अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने येत्या 3 जानेवारी 2024 रोजी आयोजित लिलावाअंतर्गत 17500 मेट्रिक टन गहू आणि 5000 मेट्रिक टन कच्च्या तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार
Posted On:
30 DEC 2023 5:18PM by PIB Mumbai
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने गहू आणि कच्च्या तांदळाचा लिलाव जाहीर केला आहे. येत्या 3 जानेवारी 2024 रोजी हा लिलाव होईल. या लिलावाअंतर्गत 17500 मेट्रिक टन गहू आणि 5000 मेट्रिक टन कच्च्या तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. खाद्यान्न प्रक्रिया उद्योजक / पीठ गिरण्या उद्योजक / गव्हापासून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचे उद्योजक तसेच तांदळाचे व्यापारी / घाऊक खरेदीदार / उत्पादक या लिलावात सहभागी होऊ शकणार आहेत. या लिलावाकरता गव्हाच्या साठ्यासाठीची 13500 मेट्रिक टनाची मर्यादा वाढवून ती 17500 मेट्रिक टन केली गेली आहे. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्र विभागांतर्गतच्या एकूण 25 धान्यसाठा आगारांमधून गव्हाचा हा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर एकूण 9 धान्यसाठा आगारांमधून तांदळाचा 5000 मेट्रिक टनाचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
याअंतर्गत खाद्यान्न प्रक्रिया उद्योजकांना सर्व क्षेत्रांसाठी एकाच ई-लिलावात प्रत्येकी कमीत कमी 10 मेट्रिक टनासाठी बोली लावता येईल, तर सगळ्या बोली मिळून कमी दाबाची एकके (Units with LT Connection) चालवणाऱ्यांना 50 मेट्रिक टनापेक्षा जास्त, तर उच्च दाबाची एकके चालवणाऱ्यांना (Units with HT Connection) 250 मेट्रिक टनापेक्षा जास्त बोली लावता येणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. वीज बिलावर जोडणीचा प्रकार नमूद नसेल तर 1 ते 75 किलोव्होल्ट-अँपिअर (KVA) पर्यंतच्या मंजुरीच्या भाराची जोडणी कमी दाबाचे एकक म्हणून ग्राह्य धरली जाईल. मात्र ही अट केवळ गव्हासाठी लागू असेल, तर तांदळासाठी प्रति निविदाकार बोलीची किमान मर्यादा 1 मेट्रिक टन आणि जास्तीत जास्त 2000 मेट्रिक टन असेल असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.
भारतीय अन्न महामंडळाने (FCI) गहू आणि तांदळाचा साठा खरेदी करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांकरता, मान्यताप्राप्त खरेदीदारांची सूची तयार करायला सुरूवात केली आहे. यासाठी उत्सुक असलेले खरेदीदार भारतीय अन्न महामंडळाची ई लिलाव सेवा पुरवठादार असलेल्या 'एम-जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेड' (https://www.valuejunction.in/fci/) या कंपनीच्या संकेतस्थळावरून या यादीत स्वतःचा समावेश करून घेऊ शकतात आणि विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या धान्यसाठ्याकरता बोली लावू शकतात. अशा तऱ्हेने स्वतःची नोंदणी करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांची नोंदणी प्रक्रिया 72 तासांच्या पूर्ण केली जाते. भारतीय अन्न महामंडळाने (FCI) खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत [OMSS - Open Market Sale Scheme(D)] 2023 मध्ये जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून (28 जून 2023) गहू आणि तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याला सुरवात केली होती.
खुल्या बाजारातील विक्री योजनेमुळे [OMSS - Open Market Sale Scheme (D)] अन्नधान्यांच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यास मदत होणार असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
***
M.Pange/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1991812)
Visitor Counter : 97