माहिती आणि प्रसारण मंत्रालय
देशाला विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करुया -केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
विकसित भारत संकल्प यात्रेला राज्यमंत्री भारती पवार यांची भेट
शिंगणापूर येथील शासकीय योजनांच्या यात्रेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत शिंगणापूरचे कार्य उल्लेखनीय
Posted On:
01 JAN 2024 4:41PM by PIB Mumbai
कोल्हापूर, 1 जानेवारी 2024
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन नागरिकांना सक्षम बनवूया. देशाला आणखी विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प या नववर्षाच्या सुरुवातीला करुया, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी केले.
करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेतील चित्ररथाचे फित कापून अनावरण करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आला. दीपप्रज्वलनाने संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावेळी त्यांनी विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, गट विकास अधिकारी विजय यादव, विस्तार अधिकारी अनिल कटारे व संदेश भोईटे, उपसरपंच सुवर्णा आवळे, ग्रामसेवक गायत्री जाखलेकर तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, विकसित भारत संकल्प यात्रा हा गावागावातील लोकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देणारा मेळावा आहे. या यात्रेतील चित्ररथ म्हणजे नागरिकांना हमखास लाभ मिळवून देणारी "गॅरेंटीवाली गाडी" आहे, अशा शब्दात त्यांनी या यात्रेचे कौतुक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना 20 लाखापर्यंत कर्ज वाटप करण्यात येत आहे. याचा लाभ घेऊन महिलांनी उद्योग, व्यवसाय उभारुन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील 80 कोटी नागरिकांना रेशन देणारा भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात विविध योजनांचा लाभ खूप चांगल्या पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. शिंगणापूर गावातील प्रत्येक नागरिकाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड वितरण झाल्यामुळे शिंगणापूर हे खऱ्या अर्थाने आयुष्मान गाव झाल्याचा आनंद आहे. केंद्र सरकारच्या योजना जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने पोहोचवून जिल्ह्याने वेगळेपण दाखवून दिले आहे, अशा शब्दांत त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह सर्व विभागांच्या कामाचे कौतुक केले.
जिल्ह्याला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आवश्यक ती उपकरणे व साहित्य पुरवण्यासाठी 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यापुढेही आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेमुळे नागरिकांना त्यांच्या गावातच विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. महिलांच्या आरोग्याची दखल घेऊन 'चूल मुक्त देश' घडवण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गोरगरिबांच्या घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी 'हर घर नल.. हर घर जल' ही योजना तर गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना अंमलात आणली आहे. केंद्र सरकारच्या वतीने आरोग्यविषयक विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. तर जनधन योजनेमुळे सर्वसामान्यांचेही बँक खाते तयार झाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम पोहोचत असून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. प्रधानमंत्री यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यासह देशातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्टेशन, उड्डाणपूल यांसह अनेक विकासकामे गतीने होत आहेत. यामुळे जिल्ह्यासह देश प्रगती साधत आहे.
संकल्प यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्या त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी यंत्रणेला दिल्या. ते म्हणाले, गावागावात संकल्प यात्रेचे आयोजन करुन जिल्ह्यातील गावागावांतील जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड आभा कार्ड दिले जात आहे. विश्वकर्मा योजनेतून व्यावसायिकांच्या वृद्धीवर भर दिला जात आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, अन्न सुरक्षा योजनेसह विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचे सांगून शिंगणापूर येथील कार्यक्रमासाठी नागरिक व ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजना, बँकेच्या विविध योजना, महिलांसाठी काम करणारे उमेद, जलजीवन मिशन अशा अनेक योजनांच्या स्टॉल्स मधून लोकांना माहितीसह योजनांचा लाभ देण्यात येत आहे. ही मोहीम पुढे २६ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाचा भर राहील, असा विश्वास श्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्रधानमंत्री किसान योजना, प्रधानमंत्री उज्वला योजनांचे लाभार्थी तसेच बचत गटाच्या माध्यमातून 9 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळालेल्या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
शिंगणापूर येथील विकसित भारत संकल्प यात्रेत गावातील लाभार्थी नागरिक, शेतकरी महिला व पुरुष यांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. शिंगणापूर येथे उभारण्यात आलेल्या विविध योजनांच्या स्टॉल्स मधून गावातील नागरिकांना लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य स्वाती पाटील यांनी मानले.
* * *
(Source: DGIPR, Kolhapur) | PIB Mumbai | MC/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1992137)
Visitor Counter : 107