व्याख्याने, चित्रपट, लघुपट आणि अन्य उपक्रमांच्या मालिकांची योजना आखली आहे. यातील बरेच उपक्रम महाराष्ट्रात आणि मुंबई बाहेरील बऱ्याच शहरांमध्ये होतील.

सध्या सुरु असलेला प्रकल्प, 2025 च्या सुरुवातीला सुरु होणाऱ्या ‘एन्शिअन्ट वर्ल्ड गॅलरी (प्राचीन जगाचे दालन)’ या मोठ्या प्रकल्पाची  प्रायोगिक स्वरुपातील जणू एक झलक आहे. हे दोन्ही प्रकल्प एकत्रितपणे जवळपास 50 लाख लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी 60 टक्के, शालेय आणि विद्यापीठातील विद्यार्थी असतील. शिवाय, 10 लाख लोकांपर्यंत, हे प्रकल्प डिजिटल माध्यमातून पोहोचण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पांमुळे औपचारिक शिक्षणामध्ये संग्रहालयांच्या भूमिकेला नव्याने अर्थ मिळू शकेल आणि त्यामुळे संग्रहालयांचे शैक्षणिक आणि सामाजिक योगदानही वाढेल.

***

ST/AS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994464) Visitor Counter : 139


Read this release in: English