संरक्षण मंत्रालय
व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला
Posted On:
03 JAN 2024 9:30PM by PIB Mumbai
मुंबई/नवी दिल्ली , 3 जानेवारी 2024
आयएनएस शिक्रा या नौकेवर आयोजित आकर्षक संचलन सोहोळ्यात एव्हीएसएम, एनएम सन्मानप्राप्त व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग यांनी आज 03 जानेवारी 2023 रोजी एव्हीएसएम, एनएम सन्मानप्राप्त व्हाईस ॲडमिरल दिनेश के.त्रिपाठी यांच्याकडून पश्चिमी नौदल कमांडचे (डब्ल्यूएनसी) फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (एफओसी-इन-सी)म्हणून पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीत उभारलेल्या सी मेमोरियलमधील गौरव स्तंभाजवळ पुष्पचक्र अर्पण करुनदेशसेवा करताना सर्वोच्च त्याग करणाऱ्या सर्व शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून सूत्रे हाती घेण्यापूर्वी व्हाईस ॲडमिरल संजय सिंग नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालयात नौदल कर्मचारी वर्गाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
व्हाईस ॲडमिरल संजय सिंग हे पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे पदवीधारक असून ते 1986 मध्ये भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत दाखल झाले. त्यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय नौदलातील बहुतांश श्रेणीच्या जहाजांवर काम केले आणि नौदलाचे सहाय्यक प्रमुख (दळणवळण, अवकाश आणि नेटवर्क-सेंट्रीक ऑपरेशन्स (सीएसएनसीओ)), फ्लॅग ऑफिसर सी ट्रेनिंग, पश्चिमी ताफ्याचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर, कमांडंट नेव्हल वॉर कॉलेज आणि कंट्रोलर पर्सोनेल सर्व्हिसेस आणि एकात्मिक संरक्षण कर्मचारी वर्गाचे उपप्रमुख (ऑपरेशन्स) यांसह विविध श्रेणीच्या कमांड, प्रशिक्षण, कर्मचारी नियुक्त्या विभागांमध्ये काम केले आहे.
भारतीय नौदल तत्वप्रणाली 2009, परिवर्तनासाठी धोरणात्मक मार्गदर्शन 2015 तसेच भारतीय सागरी सुरक्षा धोरण 2015 यांचा मसुदा तयार करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती.
व्हाईस ॲडमिरल संजय सिंग यांनी 1992 मध्ये दिशादर्शन आणि संचालन यामध्ये विशेष प्राविण्य मिळवले आणि युके येथे झालेल्या अडव्हांस कमांड आणि स्टाफ कोर्स मध्ये भाग घेतला.त्यांनी 2009 मध्ये मुंबई येथील नेव्हल वॉर कॉलेज येथून नेव्हल हायर कमांड अभ्यासक्रम पूर्ण केला तसेच वर्ष 2012 मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून राष्ट्रीय सुरक्षा धोरण अभ्यासक्रम पूर्ण केला.
व्हाईस ॲडमिरल संजय सिंग यांनी संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास या विषयात मद्रास विद्यापीठातून एमएससी तसेच एमफिल पदवी, लंडन येथील किंग्स कॉलेजमधून संरक्षण अभ्यास या विषयात एमए पदवी तसेच मुंबई विद्यापीठातून एमए (इतिहास), एमफिल (पीओएल) आणि पीएचडी (कला) अशा पदव्या संपादन केल्या आहेत. नौदलातील त्यांच्या विशेष सेवेसाठी त्यांना वर्ष 2009 मध्ये नौसेना पदक देऊन तर 2020 मध्ये अति विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले आहे.
व्हाईस ॲडमिरल दिनेश के.त्रिपाठी आता नवी दिल्ली यथील नौदल मुख्यालयात नौदलाचे उपप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतील.
R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1992927)
Visitor Counter : 91