अर्थ मंत्रालय
एकूण कर संकलनामध्ये प्रत्यक्ष कर संकलनाचे योगदान मोठे
कर प्रणालीला सुलभ बनवून तंत्रज्ञानाच्या साह्याने कर अनुपालन व्यवसाय वृद्धीसाठी वाढवणे आवश्यक - महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे आयआरएसच्या 77 व्या तुकडीच्या सेवापुर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन
Posted On:
16 NOV 2023 7:57PM by PIB Mumbai
नागपूर, 16 नोव्हेंबर 2023
महसूल संकलनाशिवाय आपला सामाजिक आणि आर्थिक विकास शक्य नाही. प्रत्यक्ष कर हे भारतीय महसुल प्रणालीमध्ये सर्वात मोठे योगदान करत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज नागपूरमध्ये केले .


राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी - एनएडीटी नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या 77 व्या तुकडीमधील 90 अधिकाऱ्यांच्या तसेच रॉयल भूतान सेवेतील 02 अधिकाऱ्यांच्या सेवापुर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन आज राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटी नवी दिल्लीचे प्रशासकीय सदस्य राजीव अग्रवाल ,राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक जयंत दिद्दी उपस्थित होते .

2022-23 या मागील आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन हे 16 लक्ष कोटीच्या वर होते आणि केंद्र सरकारच्या महसुलामध्ये प्रत्यक्ष करांचे योगदान 52 पूर्णांक 3 टक्के आहे अशी माहिती राज्यपालांनी दिली.
BTO2.jpeg)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळामध्ये भारतीय राजस्व सेवा - आयआरएस मधील ही तुकडी आपल्या सेवा देत असून भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यामध्ये या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत राज्यपालांनी व्यक्त केले.

कृत्रिम तंत्रज्ञानाच्या उपयोगाने कर निर्धारित करण्यातील अचूकपणा वाढू शकतो .करविषयक याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांचा पैसा अनेकवेळा अडकून पडतो. यासाठी करविषयक याचिका कमी करण्यासाठी कर विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे . भारतीय नागरिकत्व सोडणा-यांची संख्या 2018 मध्ये 1 लाख 34 हजाराच्या वर होती तीच संख्या 2022 मध्ये 2 लाख 25 हजारच्या वर पोहोचली. गडगंज संपत्ती असलेले नागरिक ही नागरिकता सोडतात तेव्हा त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पडतो. यावर कर विभागाला चिंतन करण्याची आवश्यकता आहे .व्यवसाय आणि कार्पोरेट या दोन क्षेत्राद्वारे अर्थव्यवस्था चालते. यासाठी कर प्रणालीला सुलभ बनवून तंत्रज्ञानाच्या साह्याने कर अनुपालन व्यवसाय वृद्धीसाठी वाढवणे आवश्यक आहे. व्यवसाय अनुकूल वातावरणात आर्थिक विकासासह स्वैच्छिक कर अनुपालनाला सुद्धा चालना मिळते असे राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केले .
2NT4.jpeg)
फेसलेस फायलिंग , त्वरित परतावा त्याचप्रमाणे करदायित्वाचा विस्तार यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यामध्ये भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी कर्तव्यबद्ध आहेत ,असेही राज्यपालांनी स्पष्ट केले .
या संबोधनापूर्वी एनएडीटी परिसरामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी वृक्षारोपण केले . राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापने पासून तर आतापर्यंतच्या इतिहासाचा आढावा घेणारी एक चित्रफीत याप्रसंगी दाखवण्यात आली .
ZIXA.jpeg)
फेसलेस असेसमेंट यासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून करप्रशासन सक्षम आणि प्रभावी करण्यामध्ये भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते . आयआरएस सेवेतील अधिकाऱ्यांना केवळ करप्रशासनातच नव्हे तर भारतीय लोकप्रशासनातील विविध सार्वजनिक उपक्रम , बँकिंग व्यवस्था यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी संधी मिळतात असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य रवी अग्रवाल यांनी सांगितले .

एनएडीटीचे प्रधान महासंचालक जयंत दिद्दी यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या कामगिरीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला . एनएडीटी केवळ आयआरएस अधिकाऱ्यांसाठीच नव्हे तर भारतीय वन सेवा , भारतीय दूरसंचार सेवा यांसारख्या सेवेतील अधिकाऱ्यांना देखील प्रशिक्षण देत असल्याची माहिती त्यांनी दिली .
याप्रसंगी 77 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना करप्रशासनाची शपथ अतिरिक्त महासंचालक मुनिष कुमार यांनी दिली .
7ENW.jpeg)
प्रशिक्षणार्थी अधिकारी हर्षीयाणी सिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला एनएडीटीमधील कर्मचारी, आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी ,76 आणि 77 व्या बॅचमधील आयआरएस अधिकारी ,त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
S.Rai/D.Dubey/P.Malandkar
(Release ID: 1977489)
Visitor Counter : 126