विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सार्वजनिक सहभागाद्वारे सीएसआयआर -राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने केला 59 वा स्थापना दिवस साजरा
स्थापना दिनानिमित्त गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्याख्यान देत, सागरी क्षेत्राभिमुख संशोधनाला बळ देण्यासाठी राज्यातील उपक्रमांना पाठिंबा दिल्याबद्दल एनआयओचे केले कौतुक
Posted On:
02 JAN 2024 8:10PM by PIB Mumbai
गोवा, 2 जानेवारी 2024
सीएसआयआर -राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने (एनआयओ) आपला 59 वा स्थापना दिवस साजरा केला. यानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यासह, शैक्षणिक संधी आणि अभ्यासपूर्ण चर्चांनी हा दिवस साजरा झाला.
दोना पावला स्थित या संस्थेने 1 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते 11.30 पर्यंत लोकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत समुद्रशास्त्रीय संशोधनामधील आश्चर्य पाहण्यासाठी अभ्यागतांचे स्वागत केले. सागरी मत्स्यालय, संशोधन जहाजांचे नमुने, समुद्रशास्त्रीय संशोधन साधनांचे प्रात्यक्षिके, यासह अनेक आकर्षणे या प्रदर्शनांमध्ये पाहुण्यांना पाहता आली. त्याचप्रमाणे लोह, मॅंगनीज, तांबे, निकेल आणि कोबाल्ट यांसारख्या धातूंमध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या सागरी खनिजांचे नमुने दाखवण्यात आली या व्यतिरिक्त, प्राचीन जहाजांचे भग्नावशेष आणि सागरी पुरातत्व स्थळांवरून शोधून काढलेल्या कलाकृतींनी सागरी इतिहासातील सूक्ष्म दृष्टिकोन प्रदान करत अभ्यागतांना मंत्रमुग्ध केले.

सीएसआयआर-एनआयओच्या स्थापना दिनानिमित्त एनआयओच्या सभागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले व्याख्यान हे संध्याकाळचे मुख्य आकर्षण होते. आपल्या जीवनावर आणि पर्यावरणावर सागरी विज्ञानाचा सखोल प्रभाव अधोरेखित करणारे सावंत यांचे भाषण "समुद्रशास्त्र आणि समाज" च्या महत्वाच्या मुद्द्यावर केंद्रित होते. मुख्यमंत्र्यांनी सीएसआयआर -एनआयओची या क्षेत्रातील अनन्यसाधारण योगदानाबद्दल प्रशंसा केली तसेच पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सागरी क्षेत्राभिमुख संशोधन बळकट करण्यासाठी गोव्याच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
या भाषणा दरम्यान डॉ. सावंत यांनी सीएसआयआर-एनआयओच्या आगामी 60 व्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. आणि गोवा आणि अन्य राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संस्थेच्या वाढीव जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या महत्त्वावर भर देऊन, त्यांनी पुढील पिढीला विज्ञान आणि समुद्रशास्त्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. डॉ. सावंत यांनी एक प्रमुख संस्था आणि राष्ट्रासाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून एनआयओच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
सीएसआयआर -एनआयओचे प्रा. संचालक सुनील कुमार सिंह यांच्या स्वागतपर भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य शास्त्रज्ञ आणि स्थापना दिनाचे अध्यक्ष डॉ.सनील कुमार यांनी आभार प्रदर्शन केले.
महासागर विज्ञान अत्याधुनिक करणे, सार्वजनिक सहभाग वाढवणे आणि भविष्यातील पिढ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढवणे या संस्थेच्या वचनबद्धतेची साक्ष म्हणून स्थापना दिन साजरा करण्यात आला.
* * *
PIB Panaji | S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1992518)
Visitor Counter : 104