शिक्षण मंत्रालय
छत्तीसगडच्या युवा संगम प्रतिनिधींनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची घेतली भेट; राजभवनाला देखील दिली भेट
Posted On:
22 DEC 2023 6:17PM by PIB Mumbai
पणजी, 22 डिसेंबर 2023
एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) कार्यक्रमातील महत्त्वाचा घटक असलेल्या युवा संगम उपक्रमाअंतर्गत गोवा राज्याच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या छत्तीसगडमधील विद्यार्थ्यांच्या चमूने गुरुवार, 21 डिसेंबर 2023 रोजी पोर्वोरीम येतील सचिवालयात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी या तरुण पाहुण्यांसोबत सुमारे दीड तास व्यतीत केला. विविध पार्श्वभूमी असलेले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे 45 विद्यार्थी आणि पाच अधिकारी यांच्या गटासोबत मुखमंत्र्यांनी देशाच्या समग्र विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.
उपस्थित प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना पर्यावरण आणि शाश्वत विकास ध्येयांप्रती राज्याच्या कटिबद्धतेबाबत प्रश्न विचारले. उत्तरादाखल मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले की या राज्याला ‘आमचे गोवा, शोभित गोवा’ असे रूप देणे हे त्यांचे अभियान आहे. तसेच सामुहिक फायद्यासाठी ‘स्वयं से पहले आप’ चे संयुक्त वचन घेण्यात आले असे त्यांनी सांगितले.प्रत्येकाने https://mybharat.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करुन,भारताच्या स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीला विकसित भारत-2047चे स्वप्न साकारण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी तेथे उपस्थित सर्वाना केले.

डॉ.सावंत यांनी गोव्याचा सूर्यप्रकाश, वाळू आणि समुद्र यांच्यासोबतच या राज्याला विज्ञानातील पुढाकारासाठी प्रसिध्द करण्याच्या त्यांच्या योजनेविषयी माहिती दिली. राज्यात असणाऱ्या आयआयटी, एनआयटी, एनआयओ,एनसीपीओआर, गोवा गोदी आणि गोवा विज्ञान केंद्र यांसह इतर अनेक वैज्ञानिक संस्थांविषयी त्यांनी माहिती दिली.गोवा राज्याला अध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून नावारूपाला आणण्याच्या त्यांच्या संकल्पनेविषयी देखील त्यांनी माहिती दिली तसेच राज्यात दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आयुष रुग्णालयाचा संदर्भ देखील दिला. गोवा राज्याची वृद्धी आणि विकास यांचा भाग होण्यासाठी त्यांनी या प्रतिनिधींना आमंत्रित केले. युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार स्तंभांवर आधारलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. येत्या काळात छत्तीसगड राज्याशी संबंध जोडण्यात गोवा राज्याला नेहमीच आनंद वाटेल अशी ग्वाही डॉ.सावंत यांनी यावेळी दिली.
विद्यार्थ्यांच्या या प्रतिनिधीमंडळाने राज भवनाला देखील भेट दिली आणि राज्यपालांचे सचिव असलेले सनदी अधिकारी एम.आर.एम.राव यांच्याशी संवाद साधला. राज भवनाच्या इमारतीच्या, विशेषतः या इमारतीच्या भारतीय आणि पोर्तुगीज वास्तुरचनेच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली.छत्तीसगड राज्याचा स्थापनादिन, गोव्याच्या राजभवनात 1 नोव्हेंबर 2000 रोजी सर्वप्रथम साजरा करण्यात आला याकडे राव यांनी निदेश केला.
या महिन्याच्या सुरुवातीला, युवा संगम कार्यक्रमाअंतर्गत गोव्याच्या एनआयटी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या गटाने छत्तीसगडला भेट दिली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नोव्हेंबर 2023 मध्ये युवा संगम कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ केला. या कार्यक्रमाअंतर्गत, देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणारे 18 ते 30 वर्षे या वयोगटातील विद्यार्थी त्यांच्या राज्याशी संलग्न राज्याला भेट देतात.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून प्रेरणा घेत, ईबीएसबी अंतर्गत युवा संगम हा उपक्रम सुरु करण्यात आला. हा उपक्रम प्रयोगात्मक शिक्षण आणि भारताच्या समृद्ध विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञान आत्मसात करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो.ही सातत्याने सुरु राहणारी सांस्कृतिक देवाणघेवाणीची प्रक्रिया असून विविधतेचा उत्सव या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थी, जीवनाचे विविध पैलू, नैसर्गिक भूभाग, विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे, नजीकच्या काळातील सफलता आणि यजमान राज्यातील युवकांशी संवाद अशा विविध घटकांबाबत गुंगवून टाकणारा अनुभव घेतात.युवा संगम उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशातील 20 सुप्रसिद्ध संस्था निश्चित करण्यात आल्या असून त्या अंतर्गत गोव्याच्या एनआयटी संस्थेला छत्तीसगड मधील भिलई येथील आयआयटीशी जोडण्यात आले आहे.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1989674)
Visitor Counter : 110