कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 2.0


बँक ऑफ महाराष्ट्राकडून पुण्यामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक  कल्याण विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी दिली पुण्यातील शिबिराला भेट

Posted On: 09 NOV 2023 6:46PM by PIB Mumbai

 

निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत देशव्यापी डिजिटल हयात दाखला अभियान 2.0 सुरू करण्यात आले आहे. भारतातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 100 शहरांमध्ये 500 ठिकाणी देशव्यापी डिजिटल हयात दाखला अभियान 2.0 चे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण सरकार या दृष्टीकोनाने सर्व हितधारकांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे.

केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांची  जीवन सुलभता वाढवण्यासाठी, निवृत्तीवेतन  आणि निवृत्तेवेतनधारक  कल्याण विभाग 2014 पासून बायोमेट्रिक उपकरणांचा वापर करून  डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी ) म्हणजेच हयात दाखला अभियानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करत आहे. त्यानंतर, विभागाने  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय(MeitY) आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या सहकार्याने आधार डेटाबेसवर आधारित चेहरा प्रमाणीकरण  तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली यामुळे   कोणत्याही अँड्रॉईड  आधारित स्मार्ट फोनवरून जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले आहे. या सुविधेअंतर्गत , चेहरा प्रमाणीकरण  तंत्राद्वारे व्यक्तीची ओळख पटवली जाते आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र  तयार केले जाते. नोव्हेंबर 2021 मध्ये सुरु  करण्यात आलेल्या या यशस्वी तंत्रज्ञानाने निवृत्तीवेतनधारकांचे बाह्य बायोमेट्रिक उपकरणांवरील अवलंबित्व कमी केले आणि स्मार्टफोन-आधारित तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि किफायतशीर  बनवली. केंद्र सरकारच्या सगळ्या निवृत्तीवेतनधारकांमध्ये तसेच निवृत्तीवेतन  वितरण प्राधिकरणांमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र/चेहरा प्रमाणीकरण  तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने डिजिटल जीवन प्रमाणपत्र  सादर करण्यासाठी, निवृत्तीवेतन  आणि निवृत्तेवेतनधारक  कल्याण विभागाने नोव्हेंबर 2022 मध्ये देशभरातील 37 शहरांमध्ये देशव्यापी मोहीम सुरू केली. केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांचे 35 लाखांहून  अधिक डिजिटल हयात दाखले  जारी करून ही मोहीम प्रचंड यशस्वी झाली.

1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 100 शहरांमधील 500 ठिकाणी ही देशव्यापी मोहीम आयोजित केली जात आहे, यामध्ये  17 निवृत्तिवेतन   वितरण बँका, मंत्रालये/विभाग, निवृत्तीवेतनधारक कल्याण संघटना , यूआयडीएआय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने 50 लाख निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल हयात दाखले सादरीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या संदर्भात पुण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राकडून  विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच प्रकारच्या एका शिबिराचे 9-11-2023 रोजी बाजीराव रोड शाखेच्या बँकेत निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव नारायण माथुर यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले.या शिबिराला निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे अवर सचिव एस. चक्रवर्ती, आनंद प्रकाश जैस्वाल डीजीएम(एबीसी), प्रशांत कुमार दाश डीजीएम(डीझेडएम पीसीआर), चंद्रविलास भांबरे, डीजीएम(बाजीराव रोड), संजय जोशी, सीएम सीपीपीसी आणि केंद्र सरकार/ रेल्वे/ संरक्षण निवृत्तीवेतनधारकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. 

अतिरिक्त सचिव माथुर यांनी निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आपले निवृत्तीवेतन सुरू रहावे याकरिता आणि आपल्या घरातूनच सहजपणे डिजिटल हयात दाखला सादरीकरणासाठी चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाची माहिती सांगितली.  या शिबिरात 100 पेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सहभागी होत उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यांना जागीच हयात दाखल्याचा लाभ मिळाला. सर्व निवृत्तीवेतनधारकांमध्ये डिजिटल हयात दाखल्यासाठी चेहरा प्रमाणीकरणाच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याचे माथुर यांनी सर्व उपस्थितांना आवाहन केले.

डिजिटल हयात दाखला सादर करण्यासाठी हे विशेष शिबिर बँकेच्या विविध शाखांमध्ये 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976022) Visitor Counter : 76


Read this release in: English