अर्थ मंत्रालय
मुंबई सीमाशुल्क विभागाने तळोजा येथे 410 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले नष्ट
Posted On:
13 DEC 2023 7:30PM by PIB Mumbai
मुंबई, 13 डिसेंबर 2023
मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने आज (13 डिसेंबर 2023) तळोजा येथे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस यासारखे अंमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे 54.850 किलो पदार्थ (एनडीपीएस), नष्ट केले. अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम, मुंबई सीमाशुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या मुंबई सीमाशुल्क क्षेत्र -I, सीबीआयसीच्या उच्चस्तरीय अंमली पदार्थ नष्ट समितीसमोर राबवण्यात आली. महाराष्ट्रात नवी मुंबईतील तळोजा येथील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा (सीएचडब्लूटीएसडीएफ), एमडब्ल्यूएमएल येथे हे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अवैध बाजारपेठेतील किंमत सुमारे 410 कोटी रुपये आहे.
या वर्षभरात अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा 02.03.2023 रोजी अंदाजे 240 कोटी रुपये किंमतीचे 61.585 किलो आणि 19.07.2023 रोजी दुसऱ्यांदा अवैध बाजारात 865 कोटी रुपये किंमतेचे 128.47 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अशा प्रकारे, या वर्षात 1515 कोटी रुपये किंमतीचे एकूण 244.905 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (एसआयआयबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांसारख्या विविध संस्थांनी हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. मुंबई सीमाशुल्क विभाग क्षेत्र -I आपल्या नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी जीवन देण्यासाठी एनडीपीएस पदार्थांच्या अवैध तस्करीविरूद्ध कठोर कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986015)
Visitor Counter : 84