माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टूमारो’ उपक्रमाद्वारे, युवा सर्जनशील कलावंतांना चित्रपट निर्मिती आणि कथा कथनातील नव्या संधी शोधण्याची संधी खुली : ओढ चित्रपटाचे दिग्दर्शक, अखिल लोटलीकर


54 व्या इफ्फीमधे “75 क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टुमारो” स्पर्धेत ‘ओढ’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

गोवा/मुंबई, 25 नोव्‍हेंबर 2023

 

चित्रपटाची निर्मिती, छायाचित्रण आणि ध्वनी यावर केवळ 48 तासात निर्णय घेतांना, आमच्या चित्रपटाच्या सगळ्या चमूने जी उमेद, जिद्द आणि बांधिलकी दाखवली, ती विलक्षण होती, असे ‘ओढ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अखिल लोटलीकर यांनी म्हटले आहे. गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या इफ्फीमधील ’75 सर्जनशील युवा मने’ या विभागात, त्यांच्या ‘ओढ’ या चित्रपटाने काल सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला.

युवा चित्रपट निर्मात्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि NFDC यांचे आभार मानले. हा उपक्रम, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चित्रपट निर्मिती आणि कथाकथनात नवीन संधी शोधण्यासाठी तरुण सर्जनशील मनांसाठी एक मार्ग खुला करणारा उपक्रम आहे,” असे अखिल लोटलीकर म्हणाले.  

दिवसा उजेडी चित्रीकरण करतांना सूर्याचा प्रखर प्रकाश नियंत्रित करणे खरेच आव्हानात्मक ठरले होते, असे त्यांनी, हा चित्रपट बनवताना आलेल्या आव्हानांविषयी सांगितले.

समुद्र किनाऱ्याची होणारी धूप टाळण्यासाठी, सागर किनारे वाचवण्याची मोहीम, ‘ओढ’ या चित्रपटात अत्यंत कलात्मकतेने आणि प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे ‘ओढ’ हा चित्रपट आपल्याला मार्सलीन या मच्छिमाराचा प्रवास आणि संघर्ष दाखवतो. समुद्रकिनाऱ्यांवर जागा शिल्लक नसल्याने मार्सलीनला आपली होडी  ठेवण्यात अडचणी येतात. त्यामुळे तो आपली बोट शहराच्या मध्यभागी घेऊन जातो आणि समुद्रकिनारा चोरीला गेल्याची तक्रार करतो.

ज्यूरी सदस्य आणि शॉर्ट्स टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्टर पिल्शर म्हणाले की नवोदित सर्जनशील तरुणांना त्यांची गुणवत्ता जगासमोर आणण्यासाठी सीएमओटी सारखे मंच उपलब्ध करून देण्यामागची ही विलक्षण संकल्पना आहे.

ज्यूरी सदस्यांपैकी एक असलेले दिग्दर्शक सुजीत सरकार म्हणाले, सर्व चित्रपट कालसापेक्ष आणि विचारांना चालना देणारे होते. या चित्रपटांत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण हा महत्वाचा विषय हाताळलेला आहे. ते म्हणाले, “तुम्ही सर्व आधीच विजेते ठरलेले आहात.”

चित्रपट आव्हानाचा एक भाग म्हणून, 75 सीएमओटी स्पर्धक, ज्यांनी 48 तासांत ‘मिशन आयुष्य’ या विषयावर लघुपट बनविले आहेत, ते पाच चमुंमध्ये विभागले होते. एकूण पाच लघुपट तयार करण्यात आले. पंधरा सदस्यांच्या प्रत्येक चमूने पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण संवेदनशील विषयावर विचारांना चलन देणारे लघुपट बनविले. यात उत्तम कथावस्तू, संपादन, छायाचित्रण आणि निर्मिती पश्चात प्रक्रिया यांचा समावेश होता.

या स्पर्धेची संकल्पना एनएफडीसी आणि शॉर्ट्स इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे तयार केली होती. देशाच्या 19 राज्यांतून आलेल्या सीएमओटी स्पर्धकांनी देखील कार्यशाळेत आणि जागतिक चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी तयार केलेल्या मास्टर क्लासमध्ये हजेरी लावली.

नवोदित सर्जनशील तरुणांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांची जडणघडण करणे, हे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी, आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून हा उपक्रम 2021 मध्ये सुरू करण्यात आला आणि हे या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे.

 

* * *

PIB Mumbai | M.Pange/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1979847) Visitor Counter : 105


Read this release in: English , Konkani , Urdu , Hindi