कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
'पेन्शन तुमच्या दारी' मोहीमेअंतर्गत नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयाद्वारे 'ई-पीपीओ' 'पेन्शनर्स' समाधान' या अभिनव डिजिटल उपक्रमांना प्रारंभ
Posted On:
30 NOV 2023 10:02PM by PIB Mumbai
नागपूर 30 नोव्हेंबर 2023
नागपूरच्या प्रधान महालेखापाल (लेखा आणि हकदारी) यांच्या कार्यालयात 'ई-पीपीओ' (इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर) आणि 'पेन्शनर्स' समाधान' (डिजिटल विंडो) या दोन नाविन्यपूर्ण डिजीटल उपक्रमांचे उद्घाटन 'पेन्शन अॅट युअर डोरस्टेप' - 'पेन्शन तुमच्या दारी' या मोहिमेअंतर्गत नुकतेच करण्यात आलं. राज्य शासनातील सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती वेतनाशी संबंधित समस्या घरबसल्या सोडवता याव्या यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं ही सेवा सुरु करण्यात आली आहे. निवृत्तीवेतन धारकांसाठीच्या या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन प्रधान महालेखापाल जया भगत यांनी केले . या उपक्रमात, कार्यालयीन चमू निवृत्तीवेतनधारकांपर्यंत, त्यांच्या घरी, नियोजित व्हिडिओ कॉलद्वारे पोहोचते आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करते.निवृत्तीवेतनधारकांना ऑनलाइन फॉर्मद्वारे किंवा प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या टोल-फ्री नंबरवर (1800 233 7834) किंवा इंटरकॉम फोन नंबरवर फोन कॉलद्वारे ‘पेन्शनर्स समाधान’ नोंदणी करून या सेवेचा लाभ घेता येईल.
प्रधान महालेखापाल (लेखा आणि हक्कदारी ) कार्यालय -II, नागपूर यांनी 'पेन्शन तुमच्या दारी' मोहीमेचा एक भाग म्हणून मराठवाडा आणि विदर्भात पसरलेल्या ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन-संबंधित हे अभिनव डिजिटल उपक्रम राबवले आहेत. या 1 डिसेंबरपासून सुरु होणारा ई-पीपीओ (इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर) हा उपक्रम डिजिटल प्रतींच्या प्रक्रियेला आणि त्वरित पाठवण्याच्या प्रक्रियेला गती देणार असून याविषयी, पेन्शनधारकांना एसएमएस सेवेद्वारे कळविले जाईल. या कार्यक्रमास कोषागार नागपूर विभाग, उपमहालेखापाल आणि प्रधान महालेखापाल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
***
AG-II OFFICE/SR/DW/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981361)
Visitor Counter : 178