शिक्षण मंत्रालय

एनआयटी गोव्याचे विद्यार्थी एक भारत श्रेष्ठ भारत युवा संगम कार्यक्रमांतर्गत आयआयटी भिलाईच्या शैक्षणिक सहलीला रवाना

Posted On: 08 DEC 2023 8:15PM by PIB Mumbai

पणजी, 8 डिसेंबर 2023
 

गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी ) चे विद्यार्थी  एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमांतर्गत युवा संगम उपक्रमाच्या तिसर्‍या टप्प्याचा भाग म्हणून आज 08.12.2023 छत्तीसगड मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी ) भिलाई येथे शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाले. 42 विद्यार्थी, पाच प्राध्यापक आणि कर्मचारी यांचा समावेश असलेल्या या चमूने मडगाव रेल्वे स्थानकावरून या सांस्कृतिक आणि  शैक्षणिक सहलीला सुरुवात केली.

शिक्षण मंत्रालयाने नोव्हेंबरमध्ये युवा संगमचा तिसरा टप्पा सुरू केला होता, ज्यामध्ये देशभरातील 18-30 वयोगटातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांच्या जोडीदार  राज्यांमध्ये प्रवास करतील. तिसर्‍या टप्प्यांतर्गत असे सुमारे 20 दौरे आयोजित केले जाणार आहेत.

एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत सुरू करण्यात आलेला युवा संगम उपक्रम , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  2020 पासून प्रेरित आहे आणि प्रायोगिक शिक्षणावर आणि भारतातील समृद्ध विविधतेचे प्रत्यक्ष ज्ञान आत्मसात करण्यावर भर देतो. विविधता साजरी करण्याबरोबरच ही एक सांस्कृतिक देवाणघेवाण आहे ज्यामध्ये सहभागींना जीवनाच्या विविध पैलूंचा, नैसर्गिक भूभागाचे  स्वरूप , विकासाचे टप्पे , अलिकडच्या काळातील कामगिरी आणि यजमान राज्यातील युवकांशी संवाद साधण्याची संधी मिळते.  युवा संगमच्या तिसर्‍या टप्प्यासाठी देशभरातील वीस प्रख्यात संस्थांची निवड करण्यात आली असून एनआयटी गोवा आणि  आयआयटी  भिलाई यांची जोडी ठेवण्यात आली आहे.

युवा संगम कार्यक्रमाचे उद्दिष्ट पर्यटन , परंपरा, प्रगती , परस्पर संपर्क आणि प्रौद्योगिकी या पाच विस्तृत क्षेत्रांतर्गत बहुआयामी ओळख प्रदान करणे हे आहे. या कार्यक्रमांतर्गत, युवक पाच-सात दिवसांसाठी जोडीदार  राज्यांना भेट देतील आणि  त्या  राज्याच्या विविध पैलूंचा अनुभव घेतील तसेच  स्थानिक तरुणांशी संवाद साधतील.

31 ऑक्टोबर 2015 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रदेशांतील लोकांमध्ये शाश्वत आणि रचनात्मक  सांस्कृतिक संबंधांची  कल्पना मांडली होती. ही कल्पना पुढे नेण्यासाठी, 31 ऑक्टोबर 2016 रोजी एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

युवा संगमच्या पहिल्या दोन टप्प्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद मिळाला ज्यात 2000 हून अधिक युवक सहभागी झाले होते , तिसऱ्या टप्प्यात देखील प्रचंड जोश  आणि उत्साह अपेक्षित आहे.


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1984195) Visitor Counter : 55


Read this release in: English