अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

प्रीव्हल- रक्तपेशींच्या गंभीर कर्करोगावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या, मर्केप्टोप्यूरिनचा पहिला आणि एकमेव मौखिक डोस टाटा मेमोरियल केंद्र आणि डीएई ने केला विकसित


टाटा मेमोरियल केंद्राचे वैज्ञानिक आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्यातून, भारतातील मर्केप्टोप्यूरिनचे पहिल्या आणि एकमेव मौखिक औषध झाले उपलब्ध

Posted On: 29 DEC 2023 8:13PM by PIB Mumbai

मुंबई, 29 डिसेंबर 2023

मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नवी मुंबईतील, कर्करोग संशोधन आणि शिक्षण प्रशिक्षणाचे अत्याधुनिक केंद्र, (ACTREC) यांनी बंगळुरूच्या  आयडीआरएस लॅब्स सोबत, सहकार्य करत, देशात, मर्कॅप्टोप्यूरिनचा पहिला आणि एकमेव मौखिक डोस, 6 – मर्कॅप्टोप्यूरिन (6-एमपी) विकसित केले आहे. 6-एमपी हे रक्तपेशींच्या गंभीर स्वरूपाच्या कर्करोगात, जो साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळतो, त्यात किमोथेरपीचे औषध म्हणून वापरले जाते. त्यामुळे, लहान मुलांना सहजपणे घेता येईल, असं हे भुकटीस्वरूपातील मौखिक औषध, प्रीव्हल (PREVALL) या नावाने बाजारात आले आहे.

प्रीव्हल, सहजपणे  10 मिलि ग्राम/मिलि लीटरचा डोजपासून 100 मिलीचे मौखिक औषध तयार केले जाऊ शकते. प्रीव्हल सोबत एक सिरिंज आणि एक प्रेस इन बॉटल अडॅप्टर (पी. आय. बी. ए.) असते, यामुळे  रुग्णाच्या शरीराच्या वजनाच्या किंवा शरीराच्या आकारमानानुसार अचूक डोस देणे शक्य होते.  यामुळे  सायटोटॉक्सिक संयुगांच्या संपर्कात येण्याचा धोका देखील यामुळे कमी होऊ शकतो.

प्रीव्हल विकसित होण्यामुळे, संशोधकांनी, कर्करोग उपचार प्रवासातला एक मैलाचा दगड गाठला आहे. करण सध्या या औषधाच्या गोळ्या उपलब्ध आहेत, मात्र, त्यामुळे, अचूक मात्रा, लवचिकता, रुग्णाची सहन करण्याची क्षमता, अशी सगळी आव्हाने असतात.

आतापर्यंत, मुलांमधील मात्रेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोळी कुटून त्याची भुकटी देणे किंवा एक दिवसाआड डोस देणे अशा पद्धती अवलंबल्या जात होत्या.

नियामक मान्यता :  प्रीव्हलला भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून मान्यता मिळाली आहे. या नियामक मंजुरीत, प्रीव्हलची सुरक्षितता आणि अनुपालनावर भर देण्यात आला असून, त्यामुळे आरोग्यसेवा देणारे व्यावसायिक आणि रुग्ण दोघांनाही त्याची परिणामकारकता आणि गुणवत्तेबद्दल खात्री बाळगता येईल. टाटा मेमोरियल सेंटर आणि आय. डी. आर. एस. लॅब्सने संयुक्तपणे क्लिनिकल अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केले. अलीकडेच पीडियाट्रिक ब्लड अँड कॅन्सर या वैज्ञानिक नियतकालिकात या निष्कर्षांना नियामक मान्यता मिळाली आहे.

बाजारातील उपलब्धता : 6-मरकॅप्टोप्युरिनचे ड्राय पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असलेले फार्मास्युटिकल सस्पेंशन हे आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडचे पेटंट नोंदवलेले तंत्रज्ञान आहे. आयडीआरएस लॅब्सने 25 नोव्हेंबर 2023 रोजी चेन्नई येथे PHOCON परिषदेत PREVALL या कर्करोगावरील औषधाचे अधिकृत अनावरण केले. हे औषध डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आणि लवकरच ते देशभरातील सर्व प्रमुख रुग्णालयाच्या औषधालयात  उपलब्ध असेल. ॲक्युट लिंफोब्लास्टीक ल्युकेमिया (ALL) या कर्करोगाच्या प्रकाराचे निदान झालेल्या 1-10 वयोगटातील अंदाजे 10,000 मुलांना दरवर्षी PREVALL चा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.

ॲक्युट लिंफोब्लास्टीक ल्युकेमिया सारख्या सर्व बऱ्या करता येण्याजोग्या कर्करोगाचे निदान झालेल्या  मुलांची   सर्वोत्तम संभाव्य काळजी घेतली जावी,   आणि औषधाच्या मात्रेचे सर्वोत्तमीकरण करणे, औषध घेण्याच्या नियमांचे पालन सुधारण्यासाठी आणि औषधांचा  प्रभाव जास्तीत जास्त वाढवण्यात PREVALL सारखी औषधे  मदत करतील, असे टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख, डॉ. गिरीश चिन्नास्वामी, यांनी सांगितले.

PREVALL हे भारतीय परिस्थितीसाठी सर्वात अनुकूल अशी औषधे तयार करणाऱ्या भारतीय बायोफार्माच्या अंतर्निहित सामर्थ्याचे आणि गहनतेचे प्रकटीकरण आहे, असे निरिक्षण टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या कर्करोग उपचार, संशोधन, आणि शिक्षण संस्थेतील (ACTREC) क्लिनिकल फार्माकोलॉजी या विषयाचे प्राध्यापक डॉ. विक्रम यांनी नोंदवले.  "ओरल सस्पेन्शनसाठी (तोंडावाटे दिले जाणारे औषध) वापरली जाणारी पावडरची   परिणामकारकता उष्ण किंवा दमट हवामानात देखील कायम राहील याप्रकारे ही पावडर तयार करण्यात आली  आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय ही  पावडर जगात इतरत्र उपलब्ध असलेल्या द्रवरूप औषधांपेक्षा पूर्णपणे  वेगळी  आहे," असेही त्यांनी सांगितले. 

PREVALL ने बालरोग हिमॅटो-ऑन्कोलॉजीमधील (रक्तपेशींचा कर्करोग) वैद्यकीय उपचारांमध्ये पोकळी भरून काढली आहे, अशी टिप्पणी मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटरसधील शैक्षणिक विभागाचे संचालक तसेच जेष्ठ पेडियाट्रिक हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट  डॉ. बाणावली यांनी केली.  6-मर्कॅपटोप्युरिनचे द्रवरूप औषध युरोप आणि अमेरिकेत बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. अशी माहिती त्यांनी दिली. भारत आणि इतर विकसनशील देशांमधील मुलांना विकसित देशांमध्ये कर्करोगाचा मानक उपचार म्हणून वापरली जाणारी औषधे उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

मुंबई येथील टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी उत्तम सहयोगी प्रयत्नांची प्रशंसा केली आणि नवीन औषधे आणि फॉर्म्युलेशन उपलब्धता सुधारण्यासाठी शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यात अशा अधिक सहकार्याची गरज आहे यावर भर दिला.  CAR-T या पेशी आधारित उपचार पद्धतीचे उदाहरण देऊन टाटा मेमोरियल सेंटर नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. टाटा मेमोरियल सेंटरने अलीकडेच अशा सहकार्याच्या माध्यमातून या उपचार पद्धतीचा पाया घातला आहे, असेही ते म्हणाले.

हा विकास आरोग्यसेवेतील  गरज आणि नवोन्मेष यातील अंतर भरून काढण्यासाठी शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगाच्या हितसंबंधांच्या एककेंद्राभिमुखतेचे फलित आहे, असे अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी सांगितले.समाजाच्या कल्याणासाठी नवोन्मेष प्रयोगशाळेतून प्रत्यक्षात साकारण्याच्या उद्देशाने विभागाच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

S.Bedekar/R.Aghor/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1991630) Visitor Counter : 93


Read this release in: English