शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यामध्ये “विकसित भारत@2047 युवकांचा आवाज” उपक्रमाच्या उदघाटन कार्यक्रमाला राज्यपालांची उपस्थिती


2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी समुदायाने समर्पित भावनेने काम करण्याचे राज्यपालांचे आवाहन

2047 पर्यंत देशाला विकसित बनवण्यामध्ये शैक्षणिक संस्थांना सहकार्य देण्यासाठी राजभवन सदैव तत्पर असेल : राज्यपाल

Posted On: 11 DEC 2023 8:21PM by PIB Mumbai

पणजी, 11 डिसेंबर 2023

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आज, 11.12.2023 रोजी, न्यू दरबार हॉल, राजभवन, डोना पावला येथे "विकसित भारत @ 2047 - युवकांचा आवाज" उपक्रमाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. देशाची धोरणे, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टांच्या निर्मितीमध्ये देशाच्या युवा वर्गाला सक्रीयपणे सहभागी करून घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणाली द्वारे राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी देशभरातील राजभवनांमध्ये आयोजित कार्यशाळेत विद्यापीठांचे कुलगुरू, संस्था प्रमुख आणि प्राध्यापकांना संबोधित केले.

राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल श्रीधरन पिल्लई म्हणाले की, हा उपक्रम देशातील तरुणांना ‘विकसित भारत @ 2047’ च्या दृष्टीकोनाकरता विविध संकल्पनांचे योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.

पंतप्रधानांचे प्रयत्न अधोरेखित करताना राज्यपाल म्हणाले की, 'विकसित भारत@2047' हे स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत, म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठीचे एक अभियान आहे. पंतप्रधान तरुण पिढीला आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा अमूल्य ठेवा समजतात. देशाला 2047 पर्यंत विकसित बनवण्यासाठी पंतप्रधान वचनबद्ध आहेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी शक्य तेवढे योगदान द्यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. या अभियानात विद्यार्थी समुदायाची मोठी भूमिका आहे. असे ते म्हणाले. 

शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि विद्यार्थ्यांना गुलामीच्या मानसिकतेवर आधारित दृष्टिकोन दूर सारण्याचे आवाहन करत, राज्यपाल म्हणाले, की आपण आपल्या स्वतःच्या क्षमता आणि कौशल्ये यावर विश्वास ठेवायला हवा. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकावरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ज्या ब्रिटनने एकेकाळी आपल्यावर राज्य केले, त्या ब्रिटनला आपण मागे टाकले आहे. आणि आपण हे साध्य करु शकलो, कारण आपण शिक्षणाला महत्त्व दिले. आणि याच योग्य दिशेने जर आपण वाटचाल करत राहिलो, तर आपण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकतो. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युवकांनी, आपल्या नेत्यांकडून आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीपासून प्रेरणा घ्यायला हवी, असे ते पुढे म्हणाले.

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याच्या शैक्षणिक संस्थांच्या सर्व प्रयत्नांना, राजभवन कायमच पाठबळ देत राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून दोन वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. "नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान" या विषयावरील सत्राला गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल  मेनन, एनआयटी गोव्याचे संचालक प्रा. जयस्वाल, आयआयटी गोव्याचे संचालक , प्रा. बी. के मिश्रा आणि बिट्स पिलानीच्या संचालक प्रा. सुमन कुंडू सहभागी झाले होते. तर विकसित भारत@2047मध्ये योगदान देण्यास, युवकांना कसे सहभागी करून घ्यावे या विषयावर आयोजित दुसऱ्या चर्चासत्रात, दामोदर वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, मडगावच्या प्राचार्या प्रा. डॉ. प्रीता मल्ल्या, पीईएस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स चे प्राचार्य विकास पिसूरलेकर आणि डीसीटीच्या एसएस डेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे  प्राध्यापक डॉ.मनोज एस. कामत आदि मान्यवर उपस्थित होते.

राज्यपालांचे सचिव एम. आर. एम. राव आणि शिक्षण सचिव प्रसाद लोलायेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यभरातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुखही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विकसित भारत उपक्रम पुढे नेण्यासाठी  आजची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्व राज्यपालांचे आभार मानून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.  विकसित भारत  संकल्पासाठी आजचा कार्यक्रम  विशेष  असल्याचे ते म्हणाले. विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असलेल्या सर्व संबंधितांना  एकत्र आणण्याच्या त्यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी   व्यक्तिमत्त्व विकासात शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.  लोकांचा  विकास झाला तरच  राष्ट्र विकसित होते, असे त्यांनी अधोरेखित केले.

प्रत्येक राष्ट्राच्या जीवनात इतिहास एक काळ प्रदान करतो, जेव्हा ते राष्ट्र त्याच्या विकासयात्रेत अभूतपूर्व झेप घेऊ शकतो. भारतासाठी, '' हा अमृत काळ सुरु आहे आणि भारताच्या इतिहासातला हाच तो काळ आहे जेव्हा भारत प्रचंड मोठी झेप घेणार आहे.'', असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. त्यांनी जवळपासच्या अनेक देशांची उदाहरणे दिली ज्यांनी निर्धारित  कालावधीत अशी अभूतपूर्व झेप  घेतली आणि ती  विकसित राष्ट्रांमध्ये रूपांतरित झाली. भारतासाठी हीच वेळ आहे, योग्य वेळ (यही समय है, सही समय है),  या अमृत काळातील  प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे, असे ते म्हणाले.

प्रगतीचा मार्गदर्शक आराखडा केवळ सरकार ठरवणार नाही तर देश ठरवणार आहे, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना अधोरेखित केले. . "देशातील प्रत्येक नागरिकाचे  त्यात योगदान  आणि सक्रिय सहभाग असेल",असे पंतप्रधान म्हणाले.

S.Kane/R.Agashe/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 

 



(Release ID: 1985217) Visitor Counter : 59


Read this release in: English