माहिती आणि प्रसारण मंत्रालय
54 व्या इफ्फी मध्ये प्रसिध्द अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अभिनय कलेविषयी घेतला ‘मास्टरक्लास’
चांगला कलाकार बनण्यासाठी सभोवतालच्या गोष्टींविषयी संशोधन, निरीक्षण आणि अन्वेषण जरूर करावं – पंकज त्रिपाठी
अभिनयामुळे एखादी व्यक्ती चांगला माणूस बनतो – त्रिपाठी
गोवा/मुंबई, 23 नोव्हेंबर 2023
54 व्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोलकाताच्या सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या मास्टरक्लासचे आयोजन केले होते. या सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी केले.
अभिनय कलेविषयी आपले विचार व्यक्त करताना त्रिपाठी म्हणाले की, हे संपूर्ण जग एक रंगभूमी आहे, आणि आपण सर्वजण आपआपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. अभिनय म्हणजे वास्तविक जीवनातील भूमिकेची पुन्हा एकदा होणारी निर्मिती असते आणि त्यावेळी भावनांतून इतरांचे मनोरंजन केले जात असते. प्रतिथयश, व्यावसायिक अभिनेता होण्यासाठी प्रत्येक गोष्टीविषयी मनामध्ये सह-अनुभूती वाटणे आवश्यक आहे, असे त्रिपाठी म्हणाले. अभिनय एक व्यापक उद्देश पूर्ण करतो. तसेच विविध दृष्टीकोन समजून घेऊन व्यक्तीला अभिनयामुळे चांगला मानव बनता येते, असे आपल्याला वाटत असल्याचे, पंकज त्रिपाठी यांनी नमूद केले. “ज्यावेळी तुम्ही स्वत: दुस-या एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये शिरता आणि त्या व्यक्तीचे विचार, त्यांच्या भावना आणि त्यांचे दृष्टीकोन समजून घेता, तेव्हा तुम्ही एक चांगला माणूस बनता.” असं यावेळी त्रिपाठी म्हणाले.
अर्थात हे घडत असताना तुम्ही इतरांच्या जीवनातील चांचांगल्या वाईट घटना, गुण यांचे विश्लेषण करीत असता, निरीक्षण करून समजून घेत असता, त्यामुळेच स्वतःला चांगले बनवण्यासाठी त्या पात्राकडून – त्या व्यक्तिमत्वाकडून तुम्ही शिकता.
नैसर्गिक अभिनय तुमच्या वठला जावा, किंवा तुमचा अभिनय नैसर्गिक वाटला पाहिजे, यासाठी शरीर आणि मन संतुलित ठेवण्याचे महत्त्व कलाकार पंकज त्रिपाठी यांनी अधोरेखित केले. “स्वतःला व्यक्तिरेखेनुसार घडवण्यासाठी मन आणि शरीराची लवचिकता आणि मोकळेपणा महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी तुम्ही मेंदूतील पात्राला काल्पनिक परिस्थितीमध्ये तुम्हाला हवे ते काम करण्यास भाग पाडता त्याचवेळी पडद्यावर भावनांचे मनोरंजन होत असल्याचे प्रदर्शन होते. आणि यासाठी स्वतःला, मनाला तसे प्रशिक्षित करावे लागते.
स्टार आणि अभिनेता यांच्यातला फरक सांगताना पंकज त्रिपाठी म्हणाले, "एक अभिनेता नेहमीच त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेमध्ये प्रयोग करण्याची संधी घेऊ शकतो." अभिनेत्याला भूमिका शोधण्याचे स्वातंत्र्य असते. मात्र प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा मोठी प्रतिमा निर्माण करणाऱ्या स्टारडमला काही मर्यादा आहेत. प्रेक्षकांच्याही मनात स्टारने असेच काहीतरी मोठे दाखवावे अशा अपेक्षा असतात. मात्र कलाकार म्हणून प्रयोगाचे महत्त्व अधोरेखित करताना त्रिपाठी म्हणाले, "प्रयोगामुळे अभिनय जिवंत राहतो."
अभिनेता म्हणून आपल्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये आपल्याला कराव्या लागलेल्या संघर्षाची माहिती देवून, या आव्हानाला आपण मात केली, असे त्रिपाठी म्हणाले. ज्यावेळी तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी अभिनय दुय्यम बनतो, असे ते म्हणाले. तथापि, कधी ना कधी पुढे जाउूच, अशी आशा मनात बाळगून होतो, पण केवळ आशा पुरेशी नाही, आत्म-मूल्यांकन देखील आवश्यक आहे. तुम्हाला हे का करायचे आहे हे स्वतःला विचारा,” असे त्रिपाठी पुढे म्हणाले. प्रेक्षकामध्ये उपस्थित असलेल्या महत्त्वाकांक्षी, उदयोन्मुख कलाकार, अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांनी संशोधन, निरीक्षण आणि आपल्या भवतालच्या गोष्टींचे चिकित्सक दृष्टीने अन्वेषण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मास्टरक्लासच्या चर्चेचे सूत्रधार मयंक शेखर म्हणाले की, प्रसिध्दीचे वलय प्राप्त झालेले असूनही त्रिपाठी यांच्याकडे असलेली नम्रता कौतुकास्पद आहे. या टिपणीवर प्रतिसाद देताना पंकज त्रिपाठी म्हणाले की, जेव्हा एखादी व्यक्ती आपली मुळे विसरते तेव्हाच अहंकाराचा प्रवेश होतो. "पंधरा वर्षांपूर्वी कोणीही मला ओळखत नव्हते, आणि 15 वर्षांनंतर कदाचित कोणीही माझी आठवणही काढणार नाही.’’ असे सांगून त्रिपाठी म्हणाले, इथे प्रत्येकाने जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून त्रिपाठी म्हणाले की, "ज्यावेळी प्रसिद्धी आणि पैसा यांचा सदुपयोग आणि चांगल्या हेतूसाठी केला जातो तेव्हाच जीवन सार्थक बनते."
मास्टरक्लासमुळे एका कलाकाराचा कलाप्रवास आणि वैयक्तिक पातळीवर त्या कलाकाराने गाठलेली उंची, त्यांच्या अभिनयाचा सखोल अभ्यास करता आला. यामुळे प्रेक्षकांना अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्याकडे असलेला अनुभव, त्यांचे ज्ञान यांची माहिती घेता आली.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979227)
Visitor Counter : 149