कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

निवृत्तीवेतनधारकांमध्ये तसेच हितधारकांमध्ये डिजिटल हयात दाखला तयार करण्यासाठी  चेहरा प्रमाणीकरण  तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाकडून गोव्यामध्ये शिबिरांचे आयोजन


भारतातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 100 शहरांमध्ये 500 ठिकाणी 1 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान देशव्यापी डिजिटल हयात दाखला अभियान 2.0 चे आयोजन करण्यात येत आहे

हयातीच्या  डिजिटल दाखल्याचे चेहरा प्रमाणीकरण सादरीकरण निवृत्तीवेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादरीकरण सुलभ आणि सुविहित करेल

Posted On: 10 NOV 2023 3:40PM by PIB Mumbai

 

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग(DoPPW), कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालय, भारत सरकारकडून गोव्यामध्ये सर्व केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारक आणि निवृत्तीवेतन वाटप अधिकाऱ्यांमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी चेहरा प्रमाणीकरण सुविधेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय विशेष ओळख प्राधिकरण(UIDAI) यांच्या सहकार्याने देशव्यापी डीएलसी अभियान 2.0 चा एक भाग म्हणून ही शिबिरे आयोजित करण्यात आली.

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग(DoPPW) केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारकांच्या जीवन सुलभतेसाठी डीएलसी अर्थात जीवन प्रमाणपत्राचा प्रसार करत आहे. 2014 पासून बायोमेट्रिक उपकरणांचा वापर करून  डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी ) म्हणजेच जीवन प्रमाणपत्र अभियानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करत आहे. त्यानंतर, विभागाने  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय(MeitY) आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या सहकार्याने आधार डेटाबेसवर आधारित चेहरा प्रमाणीकरण  तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली यामुळे   कोणत्याही अँड्रॉईड  आधारित स्मार्ट फोनवरून जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले आहे. या सुविधेअंतर्गत , चेहरा प्रमाणीकरण  तंत्राद्वारे व्यक्तीची ओळख पटवली जाते आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र  तयार केले जाते. नोव्हेंबर 2021 मध्ये सुरु  करण्यात आलेल्या या यशस्वी तंत्रज्ञानाने निवृत्तीवेतनधारकांचे बाह्य बायोमेट्रिक उपकरणांवरील अवलंबित्व कमी केले आणि स्मार्टफोन-आधारित तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि किफायतशीर  बनवली. केंद्र सरकारच्या सगळ्या निवृत्तीवेतनधारकांमध्ये तसेच निवृत्तीवेतन  वितरण प्राधिकरणांमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र/चेहरा प्रमाणीकरण  तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने डिजिटल हयात दाखले सादर करण्यासाठी, निवृत्तीवेतन  आणि निवृत्तेवेतनधारक  कल्याण विभागाने नोव्हेंबर 2022 मध्ये देशभरातील 37 शहरांमध्ये देशव्यापी मोहीम सुरू केली. केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांचे 35 लाखांहून  अधिक डिजिटल हयात दाखले  जारी करून ही मोहीम प्रचंड यशस्वी झाली.

1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 100 शहरांमधील 500 ठिकाणी ही देशव्यापी मोहीम आयोजित केली जात आहे, यामध्ये  17 निवृत्तिवेतन   वितरण बँका, मंत्रालये/विभाग, निवृत्तीवेतनधारक कल्याण संघटना , यूआयडीएआय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने 50 लाख निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल हयात दाखले सादरीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गोव्यामध्ये उत्तर गोव्यात म्हापसा, पणजीतील स्टेट बँक मुख्य शाखा, पणजी सचिवालय,‌एसबीसीय ट्रेझरी शाखा पणजी, पीबीबी मिरामार आणि दक्षिण गोव्यात वास्को-द-गामा, मार्गोवा मुख्य, फोंडा कानाकोंना, सन्वौर्दम इथे शिबिरे भरवण्यात आली होती. निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभाग आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्टेट बँकेच्या अधिकारी वर्गाबरोबर दिव्यांग निवृत्ती वेतनधारकांना तसेच वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांच्या घरी भेटी देऊन त्यांचे हयातीचा डिजिटल दाखलातयार करण्याबाबत प्रक्रियेबद्दल त्यांना माहिती दिली.

हयातीचा दाखला  डिजिटल प्रकारे सादर करण्याचा फायदा देशाच्या कानाकोपऱ्यात दुर्गम भागात राहणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना व्हावा म्हणून तपशीलवार मार्गदर्शनासह एक समग्र परिपत्रक काढण्यात आले आहे.  या परिपत्रकात मंत्रालय , भारत सरकारची विविध खातीनिवृत्तीवेतन देणाऱ्या बँका, निवृत्तीवेतनधारकांच्या संस्था आणि सर्व संबंधितांच्या जबाबदाऱ्या तसेच भूमिका विशद करणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये मोहिमेसाठी संबंधितांनी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी जनजागृती करणे तसेच कार्यालयेबँकांच्या शाखा, एटीएम यामध्ये पत्रके आणि पोस्टर लावून त्याद्वारे  DLC /FAT बद्दल योग्य तो प्रसार करणे, जिथे डोअर स्टेप बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे अशा ठिकाणी जेव्हा निवृत्तीवेतनधारक हयातीचा दाखला  सादर करण्यासाठी शाखेत येईल तेव्हा अशा ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठी त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असल्यास शक्यतोवर DLC /FATचा वापर करणे, निवृत्तीवेतनधारकांना त्यांचा हयातीचा डिजिटल दाखला विनाविलंब सादर करता यावी यासाठी शिबिरे तसेच अंथरुणाला खिळलेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी घरी भेट देणे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आहेत.

निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणकारी संस्था , निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा डिजिटल दाखला सादर करता यावा यासाठी शिबिरे आयोजित करते. DoPPW चे अधिकारी देशांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देतात आणि विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून त्यांना हयातीचा डिजिटल दाखला सादर करण्यासाठी मदत करतात.

***

S.Kane/S.Patil/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976226) Visitor Counter : 57


Read this release in: English