माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत संकल्प यात्रेला आदिवासी भागासह ग्रामीण भागात देखील उत्स्फूर्त प्रतिसाद

Posted On: 07 DEC 2023 5:27PM by PIB Mumbai

पुणे, 7 डिसेंबर 2023

15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून सुरू झालेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आता ग्रामीण तसेच शहरी भागात देखील नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत लाभ देत आहे. सरकारी योजनांविषयी देशातील नागरिकांनी जागरूक राहून त्याचा लाभ घ्यावा, हा उद्देश या उपक्रमामागे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी या मोहिमेचा कार्यभार सांभाळत आहेत.

राज्याचे महसूल, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून मार्गस्थ केलेली विकसित भारत संकल्प यात्रा अहमदनगरच्या नगर, नेवासा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी या सर्व तालुक्यात सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या योजना कोणत्या आहेत व त्याचा लाभ कसा घेता येईल, याची माहिती गावोगावी दिली जात आहे. या आठवड्यात माती परीक्षण, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर, नैसर्गिक शेती, पिकांवर नॅनो युरियाची ड्रोनद्वारे फवारणी असे उपक्रम घेण्यात आले. आतापर्यंत 88 गावांमध्ये यात्रा पोहचली आहे.

ग्रापंचायत कऱ्हे टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे पोहचलेली संकल्प यात्रा

'विकसित भारत संकल्प यात्रा' लातूर मधील नागझरी येथे पोहचली, यावेळी आरोग्य विभागाकडून रक्तदाब मधुमेह प्राथमिक तपासणी तसेच आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली. 'आपला संकल्प, विकसित भारत' या रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. नागझरी येथे देखील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले.

विकसित भारताची शपथ घेताना नागझरी, लातूर मधील महिला

नमो ड्रोन दीदी योजनेची माहिती आणि प्रात्यक्षिक

भारतातील 15 हजार महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण आणि ड्रोन दिले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. ती योजना काय आहे, त्या योजनेचे अनुदान कोणाला व किती आहे, याची सविस्तर माहिती लातूर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सचिन शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी ड्रोनमध्ये पाणी, औषधाचे प्रमाण, ते ज्या पिकांवर फवारायचे आहे त्यापासून दीड मीटरपर्यंत वर असावे, त्यातून अत्यंत कमी प्रमाणात पाणी पडते, कमीतकमी दहा मिनिटात एक एकर शेताची फवारणी पूर्ण केली जाते, अशी सर्व माहिती दिली. इतर पिकांबरोबरच ऊसासारख्या पिकावर देखील ड्रोनद्वारे फवारणी अत्यंत लाभदायक ठरते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी ड्रोन उडवून शेतकऱ्यांना याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

नमो ड्रोन दीदी योजनेची माहिती आणि प्रात्यक्षिक

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्यान विभागाचे सहसंचालक डॉ. विवेकानंद गिरी यांनी लातूर तालुक्यातील चांडेश्वर आणि औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथे ‘विकसित भारत’ यात्रेला भेट दिली. गावपातळीवर शासनातर्फे राबवित असलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भव योजना यामध्ये प्राधान्याने नागरीकांना मिळणाऱ्या आरोग्य वर्धिनीच्या सेवा ज्यामध्ये रक्तदाब, मधुमेहाची तपासणी व उपचार, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी विविध कार्यक्रम आदी उपक्रमांची डॉ. गिरी यांनी पाहणी केली. रुग्णासोबत, तसेच आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसोबत डॉ. गिरी यांनी संवाद साधला.

चांडेश्वर आणि हासेगाववाडी येथे विकसीत भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये 340 नागरीकांनी लाभ घेतला, तसेच 113 नागरिकांचे आशामार्फत आयुष्यमान कार्ड काढण्यात आले.

S.Pophale/P.Malandkar  

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1983639) Visitor Counter : 182
Read this release in: English