माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेला (शहरी)    हिरवा झेंडा दाखवून केली  रवाना

Posted On: 17 DEC 2023 6:21PM by PIB Mumbai

 

गोव्यात  नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांनी आज, 17 डिसेंबर 2023 रोजी डोना पॉउला येथे आयोजित कार्यक्रमात विकसित भारत  संकल्प यात्रेला (शहरी) हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. ही यात्रा पणजी महानगरपालिका आणि राज्यातील सर्व 13 नगरपालिका क्षेत्रा मधून 23 दिवस फिरणार आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल शहरी भागातील जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हा या यात्रेचा उद्देश आहे. ही व्हॅन दिवसातून दोन ठिकाणी भेट देईल, अशा प्रकारे राज्यातील 46 ठिकाणांना भेट देईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत, असे राणे यांनी याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.  मोदी सरकारने मच्छीमार, शेतकरी, उद्योजक अशा समाजातील सर्व घटकांच्या फायद्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत, असे ते म्हणाले. आरोग्य क्षेत्रात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, कर्करोग तपासणी, सिकलसेल रोगांसाठी तपासणी यासह  विविध योजना राबविल्या आहेत. विकसित भारत यात्रा (शहरी) या सर्व योजनांची माहिती शहरी भागातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे.  त्यामुळे सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

विकसित भारत हे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न आहे.  2047 पर्यंत आपल्या देशाची गणना विकसित राष्ट्रांमध्ये व्हावी यासाठी आपण सरकारला पूर्ण  सहयोग दिला पाहिजे,” असे राणे म्हणाले.

यात्रेदरम्यान केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पोहोचवली जाणार आहे, असे नगरविकास विभागाचे संचालक गुरुदास पिलार्णेकर म्हणाले.

नगरविकास मंत्री विश्वजित राणे आणि गुरुदास पिलार्णेकर यांनी या कार्यक्रमात उपस्थितांसह विकसित भारताची शपथ घेतली.

या कार्यक्रमात दूरदर्शन केंद्र पणजीचे उपसंचालक रविराज सतापेऑल इंडिया रेडिओ पणजीचे उपसंचालक तुषार जाधव, सीसीपी च्या कम्युनिटी ऑर्गनायझर  कॅरेन मोंटेरोआणि  फीडबॅक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बालाजी केंद्रे हे देखील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी झारखंडमधील खुंटी येथे हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये विविध कल्याणकारी योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि योजनांची 100% संपृक्तता  सुनिश्चित करण्यासाठी जन भागीदारीच्या भावनेने  लोकसहभाग वाढवणे हा आहे.  हा भारत सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क उपक्रम आहे. 25 जानेवारी 2024 पर्यंत देशभरातील 2.60 लाख ग्रामपंचायती तसेच 4000 हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ही यात्रा भेट देणार आहे.

16 डिसेंबर रोजी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला झेंडा दाखविल्यानंतर दूरदृश्य प्रणालीमार्फत राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी शहरी रहिवाशांसाठी सामाजिक सुरक्षेसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला होता.  त्यांनी शहरी भागातील लोकांसाठी सुरक्षा जाळे  वाढवण्याबद्दल सविस्तर माहिती दिली होती.  अटल पेन्शन योजनेचे 6 कोटी लाभार्थी असून वयाच्या 60 वर्षांनंतर त्यांना 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे. पीएम सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती योजना 2 लाख रुपयांपर्यंतचे जीवन सुरक्षा कवच प्रदान करतात.  या योजनांतर्गत 17 हजार कोटींचे दावे यापूर्वीच निकाली काढण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  त्यांनी अमृत मिशन आणि स्मार्ट सिटी मिशन सोबतच शहरी लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या पीएम स्वनिधी योजनेसह  इतर योजनांबद्दलही सांगितले होते.  प्रत्येकाने या योजनांमध्ये नोंदणी करून आपले सुरक्षा कवच मजबूत करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1987509) Visitor Counter : 112


Read this release in: English