शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

छत्तीसगडमधील युवा संगममच्या प्रतिनिधींनी गोव्याला दिली भेट

Posted On: 17 DEC 2023 9:37PM by PIB Mumbai

 

भारत सरकारने सुरू केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB) कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या युवा संगमम उपक्रमांतर्गत सहा दिवसांच्या दौऱ्याअंतर्गत  छत्तीसगडमधील विद्यार्थ्यांचा गट आज गोव्यात दखल झाला. वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 45 विद्यार्थी यांच्यासह पाच अधिकारी यांच्या चमूला गोव्याच्या एनआयटीचे संचालक प्रा. ओ आर जयस्वाल, गोव्याच्या एनआयटीचे रजिस्ट्रार डॉ. शशिधर कुडारी आणि इतर अधिकारी यांनी मडगाव रेल्वे स्थानकावर या शिष्टमंडळाचे स्वागत केले.

यावेळी उपस्थित प्रतिनिधींसाठी एनआयटी येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.या समारंभाला क्रीडा, सांस्कृतिक आणि ग्रामविकास मंत्री  गोविंद गावडे  उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करताना मंत्री म्हणाले की, युवा संगमम या कार्यक्रमाचा उद्देश तरुणांना राष्ट्राची ताकद बनण्यासाठी प्रशिक्षित करणे हा आहे, ज्यामुळे भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी मदत होईल.

"विकसित भारत हे आता आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. आणि हे स्वप्न स्वप्न साकार करण्यात विद्यार्थी समुदायाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करून आपापल्या व्यवसायात अधिकाधिक ज्ञान मिळवावे अशी माझी इच्छा आहे. यामुळे संपूर्ण देशाला आपले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत होईल असेही मंत्री यावेळी म्हणाले.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एम.एस. कृपाशंकर,एनआयटी गोवाचे संचालक प्रा.ओ.आर. जयस्वाल आणि युवा संगमम उपक्रमाचे केंद्र सरकारचे प्रतिनिधी सुरेंद्र नाईक हे यावेळी देखील उपस्थित होते.

एक्सपोजर टूरचा एक भाग म्हणून प्रतिनिधींनी आज जुने गोवा आणि पोंडा येथील वारसा स्थळांना भेट दिली.  22 डिसेंबरला हा गट आपल्या राज्यात रवाना होण्यापूर्वी त्यांना राज्यातील सर्व महत्त्वाच्या स्थळांची आणि खास आकर्षण असलेल्या स्थळांची सैर घडवण्यात  येईल.

या महिन्याच्या सुरुवातीला, एनआयटी गोव्यातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने युवा संगम कार्यक्रमांतर्गत छत्तीसगडला भेट दिली होती.  शिक्षण मंत्रालयाने नोव्हेंबरमध्ये युवा संगमचा तिसरा टप्पा सुरू केला होता. या टप्प्यात देशभरातील 18-30 वर्षे वयोगटातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांची जोडी जमवण्यात आलेल्या राज्यांना भेट देतील. तिसर्‍या टप्प्यांतर्गत असे सुमारे 20 दौरे केले जातील.

एक भारत श्रेष्ठ भारत' अंतर्गत सुरू करण्यात आलेला युवा संगम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून प्रेरित असून प्रायोगिक शिक्षणावर आणि भारतातील समृद्ध विविधतेचे ज्ञान आत्मसात करण्यावर लक्ष केंद्रित करतो. ही विविधतेच्या उत्सवाच्या रुपात निरंतर सुरू असलेली सांस्कृतिक देवाणघेवाण आहे ज्यामध्ये सहभागींना जीवनाच्या विविध पैलूंचा, नैसर्गिक भूस्वरूपांचा, विकासाच्या खुणांचा, अलीकडील कामगिरी   आणि यजमान राज्यातील तरुणांशी  जोडणारा अनुभव मिळतो.  युवा संगमच्या तिसर्‍या टप्प्यासाठी भारतभरातील वीस प्रख्यात संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत एनआयटी गोव्याची छत्तीसगडमधील आयआयटी भिलाई बरोबर जोडी जमवण्यात आली आहे.

***

N.Chitale/V.Yadav/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1987559) Visitor Counter : 56


Read this release in: English