माहिती आणि प्रसारण मंत्रालय
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांचा जागर करावा; योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर रहावा: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Posted On:
30 NOV 2023 5:50PM by PIB Mumbai
अहमदनगर, दिनांक 30 नोव्हेंबर 2023
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ 26 जानेवारी 2024 पर्यंत देशाच्या सर्व भागात जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांचा जागर करण्यात यावा. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर रहावा, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या यात्रेच्या रथांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या माध्यमातून सरकारच्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यात येऊन लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशिलपणे काम करावे, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

राज्य शासनामार्फतही अनेक लोकोपयोगी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. आजपर्यंत 15 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आजच्या आधुनिकतेच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापरावरही भर देण्यात येत असून ड्रोनद्वारे शेती ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पैसा, वेळ व श्रम वाचण्यास मोठी मदत होत असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.

राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना आवश्यक ते उपचार मिळावेत, यासाठी राज्यातील 12 कोटी जनतेला पाच लक्ष रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोयही शासनाने केली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डीबीटीद्वारे निधी वितरण करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वितरण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, महिला, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*****
S.Pophale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1981207)
Visitor Counter : 112