सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
पाटणा येथे उद्या दिव्य कला मेळा 2023 चे होणार उद्घाटन
Posted On:
07 DEC 2023 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 डिसेंबर 2023
केंद्रीय अपंग व्यक्ती (दिव्यांगजन) सक्षमीकरण विभागाने 8 ते 17 डिसेंबर 2023 या कालावधीत देशभरातील दिव्यांग उद्योजक/कारागीर यांची उत्पादने आणि कलाकुसरीचे दर्शन घडवणाऱ्या ‘दिव्यांग कला मेळा 2023’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागांमधील, हस्तकला, हातमाग उत्पादने, भरतकाम आणि पॅकेज्ड फूड अर्थात वेष्टनबंद अन्नपदार्थ इत्यादींसारखी वैविध्यपूर्ण उत्पादने या प्रदर्शनात एकत्रितपणे पहायला मिळणार असल्यामुळे, मेळ्याला भेट देणाऱ्यांसाठी हा कार्यक्रम एक चित्ताकर्षक अनुभव ठरेल.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते उद्या, 8 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक उपस्थित असतील.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशातील दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेली उत्पादने आणि त्यांचे कौशल्य यांचे सादरीकरण करण्यासाठी तसेच त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दिव्य कला मेळा अधिक मोठा मंच उपलब्ध करून देतो. पाटणा येथे आयोजित करण्यात आलेला हा दिव्य कला मेळा, वर्ष 2022 पासून आयोजित होत आलेल्या मेळ्यांच्या मालिकेतील अकरावा मेळा आहे. याआधी दिल्ली (डिसेंबर 2022), मुंबई (फेब्रुवारी 2023),भोपाळ (मार्च 2023),गुवाहाटी (मे 2023), तसेच इंदूर,वाराणसी जयपूर,हैदराबाद,बेंगळूरू आणि चेन्नई या शहरांमध्ये अशाच मेळ्यांचे आयोजन करण्यात आले होते.
पाटणा येथे उद्यापासून सुरु होत असलेल्या या उपक्रमात देशभरातील सुमारे 20 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधले सुमारे 100 दिव्यांग कारागीर तसेच कलाकार आणि उद्योजक आपापली उत्पादने आणि कौशल्ये सादर करणार आहेत. या मेळ्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या उत्पादनांमध्ये पुढील विस्तृत श्रेणीतील उत्पादनांचा समावेश असेल: गृहसजावट आणि जीवनशैलीशी संबंधित उत्पादने, कपडे, स्टेशनरी आणि पर्यावरणस्नेही उत्पादने, वेष्टनबंद खाद्यपदार्थ आणि सेंद्रिय उत्पादने, खेळणी तसेच भेटवस्तू, दागिने, क्लच बॅगा यांसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजेच स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची आणि दिव्यांग कारागीरांनी अधिक दृढनिश्चयाने बनवलेली उत्पादने बघण्याची आणि विकत घेण्याची संधी मिळेल.
पाटणा येथे दहा दिवस चालणाऱ्या या दिव्य कला मेळ्यात दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळात दिव्यांग कलाकार आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक कलाकार यांच्या सादरीकरणासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिकाही सादर केली जाईल. मेळ्याला भेट देणाऱ्यांना देशाच्या विविध प्रांतांमधील त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचाही आस्वाद देखील घेता येईल.
या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य योजना राबवण्याचा विभागाचा मानस आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून देशभरात दिव्य कला मेळ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. वर्ष 2023-2024 मध्ये इतर शहरांत देखील अशाच मेळ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1983831)