संरक्षण मंत्रालय
मुंबई येथे राष्ट्रीय छात्र सेनेद्वारे अखिल भारतीय सागरी प्रशिक्षण शिबिर 2023 चे आयोजन
Posted On:
14 DEC 2023 5:20PM by PIB Mumbai
मुंबई, 14 डिसेंबर 2023
राष्ट्रीय छात्र सेनेद्वारे (एनसीसी) 11 ते 22 डिसेंबर 23 या कालावधीत मुंबई येथे अखिल भारतीय सागरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. युद्धनौकेवरील जीवन पद्धतीविषयी माहिती घेण्यासाठी विविध राज्यांतील 10 राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयातील 110 कॅडेट्स या शिबिरात सहभागी झाले आहेत. सागरी प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून हे छात्रसैनिक बियास, बेटवा, ब्रह्मपुत्रा आणि तर्कश या पश्चिम ताफ्यातील जहाजांच्या ताफ्यावर मुक्काम करणार आहे मुंबईजवळच्या समुद्रात चाललेल्या एका दिवसाच्या कार्यक्रमात कॅडेट्सना भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या विविध सराव आणि क्रियांची माहिती देण्यात आली. कॅडेट्सनी समुद्रातील अनेक सरावामध्ये सक्रिय भाग घेतला. यातून ते बहुमोल माहिती मिळवू शकले. आयएनएस तर्कश वर एका चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान, कॅडेट्सनी अतिरिक्त महासंचालक, राष्ट्रीय छात्र सेना संचालनालय , महाराष्ट्र आणि फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लीट यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला.
मुंबईतील नेव्हल डॉकयार्डला दिलेल्या भेटीदरम्यान, कॅडेट्सना डॉकयार्डमधील सर्व दुरुस्ती सुविधा पाहण्याची संधी मिळाली. शिबिरादरम्यान हे छात्रसैनिक पाणबुड्यांनाही भेट देतील आणि त्यांना मिलिटरी हिस्ट्री सोसायटी म्युझियम पाहण्याची संधी देखील मिळणार आहे. छात्रसैनिक दक्षिण मुंबईतील नौदल हवाई तळ असलेल्या आयएनएस शिक्रालाही भेट देणार आहेत. पुनीत सागर अभियानाचा एक भाग म्हणून, ते INWTC वॉटर फ्रंट परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेणार आहेत. शिबिरादरम्यान कॅडेट्ससाठी मुंबई दर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
* * *
PIB Mumbai | S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986324)
Visitor Counter : 70