माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्याच्या सर्व भागांमध्ये ‘मोदी की गारंटी वाली गाडी’ चे उत्साहाने स्वागत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
Posted On:
09 DEC 2023 6:38PM by PIB Mumbai
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच राज्यसभा सदस्य सदानंद शेट तानवडे यांनी आज 09 डिसेंबर 2023 रोजी बार्डेझ येथील उकासाईम पंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून देशभरातील ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या लाभार्थींशी पंतप्रधान मोदी यांनी साधलेल्या संवादाचे थेट प्रसारण अनुभवले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की गोवा राज्याच्या प्रत्येक भागातील सर्व पंचायतींमध्ये स्थानिक लोक व्हीबीएसवाय उपक्रमाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करत आहेत. “उरलेल्या गावांमध्ये देखील या यात्रेचे अशाच प्रकारे स्वागत होईल अशी माझी खात्री आहे. कल्याणकारी योजनांची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही यात्रा सुरु करण्यात आली आहे. सरकारी योजनांचा लाभ देशाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कठोर मेहनत करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे मी कौतुक करतो,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
व्हीबीएसवाय उपक्रमाविषयी बोलताना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारने लागू केलेली विकासात्मक कामे तसेच कल्याणकारी योजना यांच्याबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही यात्रा सुरु करण्यात आली आहे.
या कार्यक्रमादरम्यान हजर असलेले सर्व मान्यवर तसेच इतर उपस्थितांनी व्हीबीएसवाय शपथ घेतली. सध्या सुरु असलेल्या व्हीबीएसवाय उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले. त्याआधी, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ड्रोन्सचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक उपस्थित मान्यवर तसेच जनतेसमक्ष सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून गोवा सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या सहाय्याने एका आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले. अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी विविध ठिकाणांहून या कार्यक्रमात सहभागी झाले.
विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, याआधीच्या काळात लाभार्थींशी साधलेल्या संवादाचे स्मरण केले आणि ते म्हणाले की या प्रवासामध्ये आतापर्यंत दीड लाखापेक्षा जास्त लाभार्थींनी आपापले अनुभव सांगितले आहेत. पक्की घरे, नळाने पाणीपुरवठा, शौचालये, मोफत उपचार, मोफत अन्नधान्य, गॅस जोडणी, वीज जोडणी, बँक खाते उघडणे, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून मिळणारे फायदे, पंतप्रधान पीकविमा योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना आणि पंतप्रधान स्वामित्व मालमत्ता पत्रे यांसह इतर अनेक योजनांचे फायदे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सर्वांसमोर मांडले.
***
M.Pange/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1984620)
Visitor Counter : 90