अर्थ मंत्रालय
नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये भारतीय महसूल सेवेच्या 77 व्या तुकडीच्या प्रेरक प्रशिक्षणाचे उद्घाटन
Posted On:
14 NOV 2023 8:16PM by PIB Mumbai
नागपूर, 14 नोव्हेंबर 2023
रॉयल भूतान सेवेच्या 02 अधिकाऱ्यांसह 90 भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांच्या 77 व्या तुकडीच्या प्रेरक प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा 16 नोव्हेंबर 2023 रोजी नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये (NADT) आयोजित केला जाणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांचे नेतृत्व करणारे वरिष्ठ अधिकारी आणि नागपूर येथील प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकारीही या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर ही भारत सरकारच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांना (आयकर) प्रशिक्षण देणारी सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा (CSE) मार्फत भारतीय महसूल सेवेच्या अधिकाऱ्यांची भरती केली जाते. थेट भर्ती केलेल्या भारतीय महसूल सेवेच्या अधिकारऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयात नियुक्त करण्यापूर्वी सुमारे 16 महिन्यांचे प्रेरक प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या या प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंबाबत प्रशिक्षित केले जाते आणि प्राप्तिकर कायदे, न्यायशास्त्र तसेच सहयोगी कायदे, सामान्य कायदे आणि व्यवसाय कायदे याबाबत विशेष माहिती प्रदान केली जाते.
प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांना खाती आणि लेखा प्रणालीवर सखोल प्रशिक्षण दिले जाते. यापुढे जाऊन प्रशिक्षणार्थींना कर चोरी आणि मनी लाँड्रिंगसह कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भात तपासासाठी तयार करण्याच्या उद्देशाने वित्तीय न्याय आणि सायबर न्याय याबाबतही माहिती दिली जाते. प्रशिक्षणार्थींना विशेषकरून करदात्याच्या सेवांबद्दल संवेदनशील बनवले जाते, जेणेकरून करदात्यांना नियमांचे पालन करणे सुलभ होते. याशिवाय, प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबी समजून घेण्यासाठी या अधिकाऱ्यांना आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसद, भारतीय रिझर्व बँक, भारतीय रोखे आणि विनिमय संस्था आणि एनएसडीएल इत्यादीसह भारतातील विविध संवैधानिक आणि वैधानिक संस्थांशी संलग्नता दिली जाते.
भारतीय महसूल सेवेच्या 77 व्या तुकडीत 35 महिला (39 टक्के ) अधिकारी प्रशिक्षणार्थींसह 90 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. यापैकी 23 टक्के प्रशिक्षणार्थी अधिकारी ग्रामीण पार्श्वभूमीचे आहेत आणि उर्वरित शहरी किंवा निमशहरी पार्श्वभूमीतील आहेत. प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा आढावा घेतला तर सुमारे 2/3 प्रशिक्षणार्थी अधिकारी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे असल्याचे आढळून आले.
हे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि दर्जेदार करदाता सेवा देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करून सुसज्ज करते. प्रेरक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते.
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1976976)
Visitor Counter : 94