संरक्षण मंत्रालय

द्वि-वार्षिक सराव ‘प्रस्थान’ चे मुंबईजवळील पश्चिम सागरी विकास क्षेत्रात आयोजन.

Posted On: 09 DEC 2023 11:50AM by PIB Mumbai

भारतीय नौदल आणि अन्य संरक्षण दले , राज्य सरकारच्या संबंधित विभाग आणि नागरी संस्था यांचा सहभाग असलेला ‘प्रस्थान’ नावाचा एक समन्वयित सराव 08 डिसेंबर 2023 रोजी मुंबईजवळील समुद्रातील पश्चिम विकास क्षेत्रात आयोजित करण्यात आला. खनिज तेल उत्पादन तळावर उद्भवू शकणार्‍या विविध आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी उपाययोजना आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण करण्यासाठी हा सराव दर सहा महिन्यांनी आयोजित केला जातो. या वर्षीचा सराव मुंबई बंदराच्या पश्चिमेस सुमारे 45 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या ओएनजीसीच्या R12A (रत्ना) या तळावर आयोजित करण्यात आला होता.

हा सराव 08 डिसेंबर 2023 रोजी पहाटे सुरू झाला आणि दिवसभरात दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला. पहिल्या टप्प्यात दहशतवाद्यांचा हल्ला आणि आयईडीचा बॉम्बचा धोका यासारख्या सुरक्षा आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचा सराव करण्यात आला. धमकीची माहिती मिळाल्यावर, मुंबई स्थित पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ जे पश्चिम (कोस्टल डिफेन्स) चे कमांडर-इन-चीफ देखील आहेत, त्यांनी आवश्यक आकस्मिक योजना सक्रिय केली. विविध संरक्षण, राज्य आणि नागरी संस्थांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली आपत्कालीन व्यवस्थापन समिती भारतीय नौदलाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये सर्व आपत्कालीन परिस्थितींना समन्वित प्रतिसाद देण्यासाठी एकत्र आली होती. आपत्कालीन व्यवस्थापन गटाने आणीबाणीच्या विविध पैलूंचे मूल्यमापन केले आणि स्थापित मानक कार्यप्रणालीनुसार संबंधित संस्था द्वारे समन्वयित कृती सुरू केल्या. भारतीय नौदलाने, भारतीय वायुसेनेच्या समन्वयाने, प्रभावित तेल विहिरीवर सुरक्षा धोके निष्फळ करण्यासाठी त्यांची विध्वंस विरोधी पथके तैनात केली.

सरावाच्या पहिल्या टप्प्यात दहशतवादी घुसखोरी, बॉम्बचा धोका, एखादा कर्मचारी तेल उत्पादन तळावरुन समुद्रात पडणे, तळावरील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय स्थलांतर आणि परिसरात तेल गळती यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठीच्या कृतींचा देखील सराव केला. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात, तेल उत्पादन तळावर आग लागणे आणि ऑफशोअर डेव्हलपमेंट क्षेत्रात बंद पडलेल्या जहाजाला मदत करणे यासारख्या आपत्कालीन परिस्थितींविरुद्ध कारवाईचा सराव करण्यात आला.

या सरावासाठी भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, ओएनजीसी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि नौवहन महासंचालक यांची अनेक जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती. महाराष्ट्र पोलीस, सीमाशुल्क, मत्स्य विभाग, मुंबई बंदर प्राधिकरण, जेएन बंदर प्राधिकरण, भारत हवामान विभाग आणि इतर संबंधित राज्य आणि केंद्रीय नागरी संस्थांचे कर्मचारीही या सरावात सहभागी झाले होते. या सरावातील कवायती आणि कार्यपद्धती एकत्रित आणि समन्वित पद्धतीने करण्यात आल्या. या सरावाने या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी सर्व संबंधित संस्थांच्या सज्जतेचे तसेच विविध संस्थांमध्ये समन्वय साधण्याच्या कार्यपद्धतींचे मूल्यांकन करण्यासाठी एक वास्तववादी परिस्थिती प्रदान केली. सध्या वापरात असलेल्या कार्यपद्धती सुधारण्यासाठी तसेच त्या आणखी मजबूत आणि सुधारित करण्यासाठी आवश्यक असलेल्या पैलूंचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व कृतींचे तपशीलवार विश्लेषण केले जाणार आहे.

***

JPS/S. Mukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984380) Visitor Counter : 81


Read this release in: English